Join us  

वजन कमी करायचं तर ब्रेकफास्टला खा हाय प्रोटीन पदार्थ; सकाळच्या घाईत झटपट होणारे ४ हेल्दी पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2023 10:12 AM

Easy and Protein Rich Breakfast Options For Weight loss : हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचे सोपे पर्याय...

ब्रेकफास्ट ही दिवसभरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून तो पोटभरीचा आणि हेल्दी असेल तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ब्रेकफास्टला रोजच्या रोज हेल्दी काय करायचं असा प्रश्नही आपल्यापैकी अनेकांना पडतो. अनेक जण तर चहा पोळी किंवा आदल्या दिवशीचे काही उरले असेल तर तेच खाऊन ब्रेकफास्ट करतात. पोहे किंवा उपीट यांसारखे पदार्थ केले जातात, मात्र या पदार्थांनी पोट भरत असले तरी शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतातच असे नाही. म्हणूनच ब्रेकफास्टला काय करावे यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही खास रेसिपी सांगतात. त्या कोणत्या ते पाहूया (Easy and Protein Rich Breakfast Options For Weight loss)...

१. पनीर रोल

पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतो. म्हणून सकाळी पोळ्यांची कणीक भिजवताना थोडी जास्त भिजवावी. पनीर, शिमला मिरची, तिखट, मीठ, धणे-जीरे पूड, कांदा यांची भाजी करुन ती पोळीमध्ये भरुन त्याचे रोल करावेत. यावर आवडीप्रमाणे आपण स़ॉस, मायोनिज, चीज घालू शकतो. तव्यावर तूप किंवा बटरवर हा रोल भाजला तर तो छान लागतो. 

२. चिया सीड आणि फळं 

रात्रभर चिया सीड पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी उठल्यावर त्यामध्ये ताजी फळं चिरुन घालावीत. आवडत असेल तर मध घालावा. हे बाऊलभर खाल्ल्यास पोटभरीचे होते आणि एकवेळचा नाश्ताही होतो. चिया सीडस आणि फळं यांतून शरीराला आवश्यक ते पोषण मिळते. 

३. दलिया पनीर उपमा 

दलिया हा नाश्त्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. गव्हाचा दलिया शिजवून घेऊन त्यामध्ये घरात उपलब्ध असतील त्या भाज्या आणि भरपूर पनीर घालावे. त्यामुळे हा उपमा चविष्ट तर होतोच पण त्याची पौष्टीकताही वाढते. यामध्ये आपल्या आवडीचा गोडा मसाला, धणे-जीरे पावडर, लाल तिखट असे मसाले घातल्यास त्याचा स्वाद आणखी वाढण्यास मदत होते. 

४. पिनट बटर, फळं आणि ओटस किंवा दलिया 

ओटस पाण्यात १० ते १५ मिनीटे भिजवून ठेवा, त्यानंतर ते थोडे शिजवून घ्या. दलिया असेल तर तो कुकरमध्ये शिजवून घ्या. यामध्ये पिनट बटर, दाणे, केळं, सफरचंद, चिकू यांसारखी गोड फळं घाला. वरुन घरात उपलब्ध असेल तो सुकामेवा घालून हे खायला घ्या. अतिशय हेल्दी आणि पोटभरीचा असा हा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्सपाककृती