Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फराळातले फॅट्स मोजताय? 6 गोष्टी करा दणकून फराळ खा, वजन वाढणारच नाही!

फराळातले फॅट्स मोजताय? 6 गोष्टी करा दणकून फराळ खा, वजन वाढणारच नाही!

आहारतज्ज्ञांच्या मते, फराळाचे पारंपरिक पदार्थ वजन वाढवणारे नसतात उलट आनंद वाढवणारे असतात. ते टाळण्यापेक्षा दिवाळीच्या काळात सजगतेने फराळचा, गोडाधोडाच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि आपले व्यायामाचे नियम पाळले तर वजन अजिबात वाढत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 04:38 PM2021-10-29T16:38:17+5:302021-10-29T18:11:27+5:30

आहारतज्ज्ञांच्या मते, फराळाचे पारंपरिक पदार्थ वजन वाढवणारे नसतात उलट आनंद वाढवणारे असतात. ते टाळण्यापेक्षा दिवाळीच्या काळात सजगतेने फराळचा, गोडाधोडाच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि आपले व्यायामाचे नियम पाळले तर वजन अजिबात वाढत नाही.

Eat Diwali Faral guilt free: why you count calories and fats while eating Diwali Faral? Keep 6 rules and eat Faral, you will not gain weight! | फराळातले फॅट्स मोजताय? 6 गोष्टी करा दणकून फराळ खा, वजन वाढणारच नाही!

फराळातले फॅट्स मोजताय? 6 गोष्टी करा दणकून फराळ खा, वजन वाढणारच नाही!

Highlightsसण आहे म्हणून पदार्थांवर आडवा हात मारण्यापेक्षा जे खातोय ते सजगतेनं, मन लावून, लक्ष देऊन खावं. यामुळे पदार्थ थोडे खाल्ले तरी समाधान मिळतं. बाहेर गोड खाताना नेहेमीचे आइस्क्रीम, गुलाबजाम असे पदार्थ न मागवता खास दिवाळीसाठी बनवल्या जाणार्‍या मिठाया खाव्यात.घरी तयार केलेल्या चकल्या, अनारसे, शेव खायला अजिबात घाबरु नका. फक्त हे पदार्थ अनेक वेळा तळण केलेल्या तेलात केलेले नसावेत.

दिवाळीचं मुख्य आकर्षण म्हणजे आपला पारंपरिक फराळ. एक काळ असा होता जेव्हा लाडू, करंज्या, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, चकली, शेव ही पदार्थांची नावं ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. घरात डबे भरभरुन फराळ बनवला जायचा. तो आवडीनं खाल्ला आणि खिलवला जायचा. फराळाची आमंत्रणं दिली घेतली जायची. पण आता चित्रं थोडं बदललं आहे. कॅलरी कॉंन्शिअसनेस वाढला आहे. फराळ म्हटलं की चेहेर्‍यावर हास्याची लकेर उमटण्याऐवजी कपाळावर आठ्या पडतात. ‘फराळाचे पदार्थ नको ग बाई, माझं डाएट बोंबलेल!’ अशी वाक्यं येता जाता कानावर पडतात. फराळाचं घरात बनवणार नाही, नैवेद्यापुरती बाहेरुन आणण्याचं नियोजन अनेक स्त्रिया एकमेकींना बोलून दाखवतात. फराळाचे पदार्थ पचत नाही, फराळाच्या पदार्थांनी वजन वाढतं या असल्या वाक्यांना आहारतज्ज्ञ मात्र धुडकावून लावतात.

फराळाचे पारंपरिक पदार्थ वजन वाढवणारे नसतात उलट आनंद वाढवणारे असतात. ते टाळण्यापेक्षा दिवाळीच्या काळात सजगतेने फराळचा, गोडाधोडाच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि आपले व्यायामाचे नियम पाळले तर वजन अजिबात वाढत नाही असा दिलासा ऋजुता दिवेकर , नमामी अग्रवाल या प्रसिध्द आहार तज्ज्ञ देतात. सोबतच सणावाराच्या दिवसात खाण्यापिण्याचे नियम पाळून सर्व पदार्थांचा आस्वाद कसा घ्यायचा याचा मोलाच्या टिप्सही देतात. या टिप्स पाळल्या तर यंदाची दिवाळी फराळांच्या पदार्थांसोबत मस्त साजरी करता येईल.

Image: Google

मनसोक्त खा पण नियम पाळून

1. सगळं खा पण लक्ष देऊन
 सणावाराला केले जाणारे गोडाधोडाचे पदार्थ जड असतात. पण या पदार्थांना दिवाळीच्या चार दिवसात घाबरण्याची काहीच गरज नाही. हे पदार्थ खातांना फक्त आपण योग्य ते खातोय ना याकडे लक्ष द्यावं. वर्षभर पौष्टिक आणि आरोग्यदायी खाण्याचे नियम पाळत असू तर दिवाळीचे चार दिवस मिठायांचा , तळलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यास अजिबात कचरु नये. नमामी अग्रवाल म्हणतात की, सण आहे म्हणून पदार्थांवर आडवा हात मारण्यापेक्षा जे खातोय ते सजगतेनं, मन लावून, लक्ष देऊन खावं. यामुळे पदार्थ थोडे खाल्ले तरी समाधान मिळतं. फराळाचे पदार्थ खाताना माइंडफुल इटिंगचा नियम पाळला तर वजन वाढेल या धाकाने एकही पदार्थ टाळावा लागणार नाही.

2. जेवण टाळू नका

हल्ली सणावारालाच नातेवाईक, मित्र मैत्रिणी एकत्र जमतात. त्यामुळे हा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर जाऊन जेवण्याची नवीन पध्दत रुढ होतेय. संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं आहे म्हणून डाएट करणारे अनेकजण दुपारचं जेवण टाळतात. अगदी उपवास केल्यासारखं पोट रिकामं ठेवतात. का तर बाहेरचं खाऊन वजन वाढू नये म्हणून. पण ही काळजीच आपल्यावर उलटते. कारण पोट रिकामं असल्यामुळे एकाच वेळेस खूप खाल्लं जातं. एकाच वेळेस जास्त खाल्ल्यानं नको तितके उष्मांक शरीरात जातात. भुकेच्या सपाट्यात जास्त खाल्लं जातं पण नंतर अस्वस्थ वाटतं. पोट फुगल्यासारखं वाटतं. त्यामुळे दिवेकर आणि अग्रवाल सांगतात की, गिल्ट फ्री राहा. गिल्ट फ्री खा. बाहेर जेवायला जायचं आहे म्हणून उपाशी राहू नका. उलट बाहेर जेवताना थोडी हुशारी दाखवा. हॉटेलमधे पदार्थ निवडताना विचारपूर्वक निवडावेत. खूप डिशेसची ऑर्डर देण्याऐवजी दोन स्टार्टरच्या डिशेस आणि जेवणासाठी तीन पदार्थ असा नियम ठेवावा. बाहेर गोड खाताना नेहेमीचे आइस्क्रीम, गुलाबजाम असे पदार्थ न मागवता खास दिवाळीसाठी बनवल्या जाणार्‍या मिठाया खाव्यात.

Image: Google

3. घरातल्या मिठायांना प्राधान्य द्या

वजन कमी करणे ही गोष्ट गांभिर्याने घेतलेले सगळेच साखरेला खूप घाबरतात. त्यामुळे फराळाच्या ताटातील गोड पदार्थ आधी बाजूला काढले जातात. पण आहारतज्ज्ञ म्हणतात घरी तयार केलेले किंवा घरगुती फराळ तयार करणार्‍या व्यावसायिकांकडून फराळाचे पदार्थ तयार केलेले असतील तर ते बाजूला करण्यापेक्षा आवर्जून खावेत. ताटातून बाजूलाच करायचे असतील तर आयत्या विकत आणलेल्या फॅन्सी मिठाया, चॉकलेटस बाजूला करावेत.

4. तळलेल्या पदार्थांना घाबरु नका

तळलेले, तेलकट पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात हे खरं. पण सर्वच तळलेले पदार्थ तसे नसतात. आपण किती खातो, कोणत्या पध्दतीने तयार केलेले पदार्थ खातो यावर ते अवलंबून असतं. ऋजुता दिवेकर म्हणतात घरी तयार केलेल्या चकल्या, अनारसे, शेव खायला अजिबात घाबरु नका. फक्त हे पदार्थ अनेक वेळा तळण केलेल्या तेलात केलेले नसावेत. तळणासाठी घरी बनवलेलं तूप असेल तर ते पुन्हा वापरता येतं. आता तेलात तळलेल्या पदार्थांन हेल्थी पर्याय म्हणून एअर फ्राइड आणि मायक्रोवेव्हड फूड खाण्यास प्राधान्य दिलं जातं. पण ऋजुता दिवेकर म्हणतात की हे पदार्थ आधी टाळावेत. कारण हे पदार्थ खाल्ल्याने गोड खाण्याची सतत इच्छा होते तसेच हे पदार्थ खाल्ल्यानंतर छातीत , पोटात जळजळ होते.

Image: Google

5. बाहेर जेवायला जाताना थोडं घरी खाऊन घ्या

हॉटेलमधे जाऊन खाण्यावर नियंत्रण राहात नाही, त्यामुळे जास्त खाल्लं जातं. वजन वाढीचा धोका खरंतर यामुळे असतो. हा धोका टाळण्यासाठी ऋजुता दिवेकर एक सोपा उपाय सूचवतात. हॉटेलमधे जेवायला जाताना घरी थोडं पौष्टिक खाऊन घ्यावं. त्यामुळे हॉटेलमधे गेल्यावर मोजकंच जेवलं जातं. थोडा सुकामेवा/ दही भात/ सलाड खावं.

6. जेवणानंतर पचनासाठीचे नियम पाळा

सणासुदीच्या दिवसात घरी जेवताना किंवा बाहेर जेवायला गेल्यानंतर एका गोष्टीची आवर्जून काळजी घ्यावी, ती म्हणजे आपलं फोट फुगणार नाही, नंतर पोटात गॅसेस झाल्यासारखं वाटणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही एवढंच खावं. आणि जेवल्यानंतर पचन नीट होण्यासाठी ऋजुता दिवेकर म्हणतात वाटीत थोडं साजूक तूप घेऊन ते झोपण्याआधी तळपायांना चोळावं, एक ग्लास गरम पाणी प्यावं. लवकर पचन व्हावं यासाठी जेवणानंतर आलं, बडिशेप आणि ओवा घातलेला चहा प्यावा असं नमामी अग्रवाल सूचवतात.

Web Title: Eat Diwali Faral guilt free: why you count calories and fats while eating Diwali Faral? Keep 6 rules and eat Faral, you will not gain weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.