आपल्या रोजच्या जेवणात भात, पोळी, भाजी, आमटी, कोशिंबीर यांचा समावेश असतो. तृणधान्य हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. पण यातही भारतात अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. आपल्याकडे गहू, तांदूळ, ज्वारी यांचा आहारात जास्त प्रमाणात वापर होत असला तरी याशिवायही आरोग्यासाठी उपयुक्त अशी धान्ये आहेत. बाजरी, राजगिरा, बार्ली, नाचणी यांचा त्यात समावेश होतो. नाचणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे शरीराला नेमके काय फायदे असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात.
नाचणीचे फायदे -
१. शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.
२. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टीक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
३. तसेच लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते.
४. मधुमेही व्यक्तींना रोज नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
५. तसेच शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही नाचणीमुळ नियंत्रणात राहायला मदत होते.
६. विशेष म्हणजे नाचणीने प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता.
७. नाचणी खाल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते म्हणून ज्याला रक्ताची कमतरता आहे अशांनी रोज नाचणीची भाकरी खायला हवी.
८. सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
९. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते.
१०. नाचणी पचायला हलकी असते, त्यामुळे तुम्ही आजारी असाल तर अशावेळी नाचणीची खीर, नाचणीचे धिरडे दिले जाते.
नाचणीचे कोणते पदार्थ करता येतील?
१. नाचणीचे लाडू - नाचणीचे पीठ, तूप आणि गूळ यांचे लाडू अतिशय चांगले लागतात. लहान मुलांनाही हे लाडू आवडतात. एक लाडू खाऊन दूध प्यायल्यास ते पौष्टीक आणि पोटभरीचे होऊ शकते. घाईच्या वेळी महिला निश्चित हे खाऊ शकतात.
२. नाचणीची धिरडी - नाचणीच्या पिठात लसूण, कोथिंबिर, धने-जीरे पावडर, थोडे दही, रवा आणि मीठ घालून पातळ पीठ भिजवल्यास त्याची छान धिरडी होतात. तव्याला तेल लावून त्यावर ही धिरडी टाकल्यास ती छान सुटतात. ही धिरडी ना्श्त्याला किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी तुम्ही नक्की करु शकता.
३. पापड - आपल्याला जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी लागते. अशावेळी विकतचे चिप्स किंवा फरसाण खाण्यापेक्षा नाचणीचे पापड तळून किंवा भाजून घेतले तर ते अधिक चांगले. अशाप्रकारचे पापड तुम्ही घरी करु शकता किंवा वेळ नसल्यास हे पापड बाजारातही मिळतात. यामुळे जेवणाची चव वाढण्यासही मदत होते.
४. नाचणी सत्त्व - नाचणीचे सत्त्व तुपावर भाजून त्यात गूळ, दूध आणि वेलची पावडर घातल्यास नाचणीचे सत्त्व तयार होते. हे पीठ हल्ली बाजारात सहज मिळते. त्यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि महिलांनी हे सत्त्व आवर्जून खावे.
५. नाचणीची भाकरी - रोजच्या जेवणात आपण पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी हे पदार्थ खातो. मात्र त्या ऐवजी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरु शकते.