चाय पीने का कोही वक्त नही होता. सारखी वाक्यं चहाचे चहाते असणार्यांची आवडीची असतात. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल पण चहा हवाच इतकं चहावर काहींचं प्रेम असतं. तर काहींना जेवण केल्यावर चहा पिल्याशिवाय काही सूचतच नाही. जेवणानंतर चहा पिणं ही आपली सवय असल्याचंही अनेकजण कौतुकानं मिरवतात. पण ही सवय कौतुक करुन जपण्याची नसून वेळेत जागं होवून त्वरित सोडण्याची आहे.
छायाचित्र:- गुगल
जेवणानंतर लगेच चहा पिल्यानं काय होतं याबाबतची माहिती आहार आणि सास्थ्य तज्ज्ञ वरुण कत्याल यांनी दिली आहे. ते म्हणतात की, जेवणानंतर मग ते सकाळचं असो की रात्रीचं , त्यानंतर लगेच चहा पिणं ही सवय चांगली नसून अपायकारक आहे. जेवणातून आपल्या शरीरात जी पोषक तत्त्वं गेलेली असतात त्याचं शरीराकडून शोषण झालं की मग शरीराचं पोषण होतं. या पोषक घटकांचं शरीराकडून शोषण होण्याच्या क्रियेत चहा अडथळा आणतो. चहामधे असलेल्या टॅनिनमुळे आहारातील लोह आणि प्रथिनं शरीराद्वारे शोषली जात नाही. या घटकामुळे पाचकरस अधिकच पातळ होवून पचनक्रियाही बिघडते. जेवल्यानंतर लगेच चहा का पिवू नये याची सविस्तर कारणमीमांसा वरुण कत्याल यांनी केली आहे.
जेवणानंतर लगेच चहा पिला तर
छायाचित्र:- गुगल
1. जेवणानंतर लगेच चहा पिल्यानं ऊर्जा आल्यासारखी वाटत असली तरी ही सवय आपल्या रक्तदाबाचा आयुष्यभराचा आजार भेट म्हणून देते. जे जेवल्यानंतर लगेच चहा पितात त्यांच्यात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ज्यांना हायपरटेन्शन किंवा रक्त दाबाचा त्रास आहे त्यांनी चुकूनही जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नये.
2. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच चहा पिल्यास हदयासंबंधित आजार जडतात. या चुकीच्या सवयीमुळे हदयाच्या ठोक्यांची गतीदेखील वाढते.
3. जेवल्यानंतर लगेच चहा पिण्याच्या सवयीमुळे आपली पचनक्रिया कमजोर होते. शरीरात अँसिडचं प्रमाण जास्त वाढतं. यामुळे जेवण पचण्यास अडचणी निर्माण होतात. आणि त्यातूनच पचनासंबंधीचे आजार उद्भवतात.
4.चहा आणि रक्ताचा काय संबंध? पण तो आहे. जेवल्यानंतर लगेच चहा पिल्यानं शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. चहामधे फेनोलिक हा घटक असतो. या घटकामुळे आहारातील लोह शरीराकडून शोषलं जात नाही. तीच बाब प्रथिनांच्या बाबतीतही होते. जेवल्यानंतर चहा पिल्यानं अँनेमिया सारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
5. सामान्यत: डोकं दुखलं की आलं घालून चहा घेतला की बरं वाटतं असा अनेकांचा अनुभव असतो. पण जेवल्यानंतर लगेच चहा पिल्यास शरीरात गॅस तयार होतो यामुळे डोकेदुखी होते.
जेवल्यानंतर चहा पिण्याचे हे तोटे पहाता जेवल्यानंतर चहा न पिलेलाच बरा. पण चहा पिल्याशिवाय रहावतच नाही असं असेल तर जेवल्यानंतर किमान दोन तासांनी चहा प्यावा. त्याआधी नाही असा सल्ला वरुण कत्याल देतात.