वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
पाण्याचं सर्वसाधारण प्रमाण किती असावं , पाणी कधी प्यावं याविषयी खूप गोंधळ असतो. त्यात हल्ली सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी प्या म्हणून व्हाॅट्सॲप मेसेज येतात. ते वाचून अनेकजण स्वत:वर प्रयोग सुरु करतात.
सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिणं चांगलं असतं म्हणून सकाळी पाणी प्यावं यावर विश्वास ठेवतात. मात्र सरसकट तसं करण्यापेक्षा थोडं विचारपूर्वक प्यायलं तर अधिक चांगला परिणाम मिळेल. खरंतर ज्यांना वारंवार सर्दी होते, उठल्यावर बऱ्याच शिंका येतात, प्रकृती थोडी स्थूल असते, प्रवृत्ती वजन वाढण्याची असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी उठून गार पाणी प्यायल्यानं त्यांचा त्रास वाढू शकतो. पण जर त्यांना मलावष्टंभसारखी तक्रार असेल, पोट साफ होत नसेल तर एक ग्लास कोमट पाणी पिण्यास हरकत नाही.
(Image : Google)
मध-पाणी आणि लिंबू
वजन कमी करायचं असल्यास साध्या फिल्टरच्या पाण्यात दोन चमचे चांगल्या दर्जाचं मध घालून प्यावं. (बनावट मध असल्यास वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढू लागते कारण त्यात नुसती साखर असू शकते.गरम पाण्यात मध मिसळू नये कारण त्याचं विघटन होऊन, वजन कमी करण्याचा मधाचा गुणधर्म उपयोगी पडत नाही.) मध पाण्यात अर्धा/ एक अशा प्रमाणात लिंबू पिळून ते पाणी पिऊ नये. कारण त्यानं बऱ्याच जणांचं पित्त वाढतं. शिवाय आंबट रस अतिरेकी प्रमाणात रोज पोटात गेल्यानं केस गळणं, पांढरे होणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं आणि इतर अकाली वार्धक्याची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे वजन कमी करायचं म्हणून सरसकट मध-लिंबू पाणी पिऊ नका.
(Image : Google)
कोमट पाण्यात गायीचं तूप
नेहमीच त्वचा कोरडी पडणं,पोट साफ न होणं, कडक मलप्रवृत्ती होणं, पोट फुगणं, दुखणं, गॅसेस होणं, खूप ढेकर येणं , सांधे दुखणं किंवा हालचालींच्यावेळी कटकट वाजणं अशा तक्रारी असतील तर सकाळी कोमट पाण्यात एक ते दीड चमचा गायीचं तूप घालून प्यावं. यामुळे त्वचा छान मऊ होते, पोट विनासायास साफ होते, गॅसेस कमी होतात.
सकाळी उपाशीपोटी जे पाणी प्यायचं त्याचं प्रमाण मात्र निश्चितच एका ग्लासपेक्षा जास्त नको! एक तांब्या, एक लिटर अशा प्रमाणात सकाळी उठल्यावर पाणी पिणारे अनेकजण आहेत. पण त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटे भोगणारेही खूप आहेत.
(Image : Google)
पाणी पिण्याच्या चुका आणि त्रास
ज्यांना वारंवार सर्दी होण्याची तक्रार असते आणि बरेचवेळा त्याचं कारण सापडत नाही त्यावेळी बहुतांश वेळा रात्री झोपताना दोन दोन ग्लास पाणी पिणं हे कारण रूग्णांशी बोलताना सापडतं ,जे त्यांच्या लेखी काहीच महत्वाचं नसतं ! अशा वेळी नुसतं हे पाणी पिणं बंद केलं तरी सर्दीचा त्रास कमी होतो, दम्याचे अटॅक्स येणं येणं कमी होतं.
लक्षात ठेवण्याची महत्वाची बाब अशी आहे की जसं पृथ्वीवर पाणी जास्त आणि जमीन कमी आहे त्याप्रमाणोच आपल्या शरीरात देखील इतर घन गोष्टींपेक्षा पाण्याचं प्रमाण खूप अधिक आहे त्यामुळे त्याचा बॅलन्स टिकवणं खूप आवश्यक आहे अन्यथा ते जास्त पाणीसुद्धा अनेक आजाराचं मूळ कारण ठरु शकतं!
नळ सोडला की पाणी मिळतं म्हणून त्याचं मोल आपण लक्षात घेत नाही पण ‘ जल ही जीवन है’ ही उक्ती कायम लक्षात ठेवून या अनमोल देणगीचा आपण आदर ठेवायला हवा !
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)