फिटनेससाठी धडपडणारे वजन कमी करण्यासाठीही खूप प्रयत्न करत असतात. पण अनेकांचे प्रयत्न हे ऐकीव आणि वाचलेल्या पाहिलेल्या माहितीवर अवलंबून असतात. यात तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नसतो. डाएटसंबंधीची निनावी माहिती सतत समाज माध्यमांवरुन फिरत असते. त्याची खातरजमा न करताच अनेकजण या डाएटच्यामागे लागतात आणि आरोग्याचं नुकसान करुन घेतात.
आरोग्य कमावणं, वजन कमी करणं, नियंत्रित करणं या गोष्टी अतिशय सुजाणपणे करण्याच्या गोष्टी आहेत. वजन कमी करण्यात उपवासाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरु शकते. हा उपवास धर्म आणी संस्कृतीशी संबंधित नसून आपल्या आरोग्याशी आणि शरीराशी संबंधित आहे. पण इथेही अनेकजण चुकीच्या पध्दतीने उपवास करुन स्वत:च्या आरोग्याचं नुकसान करुन घेतात. उपवास म्हणजे काहीच न खाणं, दिवसभर उपाशी राहाणं अशा प्रकारच्या उपवासानं शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. असा प्रकारचा उपवास हा चुकीचा असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
वजन कमी करण्यात उपवास हा महत्त्वाचा असतो. तो योग्य पध्दतीनं करण्याचा मार्ग माहित असायला हवा. असा एक मार्ग समग्र जीवनशैलीचे जागतिक स्तरावरील प्रशिक्षक ल्यूक कॉन्टिन्हो यांनी सांगितला आहे. त्यांनी एका फेसबुक लाइव सेशनमधे ‘ड्राय फास्टिंग’बाबत सविस्तर माहिती दिली. ल्यूक म्हणतात की, उपवास जर योग्य पध्दतीने केला तर शरीराची आतून दुरुतीे होते शिवाय आरोग्यही नीट राहातं. शरीरातील सर्व अवयवांचं कार्य नीट होण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन किंवा प्रयत्नाची गरज असते. हा उद्देश ‘ ड्राय फास्टिंग’द्वारे साधला जातो.
छायाचित्र- गुगल
ड्राय फास्टिंग म्हणजे?
ल्यूक कॉन्टिन्हो यांनी सांगितलेलं हे ड्राय फास्टिंग म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत काहीही खाऊ पिऊ नये. हा उपवास एक प्रकारचं आव्हान असतं. यासाठी आपल्या शरीराची तयारी करावी लागते. ही तयारी दिवसभरात 8 ते 14 ग्लास पाणी पिल्याने होते. यामुळे शरीरात ओलावा निर्माण होतो. तज्ज्ञ म्हणतात की ड्राय फास्टिंगमधे रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या वेळेस किंवा सूर्यास्त झाल्यानंतर एक तासाच्या आत करावं. जेवण झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळपर्यंत तोंडाला कुलुप लावावं. त्यानंतर काहीही खाऊ पिऊ नये. हे डाएट करताना काहींना सुरुवातीला नीट झोप लागली नाही असा अनुभव येऊ शकतो पण ल्यूक म्हणतात की तरी लगेच हार मानून मागे फिरु नये. पाच सहा दिवसात या डाएटिंगची सवय होते.
छायाचित्र- गुगल
ड्राय फास्टिंगचे फायदे काय?
1. साखरेचे पदार्थ खाण्याची, चहा कॉफी पिण्याची इच्छा कमी होते.
2. या फास्टिंगमुळे भूक नियंत्रित राहाते त्यामुळे वजन कमी होण्यास चालना मिळते.
3. ड्राय फास्टिंगमधे नियमित अंतराने खाल्ल्याने शरीराला एका नियमित चक्राचं पालन करण्याची सवय लागते.
4. शरीरात काम करण्याची ऊर्जा वाढते.
5. कामातील एकाग्रता वाढते. दृष्टीकोन सुधारतो.
6. ड्राय फास्टिंग केल्यानं ध्यानधारणा आणि योग उत्तम प्रकारे करता येतो.
7. त्वचा आणि केसांसंबंधीच्या समस्या दूर होतात.
8. शरीरातील सूज कमी होण्यास ड्राय फास्टिंगमुळे मदत होते.
9. ‘द न्यू इंग्लड र्जनल ऑफ मेडिसिन’ने प्रकाशित केलेल्या एका शोधानुसार ड्राय फास्टिंगमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. या प्रकारच्या फास्टिंगमुळे आयुर्मान वाढतं. प्रमाणापेक्षा जास्त असलेलं वजन कमी होतं, कॅन्सर, मधुमेह, हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
ड्राय फास्टिंग यांच्यासाठी नाही.
ल्यूक म्हणतात की ड्राय फास्टिंग हे वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगलं असलं तरी आधी आपलं शरीर समजून घेणं आवश्यक आहे. आपली स्वयंप्रतिकार शक्ती ही जर कमी असेल किंवा थायरॉइडसंबंधी आजार असेल तर 12 तासांचं हे ड्राय फास्टिंग या लोकांसाठी नुकसानदायक ठरु शकतं. तरीही काहींना हे ड्राय फास्टिंग करुनच पाहायचं असेल तर मग 12 तास उपाशी राहाण्याऐवजी आठ तास उपवास धरावा.