आजकाल प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जात आहे.. ऑफिसमध्ये, जीममध्ये, प्रवासात कुठेही प्रोटीन शेक कॅरी केला जातो आणि वेळ झाली की घेतला जातो. नाश्ता किंवा जेवणाच्या वेळांपेक्षाही प्रोटीन शेक घेण्याची वेळ काटेकाेरपणे पाळली जातेय.. पण वर्षानुवर्षे असा रोजच्या रोज प्रोटीन शेक घेणं आरोग्यासाठी घातक (excess consumption of protein powder is harmful) ठरू शकतं असं Harvard येथील तज्ज्ञ अभ्यासकांचं मत आहे.. याविषयी सांगताना Harvard-affiliated Brigham and Women's Hospital चे आहारशास्त्र विभागाचे संचालक कॅथी मॅकमॅनस म्हणतात की, काही अपवाद वगळल्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रोटीन शेक (protein powder and protein shake) घेऊ नये.
प्रोटीनची गरज का आहे? (need of protein)
ग्रीक शब्द protos पासून प्रोटीन शब्दाची निर्मिती झाली आहे. प्रोटोज म्हणजे पहिलं किंवा महत्त्वाचं. यावरून आहारातील प्रोटीनचे महत्त्व दिसून येते. मानवी शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला वारंवार प्रोटीनचा पुरवठा करण्याची गरज असते. पण त्यासाठी वर्षानुवर्षे प्रोटीन पावडरचं सेवन करावं, असं मात्र मुळीच नाही. त्याऐवजी नैसर्गिक पदार्थांमधून प्रोटीन मिळविण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
प्रोटीन पावडर का ठरू शकते धोकादायक? (why protein powder is harmful?)
- प्रोटीन पावडर हा प्रोटीनचा काही नैसर्गिक स्त्रोत नाही. त्यामुळे प्रोटीन पावडर तयार करताना त्यात अर्थातच साखर, आर्टिफिशियल रंग, फ्लेवर्ससाठी वेगवेगळे पदार्थ, केमिकल्स टाकले जातात. एक चमचा प्रोटीन पावडरद्वारे शरीराला १० ते ३० ग्रॅम प्रोटीन मिळते. पण प्रत्येकाचे वय, वजन, कामाची पद्धत, फिटनेस लेव्हल पाहता प्रत्येकाची प्रोटीनची गरज वेगवेगळी असते. सरसकट एकाच प्रमाणात सगळ्यांसाठी प्रोटीन घेणं फायदेशीर नसतं.
- प्रोटीनचं नियमित सेवन केल्यामुळे मांसपेशी किंवा मसल्स स्ट्राँग झाल्याचा आणि त्यांचा आकार वाढल्याचा अनुभव अनेकजण सांगतात. पण मांसपेशींचा आकार वाढविण्याचे काम एकट्या प्रोटीनमुळे होऊ शकत नाही. तरीही असा अनुभव येत असेल तर नक्कीच प्रोटीन पावडरमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त अन्यही काही घटक आहेत, हे लक्षात घ्यावे.
शरीरात प्रोटीन जास्त होत असेल तर....
- ज्या लोकांना दूध सहजासहजी पचत नाही, त्या लोकांना प्रोटीन पावडरमुळे अपचनाचा त्रास होतो.
- प्रोटीन पावडरमध्ये असलेला शुगर कंटेंट तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतो.
- प्रोटीन पावडर आणि एक ग्लास दूध यातून भरपूर कॅलरीज पोटात जातात. त्यामुळे वजन वाढीचा त्रास होऊ शकतो.
- खूप जास्त प्रोटीन घेतल्याने शरीरातला नायट्रोजन समतोल खराब होतो. त्यामुळे युरीनमधील अमिनो ॲसिडचे प्रमाण वाढते, यामुळे किडनी, लिव्हर यावर अतिरिक्त ताण येतो आणि त्यांच्या कार्यात अडथळे येतात.
- प्रोटीनमधून अमोनिया तयार होतो. खूप प्रोटीन घेत असाल तर नैसर्गिक पद्धतीने अमोनिया शरीराबाहेर टाकला जात नाही. त्यामुळे मग तो घामावाटे बाहेर टाकला जातो. त्यामुळे शरीराची दुर्गंधी येऊ लागते.