Join us  

हिवाळ्यात ताक प्यावं का? कसं, केंव्हा आणि किती प्यावं? काय फायदे-तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 3:39 PM

उन्हाळ्याच्या दिवसातच नाहीतर हिवाळ्यातही ताक पितात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात ताक करण्याची- पिण्याची पद्धत वेगळी आहे , ती समजून घेऊन ताक प्याल्यास ताकातील गुणधर्मांचा आरोग्यास लाभ मिळतो.

ठळक मुद्देपचनाशी निगडित समस्या ताक प्याल्यानं दूर होतात.उन्हाळ्यातआणि हिवाळ्यात ताक ताक करण्याची- पिण्याची पद्धत वेगळी आहे.  वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ताकाचा उपयोग होतो. 

ताक उन्हाळ्यात पितात, हिवाळ्यात नाही असा अनेकांचा समज असतो. पण अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरील 'च्युसडे टिप्स विथ बी' नावाच्या मालिकेमधे आपल्या आवडत्या पेयाबद्दल लिहिलं. ताक पिणं आरोग्यासाठी कसं फायदेशीर म्हणत तिने ही पोस्ट इन्स्टाग्रामवरुन शेअर केली.

भाग्यश्रीने इन्स्टावर शेअर केलेली ही पोस्ट वाचल्यानंतर हिवाळ्यात कुठे ताक पितात ? असा प्रश्नन अनेकांना पडला. याची समजमाध्यमावर चर्चाही सुरु झाली.  याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ताक केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच नाहीतर  हिवाळ्यात पिण्याचेही फायदे आहेत. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात ताक पिण्याची वेगळी आहे ती समजून घेऊन ताक प्याल्यास ताकातील गुणधर्मांचा आरोग्यास लाभ मिळतो.

Image: Google

पोटाला, पचनाला लाभ मिळवून देणाऱ्या ताकाला आयुर्वेदात 'अमृत पेय' असं म्हटलं आहे. पण ताकातील गुणधर्माचा आरोग्यास अमृताप्रमाणे फायदे मिळवून द्यायचे असतील तर उन्हाळ्यात हिवाळ्यात ताक पिण्याची योग्य पध्दत समजून घ्यायला हवी. केवळ स्टार सांगतात म्हणून दिवसातून कधीही कितीही वेळा ताक पिणं योग्य नव्हे. ते तेव्हाच योग्य ठरेल जेव्हा ताक कसं प्यावं, आपल्या प्रकृतीला ते कसं योग्य ठरेल? आरोग्यदायी ताक कसं तयार करावं, किती प्यावं हे \ समजून घेऊन ताक प्याल्यास  त्याचा फायदा होतो असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

ताकातून काय मिळतं?

शरीर थंड ठेवण्यासाठी ताक प्यायचं असतं हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण हिवाळ्यात वातावरण थंड असतांना ताक पिऊन आणखी शरीराला थंडावा देणं फायदेशीर ठरतं का? यावर तज्ज्ञ म्हणतात की, ताकामधे अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. तसेच ताक पिल्याने शरीराला लोह, जस्त, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही महत्त्वाची खनिजं देखील मिळतात. ताकामुळे शरीराला केवळ थंडावाच मिळतो असं नाही तर पचनाशी निगडित अवघड समस्याही ताक प्याल्यानं बऱ्या होतात, त्यांचा आरोग्यास उपद्रव करण्याचा धोका टळतो. ताकामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. ताक पिल्यानं शरीराला आणि मनाला ऊर्ज मिळून उत्साह निर्माण होतो. या सर्व फायद्यांसाठी म्हणून हिवाळ्यातही ताक पिणं आवश्यक आहे  असं तज्ज्ञ म्हणतात. फक्त हिवाळ्यात ताक पिण्याची योग्य पध्दत समजून घ्यायला हवी. 

Image: Google

हिवाळ्यात ताक पिताना..

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात ताक पिण्याची विशिष्ट पध्दत आहे. हिवाळ्यात सूर्य पूर्ण डोक्यावर येऊन कडक ऊन पडत नाही, तोपर्यंत ताक पिऊ नये,. कडक ऊन पडलं की ताक प्यावं. ताक हे प्रकृतीनं थंडं असल्यानं ते बाधू नये म्हणून  घरात ऊन ज्या ठिकाणी येतं तिथे बसून किंवा गॅलरीत, अंगणात बसून प्यावं, ताक पिताना थोडा गूळ खावा. गूळ गरम असल्यानं ताकासोबत खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. तसेच हिवाळ्यात ताकामधे थोडा ओवा भाजून त्याची तयार केलेली पूड, थोडं सैंधव मीठ टाकून प्यावं किंवा हिंगाचा तडका देऊन ताक प्याल्यास  त्याचा फायदा होतो.  

थंडीच्या दिवसात थंड वातावरणामुळे ज्यांना त्रास होतो त्यांनी थंडं गुणाचं ताक पिण्याआधी डाॅक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ते आपल्या प्रकृतीनुसार ताक कसं, किती, केव्हा प्यावं, हिवाळ्यात ते प्यावं की नाही याबद्दल उचित सल्ला देऊ शकतात. यामुळे चुकीच्या पध्दतीनं ताक पिण्याचे उद्भवणारे धोके टाळता येतात.  तज्ज्ञ म्हणतात हिवाळ्यात प्लेन ताक प्यावं. म्हणजे त्यात लोणी असू नये. हिवाळ्यात ताक पिताना त्यात थोडी मिरे पूड, थोडं किसलेलं आलं आणि चिमूटभर हिंग घालावा. ते ताकात नीट मिसळून प्याल्यास हिवाळ्यात ताक पिणं फायदेशीर ठरतं. 

Image: Google

ताक पिण्याचे फायदे

1. दूध आणि दह्याच्या तुलनेत ताकामधे फॅटसचं प्रमाण अगदीच थोडं असतं. ताक प्याल्याने भूक नियंत्रित राहाते, पोट लवकर भरतं, भरपूर वेळ भरलेलं राहातं. पोट  भरल्याचं समाधान ताक पिऊन मिळतं. म्हणूनच दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मिळतं. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होवून वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ ताक पिण्याचा सल्ला देतात.

2. आयुर्वेदात ताक पोटासाठी अमृत आणि सुपाच्य म्हणून ओळखलं जातं. कारण ताकातील सूक्ष्म जिवाणु हे आतड्यांचय आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पचनास आवश्यक विकर ताकातून मिळतात. ताक प्याल्यानं पोटात वात (गॅस) धरत नाही. अपचन, छातीत पोटात जळजळ या समस्यांचा धोका ताक प्याल्यानं टळतो. तसेच हा त्रास असल्यास ताकाच्या सेवनानं कमी होतो. 

Image: Google

3. ताकामधे प्रथिनं आणि कॅल्शियम हे घटक  मोठ्या प्रमाणात  असतात. ताकामुळे हाडं मजबूत होतात. तसेच ताकाच्या योग्य प्रमाणशीर आणि नियमित सेवनानं स्नायू लवचिक होतात तसेच ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो. 

4. हिवाळ्यात थंडं वातावरणामुळे तहान लागत नाही. त्यामुळे पाणी कमी प्यायलं जातं. त्याचा परिणाम शरीरात कोरडेपणा निर्माण होवून त्याचे परिणाम आरोग्यावर होतात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी हिवाळ्यात दुपारी ताक पिणं फयदेशीर ठरतं. ताक पिल्यानं शरीराला आलेला थकवा, मरगळ दूर होते. ताक प्याल्यानंतर शरीराला मिळणारी ऊर्जा दीर्घ काळ टिकून राहाते.

5.  ताकात असलेल्या जिवाणुंमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच ताक नियमित प्याल्याने ताकातील अ, ब आणि क या जीवनसत्त्वांचा लाभ आरोग्यास होऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. छोट्या  मोठ्या संसर्गाचा धोका नियमित आणि योग्य पध्दतीने ताक प्याल्यास कमी होतो. 

 

टॅग्स :अन्नआहार योजनाआरोग्यहेल्थ टिप्स