आरोग्याचा विचार करता नाश्त्याला ओट्सचे (oats for breakfast) पदार्थ खाण्याचा ट्रेण्ड जगभरात आहे. वजन आणि आरोग्य यांचा एकत्रित विचार करता ओट्स हे आपल्याकडेही हेल्दी फूड म्हणूनच खाल्ले जातात. ओट्समध्ये फायबर, गुंतागुंतीचे कर्बोदकं (काॅम्पलेक्स कार्ब्ज) आणि प्रथिनं असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी ओट्स सर्वात फायदेशीर मानले जातात. ओट्समध्ये असलेल्या मॅग्नेशियम, झिंक आणि फायबरमुळे कोलेस्टेराॅलची पातळी कमी होते. आतड्यांच्या आरोग्यासाठी ओट्स (oats benefits for health) फायदेशीर असतात. ओट्सचे पदार्थ खाल्ल्यानं पोट भरलेलं राहातं. ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं ओट्सचे पदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखर एकदम वाढत नाही. ओट्स खाल्ल्यानं पोट भरल्याची जाणीव लवकर होते. त्यामुळे जास्तीचं खाणं टाळलं जातं. ओट्समध्ये डायेटरी फायबर असतात. हे विरघळणारे फायबर असल्यानं ओट्स पचायला सुलभ असतात. वेटलाॅस डाएटसाठी ओट्सचे विविध पदार्थ केले जातात. त्यातलाच एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे ओट्स कबाब (oats kabab). करायला (how to make oats kabab) सोपे आणि चवीला लाजवाब!
Image: Google
ओट्स कबाब कसे करणार?
ओट्स कबाब करण्यासाठी 1 कप ओट्स, 4 उकडलेले बटाटे कुस्करुन घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 सिमला मिरची, अर्धा कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा किसलेलं आलं, मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला, 2 चमचे काॅर्नफ्लोर आणि आवश्यकतेनुसार तेल घ्यावं.
Image: Google
ओट्स कबाब करताना एका भांड्यात बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यात हळद, मीठ, लाल तिखट, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, काॅर्नफ्लोर, सिमला मिरची आणि 2 चमचे ओट्स घालून सर्व साहित्य मिसळून त्याचा गोळा करावा. बाकीचे ओट्स एका पसरट ताटात पसरुन ठेवावेत. मळून ठेवलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन ते दोन्ही हातानं हलके दाबून त्याचे कबाब करावेत. हे कबाब ताटातल्या ओट्समध्ये घोळून घ्यावेत. तवा गरम करावा. त्यावर 2 चमचे तेल घालावं. तेलावर कबाब शेकण्यास ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कबाब सोनेरी रंगावर शेकून घ्यावेत. टमाटा साॅस किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत गरम गरम ओट्स कबाब छान लागतात.