सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा आपल्याकडचा एक पारंपरिक प्रकार आहे. केवळ नाश्त्यासाठीच नाही तर घरी कोणी पाहुणे आले तरी पोहे आणि चहा करण्याची पध्दत आहे. मुलगा मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला तर चहा पोह्यांचा कार्यक्रम म्हणूनच ओळखलं जातं . भारतात बहुतांश ठिकाणी पोहे खाल्ले जातात. शिवाय पोहे बनवण्याची पध्दतही भौगोलिक स्थानानुसार बदलत जाते. पोहे हे आपल्या इतके परिचयाचे आहेत की म्हणूनच पोह्यांमधे नेमकं असं काय असतं की पोहे एवढे लोकप्रिय आहेत. पोहे चवीला चांगले लागतात, पटकन होतात हे पोहे करण्या आणि खाण्यामागचं अगदीच वरवरचं कारण आहे. पोह्यांच्या थोडं खोलात जाऊन शास्त्रीय माहिती घेतली तर पोहे खाण्याची अनेक कारणं सापडतील. त्यातलं आपल्या अगदी जवळचं कारण तज्ज्ञ सांगतात ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि सोबत शरीराचं पोषण होण्यासाठी पोहे खाणं महत्त्वाचं आहे.
Image: Google
पोहे खावेत कारण..
तज्ज्ञ सांगतात पोहे म्हणजे हलका फुलका , पोषणयुक्त नाश्ता आहे. सकाळच्या वेळेत पोहे खाण्याला म्हणूनच खूप महत्त्व आहे. पोहे खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. पोह्यांमधे मोठ्या प्रमाणात कबरेदकं असतात. यामुळे सकाळच्या सुरुवातीला शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा पोह्यातून मिळते. शरीराला पोह्यातून ऊर्जा मिळत असली तरी पोह्यातील कॅलरीज मात्र खूप कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी पोहे सकाळी नाश्त्याला खाणं योग्य मानलं जातं.
Image: Google
पोहे खाल्ल्यामुळे शरीराला होणार्या फायद्यांबद्दल तज्ज्ञ सांगतात की पोहे खाऊन वजन कमी करता येतं. पोह्यांमधे फायबर, लोह, अ, क जीवनसत्त्वं, कबरेदकं , प्रथिनं आणि आरोग्यदायी फॅटस असतात. पोह्यातील हे सर्व घटक आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. पोह्यांचा समावेश आहारात केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी, ज्यांना बध्दकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी सकाळी नाश्त्याला पोहे खाणं फायदेशीर असतं.
Image: Google
पोह्यांमधे आरोग्यदायी गुणधर्म असतात. पण ते टिकवून, पोह्यांमधील पोषकता आणखी वाढवण्यासाठी पोहे करताना विशिष्ट काळजी घ्यायला हवी. पोह्यांमधे कांदा, मिरची हे आवश्यक घटक असतातच. पण पोषणाचा विचार करता त्यात कढीपत्ता, लिंबू, शेंगदाणे, कोथिंबीर हे आवश्यक घटक आहेत. यामुळे पोहे आणखी पौष्टिक होतात. तसेच पोहे करताना त्यात गाजर, हिरवे ताजे मटार, उकडलेला बटाटा या भाज्याही घालता येतात. भाज्यांमुळे पोह्यांमधील फायबर आणि जीवनसत्त्वांचं प्रमाण वाढतं. पोह्यांमधे बटाटे घालताना ते आधी उकडून घ्यायला हवेत. कारण पोह्यांमधे बटाटे लवकर शिजत नाही. पोह्यांमधील घटक आरोग्यदायी होण्यासाठी गॅस बंद केल्यावर त्यात कोथिंबीर, किसलेले खोबरे, शेंगदाणे, लिंबाचा रस घालावा. पोहे गॅसवर असताना हे घटक त्यात घालू नये. कारण फोडणीत शेंगदाणे घातले तर त्यातलं सत्त्वं निघून जातं.