Join us  

नागलीची भाकरी आवडत नाही, चव पसंत नाही? नागलीचे 3 सुपरटेस्टी पदार्थ, पडाल नागलीच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 2:19 PM

नागलीला एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. पण याच नागलीचे अनेक चवदार पदार्थ करता येतात जे आरोग्यासाठी उत्तम असतात. चव आवडत नसली तरी आवडीने नागलीचे पदार्थ खाता येतील असे काही प्रकार आहेत.

ठळक मुद्दे नागलीचे पदार्थ नाश्त्यात खाणं महत्त्वाचे.पौष्टिक नागली चविष्ट प्रकारे खाण्यासाठी नागलीच्या धिरड्यांपासून नागलीच्या पराठ्यांपर्यंत अनेक पदार्थ सहज  करता येतात.वजन कमी करण्यासाठी नागलीच्या पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. 

महाराष्ट्रात नागली सर्वत्र पिकत नसली तरी  कुठल्याही किराणा दुकानात नागली सहज मिळते. इतकंच नाही तर नागलीचं तयार पीठ देखील मिळतं. नुकतचं खाऊ लागलेल्या बाळाच्या पोषणासाठी ते वयानुसार पचनशक्ती कमी झालेल्या वृध्दांसाठी नागली ही फायदेशीर ठरते.  आहारतज्ज्ञ डाॅ. रितिका समद्दर म्हणतात, नागलीमधे उच्च दर्जाची पोषणमुल्यं असतात.  तसेच नागली ही ग्लुटेन फ्री असल्याने ती  सर्वच प्रकृतीच्या लोकांना सहज पचणारी आहे. सकाळच्या पहिल्या आहारात नागलीचे पदार्थ समाविष्ट केले तर त्याचा फायदा जास्त चांगला होतो. मधुमेही रुग्णांसाठी तसेच वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नागली आणि नागलीचे पदार्थ फायदेशीर ठरतात.  नागलीला एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. पण याच नागलीचे अनेक चवदार पदार्थ करता येतात जे आरोग्यासाठी उत्तम असतात. 

Image: Google

नागली आहारात का महत्त्वाची?

1. नागलीमधे कर्बोदकं आणि पचनास उपयुक्त फायबर असतात. 

2. 100 ग्रॅम नागलीमधे 344 मिलिग्रॅम कॅल्शियम असतं. याचा फायदा हाडं मजबूत करण्यासाठी आणि आरोग्य उत्तम् राखण्यासाठी होतो. 

3. नागलीमधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे नागलीचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. याचा उपयोग मधुमेही रुग्णांसाठी  रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी होतो.

4.  नागलीत क आणि ड जीवनसत्त्वं आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. या गुणांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आहारात नागली आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. 

Image: Google

नागलीचं धिरडं

वजन कमी करण्यासाठी नागलीचा हा पदार्थ उत्तम आहे. यासाठी आपल्याला जितके धिरडे करायचे आहेत, त्याप्रमाणात नागलीचं पीठ घ्यावं. त्यात पाणी घालून नेहमीच्या धिरड्यांसारखं मिश्रण पातळ करावं. या मिश्रणात कांदा, मिरची, जिरे, मीठ घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. आणि बेसनपिठाचे धिरडे आपण जसे करतो तसे नागलीचे धिरडे करावेत. चवीला खमंग लागणारे हे धिरडे ओलं खोबरं-कोथिंबीर-पुदिना- लिंबू- लसूण-मीठ आणि थोडी साखर घालून केलेल्या चटणीसोबत खावेत. हे धिरडे पचायलाही सहज सुलभ असतात. 

 

Image: Google

नागलीचा पॅनकेक

नागलीचा पॅनकेक एकदा खाऊन बघितल्यास तो सगळ्यांचाच ऑल टाइम फेव्हरिट होईल हे नक्की. नागलीचा पॅनकेक करताना सारणासाठी पाव कप बारीक चिरलेला कांदा, घेवडा गोल बारीक चिरलेला, अर्धा कप बारीक गोल चिरलेले बेबी काॅर्न, अर्धा कप बारीक कापलेले बटण मश्रुम, अर्धा कप पातळ चिरलेली लाल सिमला मिरची, 1 मोठा चमचा ओरेगॅनो मीठ, काळे मिरे, तुळशीची ताजी पानं, 2 मोठे चमचे तेल आणि साॅसेस घ्यावेत. पॅनकेकच्या मिश्रणासाठी 1 कप दूध , 1 अंडं, 3 मोठे चमचे वितळलेलं बटर, 1 कप नागली पीठ,  2 छोटे चमचे बेकिंग पावडर, ,अर्धा चमचा मीठ घ्यावं आणि पॅनकेकसोबत लागणाऱ्या मसाला दहीसाठी 1 कप पाणी काढून टाकलेलं दही, 4 लसूण पाकळ्या, थोडं मीठ, बारीक केलेले काळे मिरे घ्यावेत. 

Image: Google

पॅनकेक करण्यासाठी एक मोठा पॅन घ्यावा. त्यावर तेल घालून ते तापवावं. तेल तापलं की त्यात कांदा घालून मंद आचेवर तो दोन मिनिटं परतून घ्यावा. त्यात आपले आवडते साॅसेस घालावेत. चिरलेले बेबी काॅर्न घालावेत. ते 3-4 मिनिटं शिजू द्यावेत. ते थोडे लालसर झाले की त्यात बारीक चिरलेला घेवडा घालावा. तो 2-3 मिनिटं शिजू द्यावा. नंतर मश्रूम टाकावेत. गॅसची आच मोठी करुन हे सर्व दोन मिनिटं नीट परतावं. मश्रूममधील पानी सुकेपर्यंत हे परतावं. नंतर त्यात लाल सिमला मिरची, ओरेगॅनो, बारीक चिरलेली तुळशीची पानं घालावीत आणि हे सर्व पुन्हा एक मिनिट परतून घ्यावं. नंतर गॅस बंद करावा.  

पॅनकेकचं मिश्रण करण्यासाठी  एका मोठ्या भांड्यात एक अंडं फेटून घ्यावं. त्यात दूध आणि वितळलेलं बटर घालावं. हे मिश्रण दोन मिनिटं फेटून घ्यावं. जास्त फेटू नये. नंतर त्यात भाज्यांचं मिश्रण घालावं. ते हळूवार त्यात मिसळून घ्यावं.  नंतर नाॅनस्टिक पॅन गरम करावं. किचन टाॅवेलनं पॅन पुसून घ्यावा. पॅनला थोडं तेल लावावं. गॅसची आच मंद करावी. एक डावभर पॅनकेकचं मिश्रण घ्यावं. ते पॅनच्या मध्यभागी घालावं. डावाच्या मागील बाजूने हे मिश्रण थोडं  गोलाकार पॅनकेक प्रमाणे पसरुन घ्यावं. ते खूप पातळ पसरु नये.  दोन मिनिटं ते शिजू द्यावं. वर बुडबुडे येतात. पातळ उलथणं घेऊन तो हळूवार पॅनवर दुसऱ्या बाजूने उलटावा दुसऱ्या बाजूनेही तो किमान 2 मिनिटं शिजवावा. नंतर तो एका ताटात काढून गरम गरम खावा.

पॅनकेकसोबत मसाला दही छान लागतं. त्यासाठी पाणी काढून घट्ट पिळून घेतलेलं दही मिक्सरच्या भांड्यात घालावं. त्यात लसणाच्या पाकळ्या, मीठ, वाटलेले काळे मिरे घालावेत. एक अर्धा मिनिट मिक्सरमधून हे सर्व फिरुन घ्यावं. मस्त क्रीमी मिश्रण तयार होतं.  गरम गरम पॅनकेक या दह्याच्या क्रीमी मिश्रणासोबत छान लागतो.

Image: Google

नागलीचा पराठा

खमंग चवीचा आणि पोषणमुल्यांनी भरपूर असा नागलीचा सारण भरुन पराठा करता येतो. यासाठी आधी पीठ मळून घ्यावं. पराठ्यांच्या पिठासाठी अर्धा कप नागलीचं पीठ, अर्धा कप कणिक, पाणी जसं लागेल तसं घ्यावं.हे सर्व एकत्र करुन पीठ मळून घ्यावं. पीठ मऊ मळावं. ते थोडा वेळ सेट होवू द्यावं.  नंतर सारणासाठी 1 मोठा चमचा बारीक चिरलेलं कारलं, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली मेथी, 2 मोठे चमचे बारीक चिरलेला पालक, 2 मोठे चमचे किसलेला फ्लाॅवर, 1 चमचा बारीक चिरलेली मिरची, अर्धा चमचा आलं, 1 चमचा तेल घ्यावं. 

Image: Google

आधी पराठ्याचं सारण करावं. त्यासाठी सर्व भाज्या एकत्र कराव्यात. त्यातच किसलेलं आलं, मिरची, मीठ घालावं. थोड्यश तेलावर सर्व भाज्या परतून घ्याव्यात. त्यात आवडत असल्यास गरम मसाला, चाट मसाला घालावा. या पराठ्यांच्या सारणात उकडलेला बटाटाही सारणाच्या प्रमाणानुसार घालता येतो.  याचं मऊ मिश्रण तयार करावं. नंतर पिठाचे गोळे करुन ते हातानं थोडे मोठे करुन त्यात थोडं सारण भरुन घ्यावं.  सारण भरल्यानंतर लाटीचं तोंड बंद करताना थोडा तेलाचा हात लावावा.  पराठा हलक्या हातानं पोळपाटावर लाटून घ्यावा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल/ तूप सोडून खरपूस भाजावा.

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य