Join us  

 वजन वाढतंय मऊ खिचडी खा! विश्वास नाही बसत? आहारतज्ज्ञ तरी हेच सांगतात.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 6:00 PM

कमी करण्यासोबतच खिचडी इतर अनेक कारणांमुळे आरोग्यास उपकारक अशीच आहे. वजन कमी करण्यासाठी रोज आणि आहारात पौष्टिक घटकांचा समावेश म्हणून आठवड्यातून किमान दोन तीन वेळा खिचडी खायला हवी.

ठळक मुद्देखिचडी हे वन डिश मिल आहे. खाल्ली की पोट भरतं आणि पचनासही ती हलकी आहे.खिचडीमुळे पोट लवकर भरतं. त्यामुळे ती खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहायला मदत होते.खिचडी सपक केल्यास ती खाण्याचा कंटाळाच येणार. पण जर ती चविष्ट केली तर ती खातांना कोणीही नाक मुरडणार नाही हे नक्की.

 

खिचडी म्हटलं की नाकं मुरडणारे अनेकजण आहेत. जेवणाला खिचडी नकोच असते अनेकांना. पण खिचडीतले पौष्टिक तत्त्व बघता आहार तज्ज्ञ खिचडी खाण्याला खूप महत्त्व देतात. विशेषत: ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांची कमरेवरची चरबी वाढते आहे , पोटावर चरबी जमा होते आहे त्यांनी तर दिवसातून एकदा खिचडी खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ म्हणतात. फिट राहायचं असेल तर खिचडी खायलाच हवी. कारण वजन कमी करण्यासोबतच खिचडी इतर अनेक कारणांमुळे आरोग्यास उपकारक अशीच आहे. वजन कमी करण्यासाठी रोज आणि आहारात पौष्टिक घटकांचा समावेश म्हणून आठवड्यातून किमान दोन तीन वेळा खिचडी खायला हवी.

खिचडी खावी कारण

खिचडी हे वन डिश मिल आहे. खाल्ली की पोट भरतं आणि पचनासही ती हलकी आहे. पचनशक्ती कमजोर असेल किंवा आजारपणात ती कमी झाली असेल तर खिचडी खाल्ल्यास ती सहज पचते. तसेच आजारी असताना खिचडी खाल्ली तर ती ताकदही देते.

  1.  खिचडी करताना त्यात डाळ, तांदूळ, भाज्या, मसाले असतात. हे सर्व घटक स्वतंत्रपणे पौष्टिक असतात. ते एकत्र केल्यास त्यांचं पोषण मूल्य आणखी वाढतं. शरीराला सर्व आवश्यक घटक खिचडी खाल्ल्यानं मिळतात. शिवाय खिचडी ही जर तुपात केली किंवा वरुन तूप घालून खाल्ल्यास ती आणखी पौष्टिक होते.
  2.  बध्दकोष्ठतेची समस्या असल्यास खिचडी खाणं हे फायदेशीर ठरतं. खिचडी खाल्ल्यावर पोट जड होत नाही. शिवाय खिचडी लवकर पचतेही. तूप, लिंबू, ताजं दही, लिंबाचं लोणचं यांच्यासोबत खिचडी खाल्ल्यास ती चविष्ट तर लागतेच शिवाय पोषकही ठरते.
  3.  जुलाब होत असल्यास सालीच्या मुगाची खिचडी फायदेशीर आते. खिचडी ही फडफडीत भातासारखी, पुलावासारखी मोकळी नसावी. तर ती आसट असायला हवी. म्हणजेच बर्‍यापैकी पातळ असायला हवी. ही खिचडी पोटदुखी लगेच थांबवते. शिवाय आलेला अशक्तपणाही घालवते.
  4.  वजन जर सतत वाढत असेल किंवा कंबर, पोटाकडची चरबी वाढत असेल तर दिवसातून एकदा खिचडी खाणं अनिवार्य आहे असं आहार तज्ज्ञ म्हणतात. खिचडीमुळे पोट लवकर भरतं. त्यामुळे ती खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहायला मदत होते तसेच पोटावर, कंबरेवर जमा झालेली चरबीही कमी व्हायला लागते.
  5.  

 

मसाला खिचडी

खिचडी सपक केल्यास ती खाण्याचा कंटाळाच येणार. पण जर ती चविष्ट केली तर ती खातांना कोणीही नाक मुरडणार नाही हे नक्की. चविष्ट खिचडी करण्याचे पर्याय आहेत.ही खिचडी बनवण्यासाठी 100 ग्रॅम बासमती तांदूळ, 50 ग्रॅम मुगाची दाळ, अर्धा कप हिरवे मटार, अर्धा कप फ्लॉवर, पाव कप शिमला मिरची, एक बटाटा, एक टमाटा, 2-3 चमचे तूप, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, एक चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा इंच आलं, दोन हिरव्या मिरच्या , पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 5-6 मिरे आणि 2 लवंगा ही सामग्री लागते.

मसाला खिचडी करण्याची पध्दत

 तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून अर्धा तास भिजवावी. अध्र्या तासानंतर दीड कप पाणी घालून डाळ-तांदूळ शिजवावेत. कुकरला फक्त एक शिट्टी घ्यावी.सर्व भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. दोन चमचे तूप टाकून ते गरम झाले की जिरे, हिंग, हळद, आलं, हिरवी मिरची, अख्खे मसाले टाकून परतून घ्यावं. या मसाल्यात आधी बटाटे टाकावेत. ते परतले गेली की फ्लॉवर, वाटाणे टाकावे. ते परतले गेले की सिमला मिरची घालावी. ती एक मिनिटं परतावी. टमाटा घालून तो परतून घ्यावा. सर्व भाज्या परतल्यावर त्यात एक कप पाणी ,मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला घालून सर्व छान एकत्र करावं आणि पुन्हा त्यात एक कप पाणी घालावं. ते उकळावं. उकळी आली की त्यात कुकरमधे शिजवलेला डाळ भात घालावा. खिचडी जास्त घटट वाटल्यास त्यात गरम पाणी घालावं आणि एक दोन मिनिटं वाफवून घ्यावी. खिचडीवर नंतर कोथिंबिर घालावी आणि तूप घालून खावी. ही मसाला खिचडी कधीही केली तरी खावीशीच वाटेल.