Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

सांबार हा केवळ इडलीसोबतच नाही तर डोसे, उत्तप्पा, आप्पे, अप्पम यासोबत तर खाल्ला जातोच तर साध्या भातासोबत चविष्ट म्हणूनही सांबार केला जातो. पण सांबार खाण्याचे फायदे वाचून नक्कीच केवळ चवीसाठी नाही तर पौष्टिक डिश म्हणून नक्कीच केला जाईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 03:26 PM2022-01-01T15:26:57+5:302022-01-01T15:38:30+5:30

सांबार हा केवळ इडलीसोबतच नाही तर डोसे, उत्तप्पा, आप्पे, अप्पम यासोबत तर खाल्ला जातोच तर साध्या भातासोबत चविष्ट म्हणूनही सांबार केला जातो. पण सांबार खाण्याचे फायदे वाचून नक्कीच केवळ चवीसाठी नाही तर पौष्टिक डिश म्हणून नक्कीच केला जाईल.

Eat a bowl of sambar and get 9 health benefits | खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

Highlightsविविध स्वादांचा एकत्रित अनुभव देणारा सांबार एक वाटीभर खाल्ला तरी आरोग्यास फायदेशीर ठरतो.सांबारातून आरोग्य राखण्यास महत्त्वाचे ठरणारे ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. वजन कमी करण्यासाठी, बाॅडी डिटाॅक्ससाठी सांबार खाणं उत्तम पर्याय.

ज्या गोष्टी आपण केवळ जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी खातो, जे पदार्थ रोजच्या जेवणापेक्षा वेगळे करावेत म्हणून करतो, आज डाएटला सुट्टी म्हणत आवडीचं म्हणून जे खातो ते आरोग्यासही फायदेशीर असू शकतं, वजन कमी करण्यास मदत करणारं ठरु शकतं का? असं विचारलं तर कदाचित अनेकजण हा प्रश्न चुकीचा नाही का वाटत? असा उलट प्रश्न विचारतील. पण हा प्रश्न बरोबर आहे  आणि याचं उत्तर म्हणजे इडलीसोबत केलं जाणारं चविष्ट सांबार.
सांबार हा केवळ इडलीसोबतच नाही तर डोसे, उत्तप्पा, आप्पे, अप्पम यासोबत तर खाल्ला जातोच तर साध्या भातासोबत चविष्ट म्हणूनही सांबार केला जातो. पण सांबार खाण्याचे फायदे वाचून नक्कीच केवळ चवीसाठी नाही तर पौष्टिक  डिश म्हणून नक्कीच केला जाईल.

Image: Google

सांबार खाऊन काय मिळतं?

शाकाहारी, दाटसर तरीही रस्सेदार पदार्थ म्हणजे सांबार. एक डाळ किंवा अनेक डाळी, विविध भाज्या, मसाले यांचा एकत्रित् वापर करुन सांबार केला जातो. गरम गरम भात आणि त्यासोबत गरम सांबार , वाफळत्या इडल्या आणि त्यावर मस्त उकळलेलं सांबार जसं चविष्ट लागतं, तेवढंच ते पोष्टिकही ठरतं. विविध स्वादांचा एकत्रित अनुभव देणारा सांबार एक वाटीभर खाल्ला तरी आरोग्यास फायदेशीर ठरतो.

1. आपल्या स्नायुंसाठी आहारातील प्रथिनं हा घटक महत्त्वाचा. स्नायुंचा विकास होण्यासाठी, स्नायुंची झालेली झीज भरुन काढण्यासाठी प्रथिनं महत्त्वाची ठरतात. सांबारात इतर डाळी वापरल्या जात असल्या तरी प्रामुख्याने तूरडाळ जास्त  वापरली जाते. शाकाहारी जेवणात  तूरडाळीतून मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज भागवली जाते. या प्रथिनांसाठी सांबार खाणं फायदेशीर असतं. 

2.  सांबार हा पातळ पदार्थ असला तरी त्यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळतात. कारण सांबार करताना त्यात शेवगा, डांगर, वांगं य फायबरयुक्त भाज्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात.  या भाज्यांमधे फायबर सोबतच ॲण्टिऑक्सिडण्टसही मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच वाटीभर सांबार खाल्ल्यानेही शरीरात फायबर आणि ॲण्टिऑक्सिडण्टस जातात. 

3. सांबार हा रसदार म्हणजे त्यात पाण्याचं प्रमाण चांगलं असतं आणि फायबरचं प्रमाणही भरपूर असल्यानं सांबार आणि त्यासोबत खाल्ले जाणारे पदार्थ सहज पचतात . 

Image: Google

4. सांबार करताना कढीपत्ता, कसूरी मेथी, कोथिंबीर यासारख्या औषधी मूल्यं असलेल्या वनस्पती, आरोग्यदायी मसाले, चिंचेचा कोळ, हळद, अख्खी लाल मिरची, मेथ्या दाणे  हे सर्व घटक ॲण्टिक्सिडण्टयुक्त घटक असतात. एकाच पदार्थातून विविध गुणधर्माचे घटक पोटात जातात आणि त्याचा एकत्रित फायदा आरोग्यास फायदेशीर असे ॲण्टिऑक्सिडण्टस वाढण्यासाठी होतो म्हणून सांबार खाणं फायदेशीर मानलं जातं. 

5. सांबारातून शरीराला प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात. याचा एक फायदा म्हणजे सांबारातील प्रथिनांमुळे भूक शमते, जास्त खाण्याची लालसा कमी होते, पोट भरल्याचं समाधान मिळतं आणि पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. आणि दुसरा फायदा सांबारातून मिळणाऱ्या फायबरमुळे पचन व्यवस्थित होतं.

6. सांबारात विविध भाज्या आणि आरोग्यदायी मसाले असतात, याचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर विषमुक्त होण्यास अर्थात डिटाॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे कधीकधी  जीभेची चव भागवणे आणि बाॅडी डिटाॅक्स करणे हे दोन्ही उद्देश एकत्रित साध्य करण्यासाठी सांबार अवश्य खावा.

Image: Google

7.  एक वाटी सांबार म्हणजे संतुलित आणि संपूर्ण आहार म्हणूण ओळखला जातो.  कारण सांबार खाल्ल्याने प्रथिनं, फायबर, झिंक, फोलिक ॲसिड, लोह, जीवनसत्त्व आणि खनिजं मिळतात. हे सर्व घटक पचन, चयापचय क्रिया आणि  रोगप्रतिकरशक्ती वाढवण्यास महत्त्वाचे असतात.

8. सांबार हे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर पदार्थ मानला जातो. कारण या सांबाराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. एक वाटीभर सांबारातून ग्लायसेमिक इंडेक्स 53.6 टक्के  असतो. यामुळे सांबार खाऊनही रक्तातील साखर नियंत्रित राहाते.

9. सांबार म्हणजे नैसर्गिक रेचक. सांबारातील प्रथिनं, फायबर, पाण्याचं प्रमाण हे घटक पचन सुधारतात, सांबार खाल्ल्याने बध्दकोष्ठतेचा  त्रास होत नाही. 

Image: Google

आरोग्यदायी- चविष्ट सांबार कसं करणार?

सांबार आरोग्यदायी तेव्हाच होतं जेव्हा त्यातील घटकांचं प्रमाण सांभाळलं जात्ं. सांबारात भरपूर मसाले घालणं, तेल वापरणं म्हणजे सांबार रुचकर करणं नव्हे. उलट अशा पध्दतीने सांबार करुन त्यातील पोषक घटक आपण नष्ट करत असतो. आरोग्यदायी आणि वजन कमी होण्यास फायदेशीर असलेलं सांबार करण्याची विशिष्ट पध्दत आहे. यापध्दतीने सांबार करुन पाहा आणि आवडीचा पदार्थ खाऊन आरोग्य राखा.

आरोग्यदायी सांबार करण्यासाठी  1 कप तूरडाळ, 4 सुक्या लाल मिरच्या , पाव चमचा  मेथ्या दाणे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 कप बारीक चिरलेला कांदा, 4 हिरव्या मिरच्या, 2-3 शेवग्याच्या शेंगा, 1 कप डांगराच्या फोडी, 1 कप बारीक चिरलेलं गाजर,  1 कप वांग्याच्या फोडी, अर्धा कप बारीक चिरलेला मुळा, 2 चमचे सांबार मसाला, 1 कप बारीक चिरलेला टमाटा, पाव कप किसलेलं ओलं खोबरं, अर्धा कप चिंचेचा कोळ , आवडत असल्यास चवीपुरता गूळ, भरपूर कोथिंबीर आणि थोडं खाण्यचं खोबरेल तेल घ्यावं. 

आधी तूर डाळ धुवून पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात भिजवावी. नंतर ती थोडं पाणी आणि चिमूटभर हिंग घालून मऊ शिजवून घ्यावी. सर्व भाज्या चिरुन घ्याव्यात.  एका कढईत थोडंसं खोबरेल तेल घालावं. ते गरम झालं की मोहरी, जिरे,  लाल सुक्या मिरच्या घालाव्यात. हे सर्व चांगलं तडतडलं की मेथ्या दाणे, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून  तो परतावा. तो परतला गेला की त्यात हळद घालावी.  एक मिनिट परतल्यावर या मिश्रणात पाणी घालावं. पाणी थोडं उकळलं की हिरवी मिरची, भाज्या आणि मीठ घालावं . हे मिश्रण चांगलं ढवळून कढईवर झाकण ठेवून 10-15 मिनिटं ते शिजू द्यावं. नंतर झाकण काढून मिश्रण चांगलं ढवळावं. यात चिंचेचा कोळ आणि गूळ घालून ते पुन्हा चांगलं मिसळून घ्यावं. मिश्रणाला एक उकळी आली की त्यात शिजलेली डाळ घोटून घालावी. आवश्यकतेनुसार त्यात थोडं गरम पाणी घालावं.

Image: Google

सांबाराला चांगल्या उकळ्या फुटल्या की मग गॅस बंद करुन सांबार चांगलं हलवून घ्यावं . सांबार झाकण्यापूर्वी चिरलेली कोथिंबीर घालावी. कोथिंबीर घातल्यानंतर सांबार किमान पाच मिनिटं झाकून ठेवावा. म्हणजे सांबारात कोथिंबीरचा स्वाद आणि अर्क उतरतो.

Web Title: Eat a bowl of sambar and get 9 health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.