शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करायची तर आपल्याला त्याचा ताण येतो. खाताना किंवा एरवी आराम करताना आपण या गोष्टीचा विचार केलेला नसतो. पण वजन वाढता वाढता वाढे व्हायला लागते तेव्हा मात्र काय करावं हे आपल्याला समजत नाही. नेमकी कुठून सुरुवात केल्यावर हे वाढलेले वजन आटोक्यात येईल हेच आपल्याला समजत नाही. मग कधी सकाळी उठून काढे पिण्यापासून ते आहारात अनेक गोष्टींवर बंदी घालण्यापर्यंत असंख्य उपाय केले जातात. पण व्यायामाला पर्याय नाही हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. नुसता चालण्याचा व्यायाम करुन अशावेळी उपयोग नसतो. तर अशावेळी स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्याची आवश्यकता असते. अगदी घरात काही मिनिटांमध्ये आपण हे व्यायाम अगदी सहज करु शकतो. मात्र त्यासाठी फक्त नियमितता आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते. पाहूयात दिवसात अगदी १५ ते २० मिनीटे काढून सहज करता येतील असे व्यायामप्रकार कोणते. हे व्यायाम केल्याने पोट, कंबर आणि मांड्या यांच्यावरची चरबी कमी होणार असेल तर त्याकडे गांभिर्याने लक्ष द्यायला हवे (Easy Weight Loss Workout at Home).
१. जॉगिंग हा अतिशय उपयुक्त आणि सोपा व्यायाम असून त्यासाठी फारशी जागाही लागत नाही. आहे त्याच जागेवर दोन्ही पायाने किंवा एका-एका पायाने उड्या मारल्यास त्याचा फॅट बर्निंगसाठी चांगलाच फायदा होतो.
२. दोरीच्या उड्या हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे. त्यामुळे आपले फॅटस बर्न होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. यामध्येही तुम्ही एका पायाने, दोन्ही पायाने अशी व्हेरीएशन्स करु शकता.
३. पायऱ्यांवर एक-एक पायाने उड्या मारणे हा आणखी एक सोपा व्यायामप्रकार आहे. पायऱ्या आपल्या घराच्या बाहेर अगदी सहज उपलब्ध असणारी गोष्ट असल्याने त्यासाठी फार वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
४. दोन्ही पाय बाजूला आणि हात वरच्या दिशेने डोक्यावर असे करत ३० सेकंद सलग उड्या मारल्यास त्यामुळे चरबी घटण्यास मदत होते. या व्यायामाचे सुरुवातीला किमान २ सेट मारावेत आणि नंतर संख्या वाढवत न्यावी.
५. गुडघ्यातून पूर्ण खाली बसत उठताना एक उडी मारायची. हा व्यायामप्रकार करत असताना गुडघ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्यायला हवी. हे व्यायाम खूप ताण घेऊन न करता सहज जमायला हवेत.
६. पाय मांडीतून वर घेत गुडघ्यातून पायाचा काटकोन करावा. दोन्ही हातांनी मांडीच्या खाली टाळी वाजवावी. एकदा एका पायाने आणि एकदा एका पायाने असे करावे त्यामुळे चांगलाच व्यायाम होतो. किमान २ मिनीटे हा व्यायाम करायला हवा.