हिवाळ्यात मक्याच्या भाकरीसोबत मोहरीची भाजी खायची ती केवळ स्वाद म्हणून नव्हे किंवा हिवाळ्यातला चविष्ट बेत म्हणून नव्हे. हिवाळ्यात मोहरीची भाजी अर्थात सरसो का साग खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. ही भाजी ढाब्यावर कायम उपलब्ध असली तरी घरच्या घरी मोहरीची चविष्ट भाजी करुन आरोग्याचा फायदा करुन घेण्याचे हेच दिवस असल्याचं कोलंबिया एशिया हाॅस्पिटलमधील जेष्ठ आहारतज्ज्ञ शालिनी गार्विन ब्लिस सांगतात. मोहरीच्या भाजीतील पोषक घटक आणि ही भाजी हिवाळ्यात खाण्याचे आरोग्यास होणारे फायदे आहारतज्ज्ञ शालिनी सविस्तर सांगतात.
Image: Google
मोहरीच्या भाजीतलं सत्त्वं
आहारतज्ज्ञ शालिनी सांगतात, की 1 कप मोहरीच्या भाजीत दिवसभरात आपल्याला जेवढं अ जीवनसत्त्वं लागतं त्याच्या 95 टक्के अ जीवनसत्त्वं मोहरीच्या भाजीतून मिळतं. या भाजीतून कर्बोदकं, फायबर मिळतात. प्रथिनं आणि के जीवनसत्त्वं या भाजीतून मिळतात. सोबतच मोहरीच्या भाजीतून पोटॅशियम, कॅल्शियम ही महत्त्वाची खनिजं मिळतात. संधिवाताच्या त्रासात ही भाजी खाल्ल्याने खूप फायदा होतो असं शालिनी सांगतात.
मोहरीची भाजी खाण्याचे फायदे
1. मोहरीच्या भाजीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय या भाजीत उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्यसाठी ही भाजी खाणं फायदेशी मानलं जातं. शिवाय ही भाजी खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. त्याचाही फायदा वजन कमी होण्यासाठी होतो.
2. मोहरीची भाजी खाल्ल्यानं शरीरात फोलेट निर्माण होण्यास चालना मिळते. कोलेस्टेराॅलचं प्रमाणही ही भाजी खाल्ल्याने नियंत्रित राहातं. म्हणूनच हदयाच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते.
3. मोहरीची भाजी करतना त्यात पालकाची भाजीही घातली जाते. त्यामुळे मोहरीच्या भाजीतील पौष्टिकता आणखीनच वाढते. मोहरी आणि पालक यांच्या एकत्रित सेवनामुळे सोडियम, प्रथिनं, ॲण्टिऑक्सिडण्टस, अ, क, के ही महत्त्वाची जीवनसत्त्वं मिळतात. या भाजीत लोहाचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे मोहरीची भाजी खाताना चवीची तृप्तता तर होतेच शिवाय शरीरातील रक्ताची कमतरताही भरुन निघण्यास मदत होते. ही भाजी हिवाळ्यात वरचेवर खाल्ल्यास ॲनेमिया होण्याचा धोका टळतो. ॲनेमिया असल्यास तो कमी होण्यास ही भाजी मदत करते. मोहरीची भाजी खाल्ल्यानं शरीरास ऊर्जा मिळते.
Image: Google
4. डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी हिवाळ्यात ही भाजी घरी बनवून खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ शालिनी देतात. मोहरीच्या भाजीत शरीराच्या एका दिवसाच्या गरजेच्या 95 टक्के इतक्या विपुल प्रमाणात अ जीवनसत्त्व असतं. हे जीवनसत्त्वं डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.