Join us  

वजन कमी करायचं म्हणून पोहे, उपमा, इडली रात्री खाता? तज्ज्ञ सांगतात ही चूक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 11:21 AM

हलके वाटणारे पदार्थ खरंच हलके असतात का, त्यातून शरीराला काय पोषण मिळते याविषयी...

ठळक मुद्देएरवी या पदार्थांमुळे पोट भरत असले तरी शरीराला म्हणावे तितके पोषण मिळत नाही.त्यापेक्षा रात्रीच्या जेवणात दही, आमटी, सांबार हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आवर्जून खायला हवेत. 

भारतीय पदार्थांमध्ये बरीच व्हरायटी पाहायला मिळते. प्रत्येक गावात, शहरात आणि राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. पण भारतात बहुतांश भागात खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे पोहे, उपमा आणि इडली. झटपट होणारे आणि पोटभरीचे हे पदार्थ घरात सगळ्यांनाच आवडत असल्याने सर्रास केले जातात. इतकेच नाही तर वजन कमी करायचं म्हणून भाजी-पोळी किंवा भात-आमटी खाण्याच्या ऐवजी काही जण रात्रीच्या जेवणातही हे पदार्थ करतात. मात्र हे पदार्थ खरंच हलके असतात की पचायला जड असतात याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ भुवन रस्तोगी याबाबत बरेच खुलासे करतात आणि या पदार्थांमधून मिळणाऱ्या पोषणाबाबत आपल्याला माहिती देतात. नुकतीच त्यांनी एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून त्यातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास २६ हजार फॉलोअर्स असून ते करत डाएट विषयीच्या पोस्टला नेटीझन्स चांगला प्रतिसाद देतात. 

(Image : Google)

पोहे, उपमा जेवणाला पर्याय होऊ शकते का? 

पोहे आणि उपमा हे पदार्थ वन डिश मिल असल्याने संध्याकाळी दमून घरी आल्यावर आपण हे पदार्थ करतो. हे पदार्थ लाईट असतात असं आपल्याला वाटतं म्हणून वजन कमी होण्यासाठीही हे पदार्थ खाल्ले जातात. मात्र हे पदार्थ पचायला जड असतात. त्यापेक्षा पोळी-भाजी किंवा आमटी खाल्लेली केव्हाही चांगली असे रस्तोगी म्हणतात. पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असते आणि फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असते. शरीराला प्रथिने आणि फायबरची आवश्यकता असल्याने हलक्या वाटणाऱ्या वन डिश मिलमधून म्हणावे तितके काही मिळत नाही. 

मग पोहे, उपीट हे हलके पदार्थ केव्हा खावेत? 

आपण आजारी असतो किंवा आपल्याला पटकन एनर्जीची गरज असते अशावेळी हे पदार्थ खाल्लेले चांगले. पण एरवी या पदार्थांमुळे पोट भरत असले तरी शरीराला म्हणावे तितके पोषण मिळत नाही. उलट या पदार्थांतील कार्बोहायड्रेटच्या जास्त प्रमाणामुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. आपल्याला जीवनशैलीविषयक आरोग्याच्या ज्या समस्या भेडसावतात त्याचे मूळ कारण हेच असते. त्यापेक्षा रात्रीच्या जेवणात दही, आमटी, सांबार हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आवर्जून खायला हवेत. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना