निरोगी आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा. आहारातला घटक मोठा असो की लहान, तो आकारानं महत्त्वाचा नसतो तर त्यातील गुण महत्त्वाचे असतात. आकारानं अगदीच लहान असलेले तीळ पौष्टिक बिया म्हणून ओळखल्या जातात. हे तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर थंडीच्या दिवसात रोज 2 छोटे तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात.
छोट्याशा झाडाला येणारे तीळ त्वचेसारख्या नाजूक घटकाचं संरक्षण करण्यापासून ते हदयासारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. तिळगुळाचे लाडू म्हणजे संक्रातीला आणि हळदी कुंकवाला वाटण्याचा प्रतिकात्म पदार्थ नसतो. तर तिळासारखा छोट्या वाटणाऱ्या घटकातून आरोग्य जपण्याचा चविष्ट पर्याय म्हणजे लाडू हे यातून सांगितलं जातं. आपल्या एरवीच्या इतर लाडुंच्या तुलनेत तिळाचे लाडू हे अगदी लहान केले जातात. पण ते लहान यासाठीच असतात कारण आपल्या आरोग्यासाठी तीळ महत्त्वाचे असले तरी तीळ आणि तिळाचे पदार्थ हे प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरतात.
Image: Google
एक छोटासा तिळाचा लाडू खाल्ल्यानं नेमकं काय होतं, शरीराला कोणते घटक मिळतात,आरोग्याला तिळाचे लाडू खाण्याचा फायदा होतो तो कसा, याबाबत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर तिळाच्या लाडुंचा फोटो टाकून तिळाच्या लाडुंचे फायदे सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. संक्रातीनिमित्त आणलेले तीळ नंतर घरात तसेच पडून राहातात. ते खराब होतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही. आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असलेले तीळ असे वाया न घालवता त्याचे तीळ लाडू करुन ठेवावेत. मोठ्यांच्या आरोग्यापासून लहानांच्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारे हे तिळाचे लाडू खाणं खूप महत्त्वाचे आहे असं ऋजुता सांगतात.
Image: Google
का महत्त्वाचे असतात तिळाचे लाडू?
1. तिळाच्या आरोग्यदायी गुणधर्मावर झालेलं संशोधन सांगतं, की तिळामधे फिटोस्टेरोल्स हा घटक असतो. या घटकामुळे शरीरातलं बॅड कोलेस्ट्राॅल कमी होतं. कोलेस्ट्राॅलचं प्रमाण नियंत्रित ठेवून हदयाचं आरोग्य जपण्याचं कार्य हा घटक करतो. म्हणून तिळाचा लाडू हदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.
2. तिळाच्या लाडुद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात फॅटस मिळतात. याचा फायदा शरीराला ऊर्जा मिळण्यास होतो. काम करण्याचा कंटाळा आल्यास तोंडात तिळाचा लाडू अवश्य टाकावा, यामुळे काम करण्याची ताकद मिळते.
Image: Google
3. तिळामधून पाॅलिअनसॅच्युरेटेड म्हणजे जे विरघळून त्याचं फॅटसमधे रुपांतर होत नाही असे फॅटी ॲसिड असतात. हे फॅटी ॲसिड म्हणजे एक प्रकारचे ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच तिळामधून ओमेगा 6 हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. आहारात असे खूप कमी घटक आहेत जे ओमेगा 6 हा घटक शरीरास देतात. त्यात तिळाचा समावेश आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून तिळातील इतर महत्त्वाच्या घटकांचा फायदा चविष्ट् स्वरुपात करुन घेण्यासाठी म्हणूनच तिळाचा लाडू खाण्याला महत्त्व आहे.
4. तिळाचा लाडू खाल्ल्यास रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात. त्याचा फायदा म्हणजे लहान मोठ्या संसर्गजन्य रोगांपासून आपलं संरक्षण होतं.
Image: Google
5. आहारात पाॅलिश तीळ न वापरता अनपाॅलिश्ड कमी पांढरे असणारे तीळ आणि काळे तीळ वापरणं फायद्याचं ठरतं. या दोन प्र्कारच्या तिळामधे कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळेच तिळाचे लाडू खाण्याचा फायदा हाडांना कॅल्शियम हा महत्त्वा घटक मिळण्यात होतो.
6. तिळामधे असलेलं मॅग्नेशियम इन्शुलिन निर्मिती आणि रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करतं. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही तिळाचा उपयोग होतो. रक्तदाब आणि मधुमेहाशी निगडित समस्यांचा धोका टाळण्यासाठी रोज एक किंवा दोन तिळाचे लाडू खाणं फायदेशीर ठरतं.
7. तिळामधे तेलाचा अंश मोठ्या प्रमाणात असतो. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेलधर्मीय तीळ फायदेशीर ठरतात. केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी तिळाचा लाडू खाल्ल्याने तिळातील गुणधर्माचा फायदा मिळतो.
8. तिळाचे लाडू प्रमाणात खाल्ले तर तिळात असलेल्या आहारीय तंतू घटकांचा अर्थात डायटरी फायबर्सचा उपयोग होतो. यामुळे पचन क्रिया सुधारते. चयापचय सुधरुन त्याचा फायदा वजन कमी होण्यास आणि पचनाशी निगडित समस्या सोडवण्यासाठी होतो. हा फायदा मिळवण्यासाठी तिळाचा एक किंवा दोन लाडूच खावेत. त्यापेक्षा जास्त लाडू खाणे म्हणजे आरोग्यावर विपरित परिणाम करुन घेतल्यासारखे होईल असं ऋजुता म्हणतात.
9. केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर मनाच्या आरोग्यासाठीही तिळ लाडू खाण्याचा फायदा होतो. तिळामधे टाइरोसिन नावाचं अमिनो ॲसिड असतं. या घटकाचा संबंध सेरोटोनिन या हार्मोन्सशी असतो. हा घटक जर शरीरात पुरेशा प्रमाणात असला तर शरीरात सेरोटोनिन अर्थात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. म्हणूनच तिळाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या मूडकडे लक्ष ठेवावं. तिळाच्या लाडूनं मूड चांगला, उत्साही आणि आनंदी झाल्याचं लक्षात येईल.
Image: Google
तिळाच्या लाडुचे प्रकार
तिळाचे लाडू बाराही महिने बाहेर दुकानात मिळत असले तरी ते घरी तयार करुन खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच दुकानात मिळणाऱ्या लाडूचं पॅकिंग जुनं असलं तर लाडू कडू चवीचेही लागतात.घरच्याघरी तिळाचे लाडू करणं अवघड गोष्ट नाही. हे लाडू करण्याचे काही सोपे प्रकार आहेत.
1. आख्ख्या तिळाचे लाडु केवळ गुळ घालून करता येतात. त्यासाठी 100 ग्रॅम तिळ, थोडं साजूक तूप, 200 ग्रॅम गूळ आणि एक कप पाणी घ्यावं. आधी तीळ कढईत कोरडे खमंग भाजून घ्यावेत. ते भाजले की थंड होईपर्यंत कढईत थोडं तूप घालून त्यात गूळ घालावा. गूळ विरघळून त्याचा पाक करावा. पाक गोळीबंद होण्याआधी त त्यात भाजून ठेवलेले तीळ घातल्यास हे लाडू जास्त कडक होत नाही.सहज खाल्ले जातात. कडक लाडू हवा असल्यास गुळाचा पाक गोळीबंद असावा. तसेच गुळाच्या पाकात तिळासोबतच शेंगदाणे खरपूस भाजून ते थोडे ओबड धोबड करुन त्यात घातल्यास लाडू आणखी खमंग लागतात आणि लाडुची पौष्टिकताही वाढते.
2. तिळाचे सुकामेवा घालूनही लाडू करता येतात. त्यासाठी 2 कप तीळ, 1 कप गूळ, 2 मोठे चमचे काजू, 2 मोठे चमचे बदाम, 7-8 वेलचींची पूड आणि 2 छोटे चमचे साजूक तूप घालावं.
यापध्दतीने लाडू करताना तीळ कढईत खमंग भाजावेत. तीळ भाजताना नेहमी गॅसची आच मंद किंवा मध्यम असावी. तीळ तडतडू लागले की गॅस बंद करावा. तीळ भाजताना तीळ सतात चमच्यानं हलवत राहावे नाहीतर ते काळे होतात. भाजलेले तीळ एका ताटात काढून ते थोडे थंड होवू द्यावे. भाजलेल्या तिळातून निम्मे तीळ काढून ते ओबड थोबड बारीक करुन घ्यावेत.
Image: Google
नंतर एका पातेल्यात एक चमचा तूप टाकून गरम करावं. तूप गरम झालं की त्यात गूळ घालावा. गूळ वितळू द्यावा. गूळ वितळला की गॅस बंद करावा आणि वितळलेला गूळ थंड होवू द्यावा. नंतर यात भाजून थोडे वाटून घेतलेले तीळ आणि आख्खे तीळ, सर्व सुक्या मेव्याची पूड घालवी. वेलची पूड टाकून सर्व नीट हलवून घ्यावं. मिश्रण एका ताटात काढून घ्यावं. ते थोडं थंड झालं की हाताला तूप लावून लाडू वळावेत. हे लाडू खमंग आणि पौष्टिक होतात.
3. अख्ख्या तिळाचे लाडू आणखी एका पध्दतीने छान होतात. यासाठी पाऊन कप तीळ, अर्धा कप साधा गूळ किंवा चिक्कीचा गूळ , पाव कप खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा वेलची पूड, एक चमचा दूध आणि एक चमचा साजूक तूप घ्यावं.
कढईत तीळ घालून ते खमंग भाजावेत. नंतर तीळ काढून घेऊन कढईत एक चमचा साजूक तूप घालावं. ते विरघळलं की गूळ टाकून तो वितळावा. गूळ वितळण्यास 3-4 .मिनिटं लागतात. गूळ वितळला की त्यात एक चमचा दूध घालून गूळ चांगला हलवून घ्यावा. दोन तीन मिनिटांनी गॅस बंद करावा. नंतर त्यात वेलची पूड घालावी, तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालावा. हे चांगलं मिसळलं की हाताला तूप लावून मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळावेत.
4. अख्ख्या तिळाच्या लाडू इतकेच तिळकुटाचे लाडू देखील चवीन खमंग आणि गुणकारी असतात. तिळकुटाचे लाडू करताना 2 वाट्या तीळ, 1 वाटी शेंगदाणे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावेत. ते गार झाल्यावर मिक्सरमधून स्वतंत्र वाटून कूट करावा. थोडंसं तूप कढईत विरघळून घ्यावं. त्यात तीळ आणि शेंगदाणा कुटाइतकाच किंवा त्यापेक्षा थोडा कमी गूळ घेऊन तो आधी वितळून घ्यावा. नंतर वितळलेला गूळ थोडा थंड झाला की त्यात तीळ-शेंगदाण्याचा कूट आणि थोडी वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. हाताला तूप लावून लाडू वळावेत.