Join us  

रात्री झोपताना दूध प्यावे की नाही? तज्ज्ञ सांगतात, दूध पिण्याची योग्य आणि लाभदायक वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 11:35 AM

Drinking Milk at Night is Good or Bad for Health : रात्री दूध कोणत्या वेळेला प्यावं? गार प्यावं की गरम अशा विविध प्रश्नांची उत्तरे

ठळक मुद्देथोडीशी जायफळ पावडर दूधात घालून घेतल्यास शांत आणि गाढ झोप यायला त्याची चांगली मदत होते. खूप गरम किंवा खूप गार दूध घेण्यापेक्षा कोमट दूध घेणे शरीरासाठी केव्हाही अधिक चांगले. 

सकाळच्या नाश्त्याला काय खायचं ते रात्री झोपताना दूध पिणं योग्य आहे की नाही असे आहाराशी निगडीत एक ना अनेक प्रश्न आपल्याला कायम पडतात. मग कोणत्या पदार्थातून शरीराला किती पोषण मिळते इथपासून ते तो पदार्थ कोणत्या वेळेला किती प्रमाणात खाल्लेला चांगला याबाबत आपण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेत असतो. लहान मुलांना आपण साधारणपणे जेवण झाल्यावर रात्री झोपताना दूध देतो. यामुळे त्यांना रात्रीतून भूक लागत नाही आणि गाढ, शांत झोप लागण्यास मदत होते. लहान मुलांसाठी हे योग्य असतेच पण मोठ्यांसाठीही रात्री झोपताना दूध पिणे अतिशय फायदेशीर असते. झोपताना दूध प्यायल्याने कफ होतो, तसेच रात्री दूध प्यायल्याने गॅसेस होण्याची शक्यता असते अशा शंकाही आपल्याला असतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ,. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देतात आणि दूध पिताना काय काळजी घ्यायला हवी हेही अतिशय नेमकेपणाने सांगतात (Drinking Milk at Night is Good or Bad for Health). 

(Image : Google)

१. कोणत्या महत्त्वाच्या घटकाची निर्मिती होते?

आयुर्वेदानुसार रात्री झोपताना आपण दूध पितो तेव्हा आपल्या शरीरातील ओजस वाढतो. ओजस या घटकामुळे शरीराची ताकद, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आनंद, समाधान या भावना वाढण्यासही ओजस तत्वाची मदत होते. त्यामुळे रात्री झोपताना दूध पिणे केव्हाही फायद्याचेच ठरते.

२. शास्त्रीयदृष्ट्या रात्री दूध पिण्याचे महत्त्व

दुधामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यातील एक घटक शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अतिशय गरजेचा असतो, तो घटक म्हणजे अमिनो अॅसिड. त्यालाच आपण ट्रीप्टोफॅन म्हणूनही ओळखतो. शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनीन या हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी हा घटक अतिशय गरजेचा असतो. सेरेटोनिनमुळे मन शांत होतं आणि मूड बूस्ट व्हायला मदत होते. तर मेलाटोनिन हा झोपण्याचा हार्मोन म्हणून ओळखला जातो. हे हार्मोन्स तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया व्यक्तीला शांत, गाढ झोप यावी यासाठी अतिशय उपयुक्त असते. 

३. दूध गरम, गार की कोमट असावं? 

आपण दूध गरम करतो तेव्हा त्यामध्ये अशा काही घटकांची निर्मिती होते ज्या घटकांमुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते. तसंच आपल्याला ताण नसतो तेव्हा आपल्याला अगदी सहज शांत झोप येण्यासाठी दूध उपयुक्त ठरते. तर रात्री दूध घेण्याचा आपल्या मानसिकतेशी अतिशय जवळचा संबंध असतो. दुधामुळे आपल्या मेंदूला एकप्रकारचा सूदींग सिग्नल जातो आणि झोप लागण्यास त्याची मदत होते. त्यामुळे खूप गरम किंवा खूप गार दूध घेण्यापेक्षा कोमट दूध घेणे शरीरासाठी केव्हाही अधिक चांगले. 

(Image : Google)

४. रात्री नेमकं कोणत्या वेळेला दूध प्यावं?

आपला दुसरा दिवस आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन सुरू व्हावा असे वाटत असेल तर रात्री झोपताना न चुकता दूध प्यायला हवे. त्यामुळे आयुर्वेद आणि मेडीकल सायन्स दोन्हीमध्ये रात्री झोपताना आवर्जून दूध प्यायला हवे असे सांगितले जाते. आता रात्रीचे जेवण झाल्यावर नक्की केव्हा दूध प्यावं असा प्रश्नही आपल्याला पडतो. तर जेवणानंतर साधारण १ ते १.५ तासाच्या अंतराने दूध घ्यायला हवं. नुसतं दूध आवडत असेल तर ठिक नाहीतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली तरी फायदेशीर असते. तर थोडीशी जायफळ पावडर दूधात घालून घेतल्यास शांत आणि गाढ झोप यायला त्याची चांगली मदत होते. 

५. रात्रीच्या दुधामुळे कफ होत असल्यास...

रात्री झोपताना दूध प्यायल्याने कफ होतो अशी अनेकांची तक्रार असते. काही प्रमाणात हे खरे असले तरी खूप गार दूध पिऊ नये. दूध एका लहान पातेल्यात काढून थोडे कोमट करुन मगच प्यायला हवे. तसेच दूध प्यायल्यावर त्यावर घोटभर कोमट पाणी आवर्जून प्यायला हवे. म्हणजे दुधाचे जे कण घशात अडकलेले असतात ते निघून जाण्यास मदत होते आणि कफ होत नाही.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सदूधआहार योजनाहेल्थ टिप्स