Join us  

चहा पिण्यानं कुठे वजन वाढतं? हा प्रश्न हसण्यावारी नेण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 4:52 PM

येता जाता चहा पिणाऱ्यांनी जरा सावध व्हावं. तज्ज्ञ सांगतात जास्त चहा प्यायल्यानं (drinking tea cause weight gain) वजन वाढतं. चहा पिऊन वजन वाढू द्यायचं नसेल तर.. 

ठळक मुद्देचहात वापरली जाणारी रिफाइण्ड साखर वजन वाढीसाठी धोकादायक असते. चहा करताना फॅटयुक्त दुधाचा वापर टाळायला हवा. 

बहुतेकजणांचं सकाळचं आवडीचं पेय म्हणजे चहा. चहा प्याल्याशिवाय दिवसच सुरु होत नाही अशी अनेकांची अवस्था. तर दिवसभर कामातला मूड, ऊर्जा टिकून राहाण्यासाठी, छोट्या मोठ्या गोष्टींचं सेलिब्रेशन करण्यासाठी दिवसभर 5 ते 6 कप चहा पिणारेही खूप असतात. अशांना जर कोणी सांगितलं की चहा पिणं कमी करा, चहा प्याल्यानं (drinking tea cause weight gain) वजन वाढतं तर त्यांना हे खरंच वाटणं अशक्य. चहा प्याल्यानं एनर्जी वाढते, वजन नाही अशीच उत्तरं मिळण्याची शक्यता जास्त . पण चहा प्याल्यानं खरंच वजन वाढतं का( how tea is responsible for weight gain)  याबाबत पोषण आणि आहार तज्ज्ञ  गरिमा गोयल काय म्हणतात हे वाचल्यास वजन वाढण्याचा आणि चहाचा काय संबंध याचं उत्तर नक्की मिळेल. 

Image: Google

चहा प्याल्यानं वजन वाढतं?

गरिमा गोयल यांच्या मते चहा प्याल्यानं वजन वाढतं की नाही हे चहा करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर अवलंबून असतं. पारंपरिक पध्दतीनं केल्या जाणाऱ्या चहामध्ये दूध आणि साखर यांच वापर केलेला असतो. दूध आणि साखरेशिवायचा चहा अशी कल्पनाही अनेकांसाठी अशक्य असते. पण दूध आणि साखरेच्या समावेशामुळेच चहानं वजन वाढतं. चहामधे वापरली जाणाऱ्या रिफाइंड साखरेनं चहातील कॅलरी वाढतात. चहासाठी जास्त फॅट्स असलेलं दूध वापरलं तर अशा दुधाचा चहा खूप वेळा प्याल्यानं वजन वाढतं. गरिमा गोयल यांच्या मते जर एखादी व्यक्ती फॅट्स नसलेलं दूध आणि अर्धा चमचा साखर घालून रोज चहा पित असेल तर वर्षभरात त्या व्यक्तीचं 1 किलो वजन वाढतं. या नियमाप्रमाणे जी व्यक्ती फॅटयुक्त दुधाचा चहा रोज 2 ते 3 कपांपेक्षा जास्त पित असेल तर त्या व्यक्तीचं वजन निश्चित वाढेल.

चहा पिऊन वजन वाढू नये म्हणून..

रोज प्रमाणात चहा प्याला तर त्याचा परिणाम वजनावर होत नाही. चहा प्याल्यानं वजन वाढू नये यासाठी चहा पिताना काही पथ्यं पाळावी लागतात. 1. चहा पिऊन वजन वाढू नये यासाठी चहामध्ये साखर घालू नये अथवा घातल्यास ती अगदी कमी प्रमाणात घालावी. चहामध्ये साखर न घालता आर्टिफिशियल स्वीटनर्स घालत असल्यास त्याचं प्रमाण अगदी कमी असावं. रिफाइण्ड साखर आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स याऐवजी चहात गूळ, मध, खडीसाखर यांचा वापर करावा. 

Image: Google

2. चहामध्ये फॅटयुक्त दूध वापर नये. यामुळे चहातील कॅलरीज कमी होतात.  दूध घालून केल्या जाणाऱ्या चहामध्ये लो फॅट  किंवा स्किम्ड दूध वापरावं. चहासाठी दुधाच्या पावडरचा वापर टाळावा. कारण यात मुळातच साखर असते. 

3. चहामध्ये औषधी वनस्पती आणि मसाले टाकल्यास अशा चहाचा उपयोग वजन कमी होण्यासाठी होतो. चहामध्ये तुळस, आलं, दालचिनी, वेलची, लवंग, जायफळ या औषधी घटकांचा वापर केल्यास चहामधून शरीराला पोषक घटक मिळतात. यामुळे चयापचय क्रिया गतिशील होते. यातून वजन कमी होतं.

Image: Google

प्रमाणात चहा प्याल्यास

गरिमा गोयल यांच्या मते प्रमाणात चहा प्याल्यास त्याचा आरोग्यास फायदा होतो. कारण चहामध्ये कॅटेचिन नामक फ्लेवोनाॅइड असतात. हा घटक शरीरातील चरबीच्या रेणुंचं विभाजन करतो. कॅटेचिनमुळे चयापचय क्रिया वाढते. चहामधील कॅॅफीनमुळे शरीरातील उष्मांक जळतात. चहा आरोग्यास फायदेशीर होण्यासाठी दिवसातून 1 किंवा 2 कपच चहा प्यावा. नेहेमीच्या दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्याल्यास तो आरोग्यास जास्त फायदेशीर ठरतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स