पराठे खायला खूप आवडतात पण वजन कमी करायचं म्हणून पराठे खायचे नाही अशी बंदी अनेकजण स्वत:वर घालून घेतात. पण अनेक प्रकारचे पराठे आहेत. सर्वच प्रकारच्या पराठ्यांनी वजन वाढत नाही. काही पराठे असेही असतात जे शरीराला आवश्यक पोषक घटक देतात, जे खायला खूप चविष्ट असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते खाल्ले तरी वजन वाढत नाही. आरोग्याविषयक अनेक समस्या पराठे खाल्ल्याने कमी होतात. विश्वास बसत नाही का? मग हा मुगाचा पराठा खाऊन पहा. आपल्या डाएटमधे वरचेवर मूग डाळीच्या पराठ्याचा समावेश केल्यास मूग डाळीतील पोषक घटक शरीरास मिळतात. शिवाय मूग डाळीचा पराठा हा लो कॅलरी असतो त्यामुळे इतर कोणत्याही पराठ्यांपेक्षा मूग पराठा हा पौष्टिक पर्याय आहे.
छायाचित्र- गुगल
मूग डाळीचे पराठे
मूग डाळीचे पराठे तयार करण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ, अर्धा कप भिजवलेली मुगाची डाळ, 3 ते 4 मोठे चमचे मोहरीचं तेल, कोथिंबीर, अर्धा इंच किसलेलं आलं, दोन हिरव्या मिरच्या ( बारीक कापलेल्या) , चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट , 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ.
मूग डाळीचा पराठा करताना आधी दोन कप गव्हाचं पीठ घ्यावं. त्यात अर्धा चमचा मीठ घालाव. मीठ घातल्यानंतर एक चमचा तेल घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. इतर पराठ्यांप्रमाणे मुगाच्या पराठ्यासाठीही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावं. कणिक मळून झाल्यावर ती 20-25 मिनिटं झाकून ठेवावी.
पराठ्यासाठी मूग डाळीचं सारण तयार करण्यासाठी मूग डाळ आधी धुवून घ्यावी. आणि एक तास पाण्यात भिजत घालावी. एका तासानंतर ती निथळून पाणी न घालता गरमरीत वाटून घ्यावी. मूग डाळ वाटून झाली की कढईत दोन तीन चमचे तेल घालून ते गरम करावं. तेलात जिरे घालावेत. जिरे तडतडले की हिंग घालावा. हिरवी मिरची, किसलेलं आलं, हळद, धने पावडर घालून ते परतून घ्यावं. आता या फोडणीत गरमरीत वाटलेली मुगाची डाळ घालावी. वाटलेली डाळ घातल्याबरोबर त्यात मीठ, लाल तिखट, घालावं. थोडं परतून घेतल्यावर गरम मसाला घालावा. मध्यम आचेवर मिश्रण सतत परतत राहावं. खमंग वास सुटेपर्यंत ते भाजून घ्यावं. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सारण चांगलं गार होवू द्यावं.
छायाचित्र- गुगल
पराठे बनवताना कणिक थोडी तेलाच्या हातानं मळून घ्यावी. पुरण पोळी करताना ज्याप्रमाणे कणकेचा गोळा घेऊन त्याची खोलगट पारी करतो आणि त्यात पुरण भरतो त्याप्रमाणे पराठ्यासाठी खोलगट पारी करुन त्यात दोन तीन चमचे मूग डाळीचं सारण घालावं. पारी बंद करुन पराठा हलक्या हातानं लाटावा आणि तेलावर दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यावा. हे पराठे दही, चटणी किंवा आपल्या आवडत्या भाजीसोबत खावेत.
छायाचित्र- गुगल
शाकाहारी लोकांसाठी मूग डाळ म्हणजे प्रथिनांचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. मुगाच्या डाळीत फेनिलएलनिन, ल्यूसीन, वेलिन, लाइसिन आणि आजिर्निन ही आवश्यक अमीनो अँसिड असतात. हे अमीनो अँसिड शरीर निर्माण करु शकत नाही पण शरीराच्या पोषणासाठी हे अत्यंत आवश्यक असतात. मूग डाळीचा पराठा हा हे घटक शरीरास पुरवतो, भूक भागवतो. पोट भरपूर वेळ भरलेलं ठेवतो.