हिवाळा हा आरोग्यासाठी पोषक ऋतू आहे. पण हिवाळ्यातील थंड हवामान तसेच बदलते हवामान यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजारही होतात. हे आजार होवू नये आणि थंडीचा छान आनंद घेता यावा यासाठी एक सूप खूप मदत करतं, ते म्हणजे गार्लिक व्हेजिटेबल सूप. हे सूप केवळ चविष्टच लागतं असं नाही तर थंडीत आपल्या आरोग्याची काळजीही घेतं. हे गार्लिक व्हेजिटेबल सूप तयार करणं अगदीच सोपं आहे.
Image: Google
गार्लिक व्हेजिटेबल सूप कसं करणार?
गार्लिक व्हेजिटेबल सूप तयार करण्यासाठी दोन लहान चमचे बारीक कापलेला लसण, 1 कप गाजर,घेवडा, फ्लॉवर मका, मटार या भाज्या उकळून, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे क्विक कुकिंग ओटस, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 लहान चमचा तेल, अर्धा चमचा मिरपूड आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
गार्लिक व्हेजिटेबल सूप तयार करण्यासाठी नॉन स्टिक कढईत थोडं तेल घालावं. तेल थोडं तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेला लसूण घालून मध्यम आचेवर दोन मिनिटं ते परतून घ्यावं. यानंतर त्यात उकडलेल्या भाज्या घालाव्यात. या भाज्या फोडणीत चांगल्या मिसळाव्यात. किमान तीन मिनिट तरी भाज्या परतल्या जायला हव्यात. भाज्या परतल्या गेल्या की त्यात चिरलेली कोथिंबीर आणि ओटस घालून तेही चांगले परतून घ्यावं.
Image: Google
नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावं. पाण्याला दोन ते तीन मिनिटं उकळी काढावी. सूप चांगलं उकळलं की त्यात चवीनुसार मीठ घालून एकदा ते चांगलं हलवून घ्यावं. सूपला आणखी एक उकळी आली की गॅस बंद करवा. गरम गरम सूप पिल्यानं तोंडाची चव वाढते आणि थंडीही पळून जाते. हे सूप वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त असतं.