Join us  

उसळ -पनीर खाल्ल्याने गॅसेस-अपचनाचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, प्रोटीन पचण्यासाठी करा १ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2023 5:23 PM

Simple Trick to Digest Protein Easily Diet Tips : आहारात प्रोटीन असायलाच हवे, पण ते नीट पचावं यासाठी काय करता येईल...

शरीराची योग्य वाढ आणि पोषण व्हावे यासाठी आपल्या आाहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके असे सगळे घटक योग्य प्रमाणात घेण्याची आवश्यकता असते. हे सगळे घटक योग्य प्रमाणात मिळाले तरच आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. दूध, अंडी, डाळी, मांसाहार, ब्रोकोली यांमध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असते. म्हणून आपण या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करतो. 

आपले शरीर प्रोटीनचा साठा करुन ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला सतत प्रोटीन द्यावे लागते. पण काहीवेळी प्रोटीन देणारे पदार्थ शरीराला त्रासदायक ठरु शकतात. प्रोटीनमुळे गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. तसेच प्रोटीन काहीवेळा पचण्यास जड होऊ शकते. आता शरीराला प्रोटीनची आवश्यकता असल्याने प्रोटीन तर खायला हवे पण ते पचावे यासाठी काय करता येईल याविषयी डायटीशियन लवनीत कौर यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय काय आहे आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. 

प्रोटीन पचण्यासाठी काय करायचे...

पपईचा आहारात समावेश करणे हा यासाठी उत्तम उपाय आहे. पपईमध्ये पॅपिन नावाचे एन्झाईम असते. यामुळे आपण खाल्लेल्या प्रोटीनचे चांगल्यारितीने पचन होण्यास मदत होते. इतकेच नाही तर अॅसिड रिफ्लक्समुळे होणारी अॅसिडीटी, जळजळ यांसारख्या त्रासांपासून दूर राहण्यासाठीही पपई खाणे उपयुक्त ठरते. याशिवाय फायटो न्यूट्रीयंटस, व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंटस यांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. असं असलं तरी प्रोटीनचे आणि एकूणच खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन व्हावे यासाठी आहार, जीवनशैली, व्यायाम या सगळ्या गोष्टी चांगल्या असणे गरजेचे असते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना