वजन कमी करण्यासाठी डीटॉक्स ड्रिंक्सचा खूप फायदा होतो. पण डीटॉक्स ड्रिंक्स हे फक्त वजन कमी करतात असं नाही तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी डीटॉक्स ड्रिंक्सचा आपल्या रोजच्या आहारात समावेश असणं आवश्यक आहे. पाणी, औषधी वनस्पतींचा अर्क, मसाले, फळं आणि भाज्या यापासून तयार होणारे हे डीटॉक्स ड्रिंक्स आपल्या शरीरातील घातक विषारी द्रव्यं बाहेर काढून शरीर निरोगी आणि शुध्द राखायला मदत करतं. सहा प्रकारचे डीटॉक्स ड्रिंक्स आहेत जे आपल्या धावपळीच्या दिनक्रमात झटपट तयार करता येतात.
हळदीचा चहा
हळद म्हणजे पोषणमूल्यांचा खजिना. उत्तम आरोग्य राखण्यासाठी हळद महत्त्वाची असते. हळदीचा चहा प्यायल्यास पचन व्यवस्थित होतं. चयापचयाची क्रिया उत्तम चालते आणि वजनही कमी होतं.
हा चहा तयार करण्यासाठी भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्याला उकळी आणा. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आल्याचे तुकडे, पाव चमचा मिरे, एक चमचा मध घाला. मधून मधून हलवत राहा. पाणी आटून निम्म झालं की ते गाळून घ्या आणि गरम गरम प्या.
मध लिंबू आलं चहा
मधाचा गोडवा आणि आल्याचा तीव्र स्वाद यामुळे हा चहा आपल्याला एकदम ताजंतवानं करतो. शिवाय हा चहा पिल्यानं कफ, सर्दी आणि घशातील खवखव कमी होते.
हा चहा तयार करण्यासाठी तीन कप पाणी घ्यावं. ते उकळायला ठेवावं. पाण्याला उकळी येण्याआधी त्यात एक चमचा बारीक चिरलेलं आलं घालावं. पाण्याला उकळी आली की लगेच त्यात एका कपाला एक चमचा याप्रमाणे चहा पावडर , एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालावं. चहा गाळून घ्यावा आणि प्यावा.
संत्री काकडी डीटॉक्स वॉटर
हे डीटॉक्स वॉटर बाटलीत भरुन कोणत्याही वेळेस पिता येतं. ते तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारे लिंबू, काकडी, संत्री, आलं आणि पुदिन्याची पानं लागतात. 10 ग्रॅम संत्र्याच्या चकत्या, 10 ग्रॅम काकडीच्या चकत्या, 5 ग्रॅम लिंबाच्या चकत्या, 2 ग्रॅम पुदिन्याची पानं, दोन कप बर्फाचे तुकडे आणि 200 मिलि पाणी घ्यावं. एका ग्लासामधे पाणी घेऊन ही सर्व सामग्री त्यात घालावी. आणि अर्धा तास भिजू द्यावी. नंतर हे पाणी गाळून ते बाटलीत भरावं आणि दिवसभरात कधीही प्यावं.
पुदिना लिंबू नारळ पाणी
नारळाच्या पाण्यात पोषण मुल्यं भरपूर असतात. नारळाच्या पाण्याची पोषणमूल्यं वाढवण्यासाठी त्यात क जीवनसत्त्व आणि अँण्टिऑक्सिडण्टस हे घटक घालण्यासाठी त्यात लिंबू आणि पुदिना घालावा.
हे पाणी तयार करताना एक शहाळं घ्यावं. शहाळ्यातलं पाणी एका भांड्यात काढावं. शहाळ्यातली मलई चमच्यानं खरडून ती पाण्यात घालावी. पाण्यात पुदिना आणि एक चमचा मध घालावं आणि एक लिंबू पिळून घालावं. हे पाणी हलवून घ्यावं आणि प्यावं.
लेमोना
हे अतिशय चविष्ट पेय आहे. लिंबामुळे याला उत्तम स्वाद येतो. शिवाय ते आरोग्यदायी असून ते प्यायल्यानं चित्तवृत्ती प्रफुल्लित होते. मन शांत होतं. शिवाय ते झटपट अगदी दोन मिनिटात तयार होतं.
लेमोना तयर करण्यासाठी पाच लिंबं ,तीन मूठ पुदिन्याची पानं, अर्धा कप मध आणि बर्फाचा चुरा घ्यावा. हे सर्व साहित्य ब्लेण्डरमधे घालावं. त्यात भरपूर बर्फाचा चुरा घालावा आणि ते ब्लेण्ड करुन घ्यावं. लेमोना गार गारच प्यावं.
संत्री गाजर आलं डीटॉक्स ड्रिंक
या डीटॉक्स ड्रिंकमधे क जीवनसत्त्व, बिटा केरोटिन आणि तंतूमय घटक असतात. वजन कमी करण्यासाठी आणि पचन नीट होण्यासाठी हे पेय महत्त्वाचं आहे. ते तयार करण्यासही सोपं आहे. आणि ते दिवसभरात कधीही प्यायलं तरी चालतं.
ते तयार करण्यासाठी एक मोठं गाजर, दोन संत्री, अर्धा इंच हळ्कुंड पूड करुन, अर्धा इंच आलं किसून आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा. संत्र्याचा आणि गाजराचा रस स्वतंत्रपणे काढून घ्यावा. ब्लेण्डरमधे हे दोन्ही रस एकत्र करावेत. त्यात हळद आणि आलं घालावं. ते 30 सेकंद ब्लेण्ड करुन त्यात अर्धा लिंबू पिळावा. नंतर ते गाळून प्यावं.