Join us  

जाॅगिंग ट्रॅकवर व्यायाम करताना रोज ग्लासभर ज्यूस पिता? रंगबिरंगी ज्यूस पिण्याचा रतिब लावाल तर जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 3:24 PM

ज्यूस पिणं वाईट नाही, पण रोज आणि वाट्टेल त्या फळं-भाज्यांचे ज्यूस पिणं घातक ठरू शकते.

ठळक मुद्देज्यूस पिऊन जुलाब होणे, विषबाधा होणे काही नवीन नाही. योग्य डॉक्टर, योग्य ज्यूस, योग्य आहार हे सूत्र विसरू नका.

हिवाळा सुरु झाला आणि त्यातही थर्टी फस्ट जवळ आला की अनेकांना वाटतं यंदा तब्येत कमवायचीच. मग जॉगिंग ट्रॅकवर जाणं सुरु होतं. तिथला व्यायाम, नवनव्या डाएटचे फॅडही गुगलून पाहिले जाते. हे कमीच की काय म्हणून जॉगिंग ट्रॅकवर हल्ली भरपूर ज्यूस विकायला उभे असतात. आणि अनेकजण अगदी रोज ते ज्यूस पितात. असे ज्यूस सरसकट पिणे, डॉक्टरचा आणि आहारतज्ज्ञाचा सल्ला न घेता केवळ व्हॉट्सपिय ज्ञान किंवा सर्व पितात म्हणून आपणही पिणे योग्य आहे का? ज्यूस पिण्यापूर्वी आपल्याला नेमके काय माहिती हवे. 

कडू भोपळ्याचे ज्यूस प्यायल्याने सेलिब्रिटीपासून अनेकांना इन्फेक्शन होणे, जीव धोक्यात येणे अशा बातम्याही काही नवीन नाही. मात्र तरीही लोक स्वत:च्या मनानाचे हेल्दी हेल्दी करत हे ज्यूस पितात. तसं करणं महागात पडलं तर?

 

(Image : Google)

लक्षात काय ठेवाल? आहारतज्ज्ञ नयना कुलकर्णी सांगतात..

१. प्रत्येकाची तब्येत वेगळी आहे. घरातही एकाला जे चालेल ते दुसऱ्याला चालेलच, पचेलच असे होत नाही. म्हणून स्वत: आहार तज्ज्ञ बनू नका.२. व्हॉट्सॲपवर कुणीतरी हमखास उपाय म्हणून सांगतो ते वाचून स्वत:वर प्रयोग करु नका. ३. काही रस रोज पिणार असाल किंवा रसाहार सुरु करायचा असेल तर त्याविषयातील तज्ज्ञ व्यक्तीचा वैद्यकीय सल्ला घ्या. ते सांगतील तेच ज्यूस प्या. मिळेल ते किंवा आवडते म्हणून वाट्टेल ते ज्यूस पिऊ नका.  ४. सर्व भाज्यांचे ज्यूस एकत्र करुन पिऊ नका कारण नेमका कोणत्या भाजीने त्रास झाला हे कळत नाही. त्यामुळे शक्यतो एकाच भाजीचा आणि तो ही अगदी कमी प्रमाणात ज्यूस प्या.५. कारली, भोपळा, शेवगा हे पोषक असले तरी त्यांचे ज्यूस रोजच पिणे योग्य नाही. डॉक्टरला विचारा प्यावे का, किती प्यावे?६. आपल्या घरातील लहान मुलांना हौशीने ज्यूस पाजू नका.७. ऋतूमानानुसार फळं खा पण त्यांचे ज्यूस टाळा.८. सगळ्यात महत्त्वाचे आपण जिथे ज्यूस पितो तिथली स्वच्छता पाहा.९. ज्यूस पिऊन जुलाब होणे, विषबाधा होणे काही नवीन नाही. योग्य डॉक्टर, योग्य ज्यूस, योग्य आहार हे सूत्र विसरू नका. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सथंडीत त्वचेची काळजी