वजन कमी करताना काय खावं यापेक्षा काय खाऊ नये याचीच यादी मोठी असते. शिवाय जे खायचं तेही अनेकदा न आवडणारंच जास्त असतं. पण असेही काही पदार्थ आहेत जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्तही असतात आणि आपली चटपटीत खाण्याची इच्छाही पूर्ण करतात.
वजन कमी करताना बेसनाचे तळलेले पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं. त्यामुळे बेसन आणि त्याचे पदार्थ नकोच असं वाटायला लागतं. पण बेसनाचे वाफवलेले आणि परतलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. बेसनाचा ढोकळा आणि बेसन ब्रेड टोस्ट हे पदार्थ नाश्त्याला उत्तम आहेत. या पदार्थांनी पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं, भूक भागते आणि वजनही कमी होतं. शिवाय चविष्ट खाल्ल्याचं समाधानही मिळतं.
छायाचित्र:- गुगल
बेसनाचा ढोकळा
बेसनाचा ढोकळा हा पौष्टिक आणि पचण्यास हलका असतो. तसेच वजन कमी करण्यास फायदेशीर असतो. हा ढोकळा तयार करण्यासाठी 2 कप बेसन, 2 कप फेटलेलं दही, चवीनुसार मीठ, हळद, एक छोटा चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, मोहरी, 2 चमचे तेल, 1 चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा आणि चिरलेली कोथिंबीर हे साहित्य घ्यावं.
बेसनाचा ढोकळा करताना..
एका भांड्यात एक कप गरम पाणी घ्यावं . त्यात बेसन, दही घालावं. त्यात गुठळी राहणार नाही असं ते हलवून घ्यावं. नंतर त्यात मीठ घालून ते चार तास ठेवून द्यावं. चार तासानंतर त्यात हळद, हिरवी मिरची आलं पेस्ट घालावी. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. कुकरमधे पाणी घालून गरम करायला ठेवावं. एका छोट्या भांड्यात बेकिंग सोडा , लिंबाचा रस आणि एक छोटा चमचा तेल एकत्र करुन घ्यावं आणि ते बेसनाच्या मिश्रणात घालावं. हे मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. भांड्याला किंवा छोट्या खोलगट ताटलीला तूप लावावं. हे मिश्रण त्यात टाकून ते कुकरमधे वाफवायला ठेवून द्यावं. कुकरला शिट्टी लावू नये. दहा मिनिटं ते वाफवलं की गॅस बंद करावा. ते गार झालं की ढोकळे चौकोनी कापून घ्यावे. एका छोट्या कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की हा तडका ढोकळ्यांवर घालावी.
बेसन ब्रेड टोस्ट
बेसन ब्रेड टोस्ट हा देखील पोटभरीचा पदार्थ असून या पदार्थाने पोट भरपूर वेळ भरल्यासारखं वाटतं. कमी पण पोटभरीचं खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे. बेसन ब्रेड टोस्ट तयार करण्यासाठी मल्टी ग्रेन किंवा गव्हाचं ब्रेड घ्यावं, अर्धा कांदा ( बारीक चिरलेला), अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल, अर्धा टमाटा ( बारीक चिरलेला) अर्धी सिमला मिरची ( बारीक कापलेली) , मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हळद ही सामग्री घ्यावी.
छायाचित्र:- गुगल
बेसन ब्रेड टोस्ट तयार करताना..
एका भांड्यात बेसन, कांदा, सिमला मिरची, टमाटा, लाल तिखट, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व एकत्र करावं. दाटसर मिश्रण करण्यासाठे थोडं थोडं पाणी घालावं. बेसनात बारीक कापलेल्या भाज्या नीट मिसळायला हव्यात. या दाटसर मिर्शणात ब्रेडचे त्रिकोणी तुकडे बुडववे. नॉन स्टिक पॅनवर थोडं तेल घालून मिश्रणात बुडवलेले ब्रेड पॅनवर भाजण्यास ठेवावे. मंद आचेवर ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजावेत. भाजताना थोडं थोडं तेल लावावं. दोन्ही बाजू सोनेरी भजल्या गेल्या की पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत बे बेसन ब्रेड टोस्ट गरम गरम खावेत. भाज्यांमुळे हा टोस्ट पौष्टिक होतो.