पाणी कमी प्रमाणात प्यायलं की आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक सेलिब्रिटी विशेषत: अभिनेत्रीही त्यांचा सौंदर्य आणि फिटनेस फंडा जेव्हा सांगतात, तेव्हा आम्ही भरपूर पाणी पितो असं म्हणतात. शिवाय भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स किंवा विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्यास मदत होते आणि शरीर आतून स्वच्छ होत जातं. यामुळे आपलं आरोग्य तर उत्तम राहतंच पण आपली त्वचाही सुंंदर होते, असंही आपण ऐकलेलं असतं. तब्येतीच्या काही समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरदेखील असंच सांगतात पाणी जरा कमी पडतंय, भरपूर पाणी पित जा.. इथेच तर नेमकी अडचण होते. पाणी भरपूर प्यावं, पण म्हणजे नेमकं किती असावं, हेच आपल्याला समजत नाही. म्हणूनच तर वयानुसार कोणाला किती पाण्याची गरज आहे, हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे.
भरपूर पाणी पिण्याच्या नादात जर खूप जास्त पाणी प्यायला गेलं तर ते देखील आराेग्यासाठी घातक ठरू शकतं. आपले वय आणि वजन किती या गोष्टीही पाणी किती प्यावं, या दृष्टीने गरजेच्या असतो. आपल्या शरीरात एकूण ६० टक्के पाणी असते असे म्हणतात. लाळ निर्मिती, पचनक्रिया, रक्ताभिसरण, चयापचय क्रिया, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचय क्रियेत तयार होणाऱ्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर टाकणे, अशा सर्व गोष्टींसाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. पण बऱ्याचदा लोक प्रमाणाबाहेर पाणी पितात. अनेक जण एकाच वेळी, एका बैठकीत दोन- दोन ग्लास पाणी संपवतात. असं बराच वेळ तहानलेलं राहणं आणि त्यानंतर एकदमच सगळी तहान भागवणं हे देखील आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे पाणी पिण्याची योग्य पद्धत समजून घेणेही गरजेचे आहे.
कोणी किती पाणी प्यावे?- वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी आहे. त्यामुळे १५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात साधारण एक लीटर पाणी प्यायले पाहिजे. - प्रौढ व्यक्तींनी साधारण तीन ते साडेतीन लिटर पाणी दररोज प्यावे.- ज्यांना हृदय विकार असतो किंवा ज्या लोकांना किडनीच्या काही समस्या असतात, अशा लोकांनी दिवसभरात म्हणजेच २४ तासांत दीड ते दोन लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते, असे तज्ज्ञ सांगतात. - ज्या व्यक्ती वयस्कर आहेत म्हणजेच ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींनी दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे.- ज्यांना कोणताही त्रास नाही, अशा व्यक्तींनी योग्य प्रमाणात पाणी घेतले पाहिजे.
शरीरात पाणी जास्त झाले तर ....गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायले तर वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी जर असा त्रास झाला तर वारंवार झोप बिघडते. झोप अपूरी झाली तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि अनेक शारीरिक तक्रारीदेखील निर्माण होतात. अनेकदा पाणी पिण्याचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच वाढले तर शरीरातील सोडियमची पातळी देखील वर- खाली होऊ शकते. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात प्यायला जाते आहे की नाही, याची काळजी प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यावी.
पाणी कमी पडले तर काय होते?- जास्त प्रमाणात पाणी पिणे जसे हानिकारक आहे, तसेच पाणी कमी पडणेही आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शरीराला पाणी कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. - पाणी कमी प्रमाणात घेतले तर मुतखडा होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. - थकवा जाणवणे. थोडी मेहनत केली तरी लगेचच थकून जाणे. अशक्तपणा जाणवणे असा त्रास पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतो.- पाणी कमी घेतल्यास रक्तदाबाची समस्याही निर्माण होऊ शकते.- त्वचा रुक्ष कोरडी होणे, डोळे निस्तेज होणे, ओठ फुटणे असा त्रासही पाण्याचे प्रमाण कमी होत आहे, हे दर्शवतो.
पाणी पिण्याची योग्य पद्धत- पाणी नेहमी एकाजागी बसूनच प्यावे. उभ्या- उभ्या, चालत- चालत पाणी पिणे टाळावे.- पाणी कधीही गटागटा पिऊ नये. हळू हळू एक एक घोट घेत पाणी प्यावे.- खूप वेळ तहानलेले असणे आणि त्यानंतर एकदम दोन- तीन ग्लास पाणी पिणे अशी सवय चूकीची आहे.- तासाभरातून एकदा एखादा ग्लास पाणी घेत जावे.