Join us  

पोटभर नाश्ता केला तरी मधल्यावेळेत काहीतरी खावंसं वाटतं? ३ हेल्दी पदार्थ- छोट्या भूकेसाठी खास खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 11:25 AM

Easy and Healthy Options for Mid Meal : चहा-कॉफी हा मधल्या वेळेसाठी अजिबात योग्य पर्याय नसतो...

ठळक मुद्देनाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळात आपल्याला काहीतरी खावसं वाटतंच...अशावेळी तोंडात घालू शकतो असे हेल्दी पर्याय काय असू शकतात याविषयी...

आपल्यापैकी बहुतांश जण सकाळी उठल्यावर पोटभर नाश्ता करतात आणि मगच घराबाहेर पडतात. मात्र ऑफीसला गेल्यावर साधारण ११ ते १२ वाजताच्या दरम्यान आपल्याला परत काहीतरी खायची इच्छा होते. किमान १ कपभर चहा किंवा कॉफी तरी आपण आवर्जून घेतोच. ही वेळ अशी असते की लगेच जेवायचंही नसतं आणि तरी काहीतरी तोंडात घालायला किंवा प्यायला हवं असतं. मात्र यावेळी आपण चिप्स वेफर्स असं काही खाल्ल तर विनाकारण कॅलरीज पोटात जातात आणि शरीराला अनावश्यक घटक पोटात जाऊन वजन वाढण्याच्या समस्येत वाढ होते. इतकंच नाही तर चहा घेतल्याने तरतरी वाटते पण जेवणाची भूक मरते आणि अॅसिडीटी वाढण्याचीही समस्या असते. अशावेळी झटपट तोंडात टाकता येतील आणि तरी आरोग्यासाठी चांगल्या अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (Easy and Healthy Options for Mid Meal). 

(Image : Google)

१. दाणे, फुटाणे, सुकामेवा 

अगदी सहज उपलब्ध असणारा आणि आपण घरात, ऑफीसला किंवा अगदी बाहेर असू तरी सोप्या पद्धतीने कॅरी करु शकू असे हे पर्याय आहेत. सोबत नेले नाही तरी अगदी कुठेही विकत मिळतील अशा या गोष्टी. दाणे, सुकामेवा यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. तसेच फुटाणेही आरोग्यासाठी अतिशय चांगला पर्याय असतो. यामुळे कुरकुरीत काहीतरी खाल्ल्यासारखेही वाटते, एनर्जी मिळते आणि मधल्या वेळच्या खाण्याचीही सोय होते. सुकामेवा मात्र भाजून किंवा भिजवून खायला हवा. 

२. फळं 

फळं हा मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते. तसेच फळांमध्ये विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे मधल्या वेळात भूक लागली तर फळं खाणं हा चांगला पर्याय होऊ शकतो. 

३. लाडू 

एरवी आपण नाश्त्याला किंवा जेवणात लाडू खातोच असं नाही. पण राजगिरा, मुरमुरा, दाण्याचा लाडू, खजूर लाडू पौष्टीक लाडू, नाचणीचा किंवा रव्याचा, बेसनाचा लाडू हे लाडू मधल्या वेळात खाण्यासाठी चांगले असतात. आपण घरातही हे लाडू बनवू शकतो. पण आजकाल बाजारातही हे लाडू सहज मिळतात. त्यामुळे मधल्या वेळेत खाण्यासाठी हा हेल्दी आणि चांगला पर्याय ठरतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यआहार योजना