Join us  

रोजच्या जेवणात खा वाटीभर डाळ किंवा वरण! डाळी खाल्ल्या नाहीत तर होणारच 5 तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 6:26 PM

आठवड्यातून एकदाही आहारात डाळ न खाणे म्हणजे अनेक आजारांना, समस्यांना स्वत:हून आमंत्रण देणे . डाळ न खाण्याचे परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर दिसून येतात. एकूणच शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी रोजच्या आहारात डाळींचा समावेश असणं आवश्यक आहे. तो जर नसला तर वजन वाढण्यापासून केस गळण्यापर्यंत अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं.

ठळक मुद्देरोजच्या आहारात डाळ नसल्याने वजन वाढतं. आहारात डाळींचा अभाव असल्यास अँनेमिया होण्याचा धोका असतो. मजबूत, लाबंसडक केसांसाठी रोज डाळी खाणं गरजेचंच.Image: https://twosleevers.com

निरोगी आरोग्य, योग्य वजन, त्वचेचं स्वास्थ्य आणि काळेभोर मजबूत केस या सर्वांवर एकच उपाय म्हणजे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करावा. प्रथिनांचा मुख्य स्त्रोत म्हणजे डाळी. पण याच डाळी केवळ आवडत नाही म्हणून त्यांचा आहारात समावेश केला नाही तर काय परिणाम होतात याबद्दल पोषण तज्ज्ञ अश्विनी कुमार यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. आठवड्यातून एकदाही आहारात डाळ न खाणे म्हणजे अनेक आजारांना, समस्यांना स्वत:हून आमंत्रण देणे असं अश्विनी कुमार सांगतात. डाळ न खाण्याचे परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर दिसून येतात. एकूणच शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी रोजच्या आहारात डाळींचा समावेश असणं आवश्यक आहे. तो जर नसला तर वजन वाढण्यापासून केस गळण्यापर्यंत अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं.

Image: Google

जेवणात डाळीसाळी नसल्या तर..

1. चयापचय बिघडतं

डाळींमधे प्रथिन असतात. शरीराला प्रथिनांची कमतरता भासली तर स्नायू कमजोर होतात. तसेच डाळी न खाल्ल्याने वजनही वाढतं. याचं कारण चयापचय क्रिया नीट होण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनं कमी पडले तर चयापचय बिघडतं, भूक जास्त लागते. त्यामुळे जास्त खाल्लं जातं आणि याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो.

2. अशक्तपणा जाणवतो

डाळी म्हणजे प्रथिनं आणि प्रथिनं म्हणजे ताकद. डाळी खाल्ल्या नाहीत तर एक नाही अनेक समस्या उद्भवतात. सतत थकवा जाणवणं, सुस्ती येणं, काम करताना कंटाळा किंवा आळस येणे, कोणतं काम करण्याची ताकद आपल्यात नाही असं वाटणं, डोळ्यावर सतत झोप असणं ही लक्षणं शरीरात प्रथिनांची कमतरता आहे हे सांगतात. आहारात डाळी नसल्या तर ही लक्षणं जाणवतात. त्याकडे दुर्लक्ष करुन डाळी न खाणं सुरुच ठेवलं तर समस्या आणि त्यामुळे उद्भवणारे आजार गंभीर होतात.

Image: Google

3. पेशींचं नुकसान

डाळींचे विविध प्रकार असतात. प्रत्येक डाळीत प्रथिनांसोबत लोह, फोलेट यआसारखे इतरही पोषक घटक आणि सूक्ष्म पोषण घटक असतात. पेशींची रोज झीज होत असते. झीज होणं जेवढं नैसर्गिक आहे तितकीच ही झीज भरुन येणं ही नैसर्गिक गरज आहे. डाळींमधे असलेल्या प्रथिनांमुळे आणि इतर पोषक घटकांमुळे पेशींचं झालेलं नुकसान भरुन निघतं. नवीन पेशी तयार व्हायला मदत होते. ज्यांच्या आहारात डाळींचा अभाव असतो त्यांच्यात लोहाची कमतरता निर्माण होऊन अँनेमिया होतो. शिवाय डाळ, वरण , आमटी न खाण्याच्या सवयीमुळे शरीरात प्रथिनांसोबतच इतर पोषक घटक कमी होतात. यामुळे रोगप्रतिकरशक्ती कमी होते आणि सततची आजारपणं मागे लागतात.

4. हाडं झिजतात

रोजच्या आहारात डाळी असल्यास हाडांची घनता ( बोन मास) वाढते. हाडं मजबूत होतात. डाळी खाल्ल्या नाहीतर साहजिकच हाडांची घनता कमी होवून हाडं कमजोर होतात. हाडं आतून पोखरली जातात.

Image: Google

5. केस गळतात

केसांचं आरोग्य देखील डाळींमधून मिळणार्‍या पोषक घटकांवर अवलंबून असतं. प्रथिनं हे केसांच्या मजबुतीसाठी आणि टाळू निरोगी राहाण्यासाठी महत्त्वाचे असतात. डाळींमधील पोषक घटकांमुळे टाळूला होणारा संसर्ग टळतो. यामुळे कोंडा होणं, केस कमजोर होवून गळणं थांबतं. पण आहारात डाळींचा अंभाव असेल तर केसांचं नुकसान हमखास होतं.

Image: Google

आहारात डाळी नसण्याचे परिणाम बघता जेवणात वरण , आमटी असणं, डाळ घातलेल्या भाज्या असणं आवश्यक आहे. पण रोज एकच प्रकारची डाळ खाणं याचा आरोग्यास काहीच फायदा होत नाही उलट दुष्परिणामच होतात. तुरीची डाळ, उडदाची काळी डाळ, मुगाची पिवळी डाळ, अख्खे मूग, मसूर, काळे उडीद असे डाळींचे विविध प्रकार आहेत. या डाळींमधे फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. डाळी अदलून बदलून खाल्ल्याने शरीरास आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतात. वजन नियंत्रित राहातं. डाळी जेवणात असल्या की पोट भरल्यासारखं वाटतं. भरपूर वेळ पोट भरलेलं राहून सारखी भूक लागत नाही.आरोग्यास डाळ आणखी पोषक होण्यासाठी कोणतीही डाळ आधी कमीत कमी 15 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास भिजवून मग ती शिजवावी/ फोडणीला / भाजीत घालावी.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्यकेसांची काळजी