दिवाळीलाच थोडी थंडी पडलेली असते. पण दिवाळी सुरू होताना असलेली गुलाबी थंडी तुळशीच्या लग्नापर्यंत म्हणजेच दिवाळी संपेपर्यंत पार बोचरी होऊन जाते. या बोचऱ्या थंडीपासून स्वत:च संरक्षण करणं खरोखरंच गरजेचं आहे. पण थंडीत सर्दी, खोकला होऊ नये, म्हणून बोरं, आवळे अशी हंगामी फळं खाणं टाळत असाल तर तुमचं नक्कीच काहीतरी चुकत आहे. खास हिवाळा स्पेशल असणारा हा अस्सल गावरान मेवा वर्षातून एकदाच मिळतो. तो मुळीच टाळू नका. कारण बोरं, आवळे ही फळं खूप छोटी दिसत असली तरी त्यांच्यातले गुणधर्म एखाद्या महागड्या फळाला टक्कर देतील, एवढे भारी असतात बरं.. मुर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण या फळांबाबत वापरली तर निश्चितच वावगं ठरणार नाही.
एवढ्याशा बोरात दडले आहेत खूप सारे गुण... - बोरं एवढी गुणकारी असतात की चीनमध्ये अनेक आजारांवरची औषधी तयार करण्यासाठी बोरांचा उपयोग केला जातो. - बोरामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. पण त्यातून खूप जास्त उर्जा मिळते. त्यामुळे वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींनी भरपूर प्रमाणात बोरं खावी.- व्हिटॅमिन्स ए आणि सी चा पुरेपुर पुरवठा बोरांमधून होतो. तसेच बोरामध्ये पोटॅशियमचे देखील चांगले प्रमाण असते. - बोरांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे बोरं खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.- तसेच ॲण्टीऑक्सिडंट्स जास्त असल्यामुळे बोरं हे एक उत्तम ॲण्टीएजिंग घटक आहेत. भरपूर प्रमाणात बोरं खाल्ल्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं रोखलं जातं.
- बाेरांमध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस दात आणि हिरड्यांना मजबूती देतात.- बोरं खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनाही बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो. - बोरांमुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
आवळे खाण्याचे फायदे - त्वचा तसेच केसांसाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे.- आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.- मधुमेहींसाठीही आवळा खाणे फायदेशीर मानले जाते.
- वारंवार तोंड येत असेल, दात आणि हिरड्या दुखत असतील, तर नियमितपणे आवळे खावे. - पित्ताचा त्रास आवळा खाण्याने कमी होतो. - हाडांच्या मजबूतीसाठी आवळा खाणे फायदेशीर मानले जाते.- आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.