भात हा अनेक जणांचा वीक पॉईंट. मग अशा लोकांना जेवणात नुसता भात दिला तरी चालतो. भात नसेल तर अशा लोकांना पोट भरल्यासारखं, जेवण पुर्ण झाल्यासारखंच वाटत नाही. पण केवळ वजन वाढीच्या भीतीने ते भात खाणं टाळतात. भात खाल्ला तर असं होतं... भात खाल्ला तर तसं होतं (weight gain due to rice)... रात्रीच्या वेळी भात खाऊ नये, दिवसाच्या अमूक वेळेतच भात खावा, अशा काय काय चर्चा भाताबाबत नेहमीच होत असतात. त्यामुळे भात पाहताच काही जणांना मग वजन वाढायची भीती वाटू लागते आणि कॅलरीज, वेटगेन (calories and weight gain) या भीतीने ते भात खाणं टाळतात.
तुम्हीही भात प्रेमी असाल, पण फक्त वजन वाढीच्या भीतीने भात खाणं टाळत असाल तर असं करू नका. कारण भातासोबत सलाड, भाज्या यांचं प्रमाण जर योग्य ठेवलं तर नक्कीच भात आरोग्यदायी ठरतो. उलट भात पचायलाही खूप हलका असतो. त्यामुळे पचनाचा त्रास असेल तरीही भात खाण्यास प्राधान्य द्यावे. वजन वाढू नये किंवा कॅलरी वाढू नयेत, म्हणून भात खाताना कोणती काळजी घ्यावी, याविषयीची माहिती rashichowdhary या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
भात खाताना अशी घ्या काळजी..
- या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की भात खाऊन कधीच वजन वाढणार नाही. फक्त त्यासाठी तुमच्या ताटातल्या भाताचं आणि भाज्यांचं- सॅलडचं प्रमाण संतुलित असावं. आता भातासोबत नेमकी किती भाजी खावी किंवा किती सलाड खावं, असा प्रश्न पडला असेल तर त्याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे.
- यात असं सांगण्यात आलं आहे की भात खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज पातळी वाढू नये यासाठी भाताला हिरव्या पालेभाज्या आणि सलाड यांच्यासोबत संतुलित ठेवणं गरजेचं आहे.
- तुम्हाला भाज्या खाणं आवडत नसेल, तर त्यातून काही तरी मार्ग काढा. पण भाज्या खाण्याला दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
- भाज्या- सलाड आणि भात यांचं प्रमाण एकमेकांशी ३: १ असावं. म्हणजे ताटात जेवढा भात घ्याल त्याच्या तिप्पट भाज्या आणि सलाड घ्या.
- सुरुवातीला सवय होईपर्यंत हे प्रमाण २: १ ठेवलं तरी चालेल. पण हळूहळू हे प्रमाण वाढवत न्या, असंही त्यात सांगितलं आहे.
- अशा पद्धतीने जर भात खाल, तर वजन किंवा कॅलरी वाढण्याचा धोका राहणार नाही. अशा पद्धतीचं जेवण तुम्ही दिवसातून एक वेळ घेऊ शकता.