वजन वाढवणं एकवेळ सोपं आहे पण वाढलेलं वजन कमी करणं हा खूप मोठा टास्क असतो. कारण एकदा शरीरावर चरबी साठण्याची सवय झाली की ही चरबी साठतच जाते. मग ही चरबी कमी करणे हा मोठा टास्क होतो. वाढलेलं वजन कमी कसं करायचं असा प्रश्न अनेकांपुढे असतो. अनेक जण वजन कमी करण्यासाठी खाणं कमी करतात, सकाळ-संध्याकाळ चालतात किंवा अन्य काही व्यायामही करतात. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. पोट, मांड्या आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी काही नेमका व्यायाम करण्याची आवश्यकता असते. हा व्यायाम कोणता असायला हवा आणि तो कधी कसा करायला हवा याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या टिप्स कोणत्या ते पाहूया (Easy Weight loss tips)...
सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम...
सूर्यनमस्कार हा सर्वांगाला होणारा उत्तम व्यायामप्रकार असून यामुळे अवयवांचे स्ट्रेचिंग तर होतेच पण वाढलेले वजन कमी करण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. योगअभ्यासात सूर्यनमस्काराला विशेष महत्त्व असून या व्यायामाचे असंख्य फायदे सांगितले आहेत. सूर्यनमस्कार हा १२ विविध पोझेसचा संच असून त्यामुळे संपूर्ण शरीराचा अतिशय उत्तम असा व्यायाम होण्यास मदत होते. सूर्यनमस्कार एका विशिष्ट लयीत केले जात असल्याने वाढलेली चरबी कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.
सूर्यनमस्कार करताना श्वासाचे गणित सांभाळले जाते, स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते आणि परिणामी वजन नियंत्रणात येण्यासही याचा चांगला फायदा होतो. मात्र सूर्यनमस्कारामधील प्रत्येक व्यायामाची ठेवण योग्य असणे आणि श्वासोच्छवासाकडे लक्ष देणे गरजेचे असते. मात्र वजन कमी करायचं म्हणून खूप वेगाने नमस्कार घालण्याची आवश्यकता नाही. तर काही सूर्यनमस्कार झाल्यावर मधे थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे. तसेच प्रमाणापेक्षा जास्त किंवा खूप ताण पडेल अशा पद्धतीने सूर्यनमस्कार घालू नयेत. त्यामुळे नियमितपणे सूर्यनमस्काराचा सराव केल्यास त्याचा वजन कमी करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होतो.