Join us  

उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि सुधारते पचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 4:02 PM

शरीराल थंडावा देणारा आहारातला उपाय; उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि पचनाला चालना

ठळक मुद्देपचनक्रिया सुधारण्यासाठी मुगाची डाळ फायदेशीर ठरते.सोयाबीनची डाळ आहारात असल्यानं शरीराचं तापमान स्थिर राहातं.उडदाची डाळ प्रकृतीनं थंडं असते त्यामुळे उन्हाळ्यात उडदाची डाळ खाण्याला महत्व आहे.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी ज्यूस, सरबतं प्यायली जातात. आईस्क्रिम, फ्रूट सॅलेड असे थंडं पदार्थ खाल्ले जातात. पण उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी केवळ ज्यूस आईस्क्रीमचा उपायच पुरेसा नसतो.  या उपायांनी तात्पुरता थंडावा मिळतो. पण पुन्हा उष्णतेचा त्रास सुरु होतो. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जेवणातले पदार्थही मदत करतात. यात डाळींचा रोल खूप महत्वाचा असतो. उन्हाळ्यात बिघडलेलं पचन सुधारण्यासाठी , शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी  आहारतज्ज्ञ सुगीता मुटरेजा 4 प्रकरच्या डाळी खाण्याचा सल्ला देतात.  डाळ, आमटीसाठी, भाजीसाठी विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध असतात. पण त्या सर्वच उन्हाळ्यात चालत नाहीत. उन्हाळ्यात   मूग, उडीद, हरभरा आणि सोयाबीनची डाळ खाण्याला प्राधान्य द्यायला हवे असं सुगीता सांगतात. 

Image: Google

मुगाची डाळ

मुगाची डाळ ही प्रकृतीनं थंडं गुणाची असते. सर्व डाळींमध्ये पौष्टिक डाळ म्हणून मुगाच्या डाळीचा समावेश होतो. उन्हाळ्यात मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं.  मुगाची डाळ खाल्ल्यानं पोटात आग होणे, पित्त होणं हे त्रास कमी होतात. मुगाची डाळ खाल्ल्यानं शरीरास आवश्यक पौष्टिक गुणधर्म मिळतात. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. मुगाच्या डाळीत फायबरचं प्रमाण खूप असतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी मुगाची डाळ फायदेशीर ठरते. तसेच मुगाच्या डाळीत हाइपोकोलेस्ट्रोलेमिया असल्यानं कोलेस्टेराॅल कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचा उपयोग होतो. 

Image: Google

उडदाची डाळ

उडदाच्या डाळीत जीवनसत्वं, खनिजं आणि प्रथिनं पुरेशा प्रमाणात असतात. उडदाची डाळ प्रकृतीनं थंडं असते त्यामुळे उन्हाळ्यात उडदाची डाळ खाण्याला महत्व आहे. उडदाची डाळ खाल्ल्यानं सूज कमी होते. ताप कमी होतो. पचनासाठी आणि ह्दयस्वास्थ्यासाठी उडदाची डाळ फायदेशीर ठरते. 

Image: Google

सोयाबीनची डाळ 

सोयाबीनच्या डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. सोयाबीनची डाळ आहारात असल्यानं शरीराचं तापमान स्थिर राहातं.  सोयाबीनची डाळ खाल्ल्याने शरीरास पुरेसे प्रथिनं, ऊर्जा, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक मिळतात. सोयाबीनच्या डाळीत कॅल्शियम असल्यानं हाडं देखील मजबूत होतात. 

Image: Google

हरभऱ्याची डाळ

हरभऱ्याची डाळ खाल्ल्याने पोटाशी निगडित समस्या दूर होतात. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. तसेच हरभऱ्याची डाळ आहारात असल्यास हीमोग्लोबीन वाढत. या डाळीत फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं वजन कमी करण्यासाठी हरभऱ्याची डाळ फायदेशीर ठरते.

टॅग्स :अन्नआहार योजनासमर स्पेशल