Join us  

जेवण झाल्यावर न चुकता करा १ गोष्ट, कधीच वाढणार नाही पोटाचा घेर, राहाल एकदम फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 5:26 PM

Easy remedy for reducing excess belly fat : खूप जास्त कष्ट घेण्यापेक्षा नियमितपणे ठरवलेली गोष्ट करणे ठरेल फायदेशीर...

पोटाचा वाढता घेर ही अनेकांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या असते. अगदी वयाच्या तिशीपासून ते सत्तरीपर्यंतच्या सगळ्यांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. महिलांमध्ये व्यायामाचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन, बैठे काम, खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे पोटावरची चरबी वाढत जाते. ही चरबी एकदा वाढायला लागली की ती काही केल्या कमी होत नाही (Easy remedy for reducing excess belly fat).

मग काही जण यासाठी खूप व्यायाम करणे, डाएट फॉलो करणे किंवा आणखी काही ना काही उपाय करतात. पोटाचा घेर वाढलेला आरोग्यासाठी तर चांगला नसतोच पण त्यामुळे तुमच्या सौंदर्यातही बाधा येते. वाढलेल्या घेरामुळे फॅशनेबल कपडेही घालता येत नाहीत. अशावेळी पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी एक सोपा उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो . 

उपाय काय? 

चालणे हा सर्वोत्तम व्यायाम नसला तरी तो एक चांगला व्यायाम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र तरीही आपल्याकडून चालण्याचा कंटाळा केला जातो किंवा अनेकदा वेळेचे कारण दिले जाते. पण जेवण झाल्यावर न चुकता चालणे हा पोटाचा घेर कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. यामध्ये सातत्य ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक जेवण झाल्यावर किमान २० मिनीटे चालल्याने शरीरात चरबी साठून राहण्याची समस्या कमी होते. पोट, कंबर, मांड्या हे चरबी साठण्याची महत्त्वाचे भाग असतात. पण चालल्याने चलनवलन होते आणि स्नायूंची हालचाल झाल्याने चरबी साठण्याची शक्यता नक्कीच कमी होते.

 दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर संथपणे न चालता नीट चालल्यास महिन्याला तुमचे ठराविक किलो वजन कमी होण्याचीही शक्यता असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते तसेच इन्शुलिनची पातळी आटोक्यात राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही चालण्याचे वेगवेगळे पर्याय अवलंबू शकता. कधी फोनवर बोलत, कधी दिवसातून ३ वेळा १५-१५ मिनीटे चालणे तर कधी ५ ते १० मिनीटांचा पॉवर वॉक घेणे. उंचावर किंवा चढाई असलेल्या ठिकाणी चालणे, पोटाचा म्हणजेच कोअरचा भाग घट्ट करुन चालणे यामुळेही तुमच्या पोटवर चरबी साठण्याचे प्रमाण नक्कीच आटोक्यात येते.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य