पावसाळ्याच्या दिवसात भाजलेलं मक्याचं खरपूस कणीस खायला खूप मजा येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कणीस खायला सगळ्यांनाच आवडतं. पावसाळा काय कोणताही ¬तु असला तरी भाजलेलं कणीस किंवा उकडलेले मक्याचे दाणे खायला कोणाचीच ना नसते. पण कणीस फक्त चवीसाठी खायचं नसतं. मका खाल्ल्यानं त्वचेपासून पोटाच्या आतड्यांपर्यंत शरीराला अनेक फायदे होतात. मका खाणं हे आरोग्यदायी मानलं जातं. मका फक्त आपल्या शहरात किंवा गावातच लोकप्रिय आहे असं नाही. संपूर्ण जगात मका आवडीनं खाल्ला जातो. विविध प्रकारे मका खाल्ला जातो. टॉर्टिला चिप्स, कॉर्नमील, मक्क्काचं पीठ, कॉर्न सिरल, कॉर्न ऑइल असे मक्याचे विविध प्रकार आहारात वापरले जातात.
पण मक्याचं कणीस खायला खूप महत्त्व आहे. मका म्हणजे पोषक घटकांचा खजिना आहे. 100 ग्रॅम उकडलेल्या मक्यात 96 कॅलरी, 73 टक्के पाणी, 3.4 ग्रॅम प्रथिनं, 21 ग्रॅम कर्बोदकं, 4.5 ग्रॅम साखर, 2.4 फायबर आणि 1.6 फॅटस असतात. मक्यात भरपूर प्रमाणात इ जीवनसत्त्व असतं. यातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूपच कमी असतं. तसेच मक्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यानं मका खाणं हे आरोग्यदायी मानलं जातं.
छायाचित्र- गुगल
चांगल्या आरोग्यासाठी मका खावा!
1. मक्याच्या वेगवेगळ्या प्रकारात जीवनसत्त्वं आणि पोषक घटक वेगवेगळे असतात. जसं मक्याच्या पॉपकॉर्नमधे खनिजं असतात तर स्वीट कॉर्नमधे अनेक प्रकारचे जीवनसत्त्वं असतात. मक्याच्या कणसात आणि पॉपकॉर्नमधे भरपूर प्रमाणात फॉस्फरस, मॅग्नीज आणि झिंक हे घटक असतात. स्वीट कॉर्नमधे बी5 आणि बी9 हे जीवनसत्त्वं असतात. मक्याचं कणीस खाल्ल्यानं शरीरातील फोलिक अँसिडची कमतरता भरुन निघते.
2. मक्यात कॅरोटीनॉइड ल्यूटिन आणि जेक्सेंन्थिन सारखे महत्त्वाचे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक डोळ्यातील पेशींचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. मका खाल्यानं दृष्टी सुधारते. शिवाय मक्यातील घटक डोळ्यातील नाजूक भागांचं रक्षण करतात.
3. मक्यात नैसर्गिक स्वरुपातलं कॅल्शियम असतं.त्यामुळे मका खाल्ल्यानं हाडंही मजबूत होतात. हाडांची घनताही वाढते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे गंभीर आजार होत नाही.
छायाचित्र- गुगल
4. शरीराला त्वरीत ऊर्जा देण्याचं काम मक्याच्या कणसातील कबरेदकं करतात. मक्याच्या कणसात असलेले फायटेटस, टॅनिन, पॉलिफेनोल्स सारखे घटक पचन क्रियेचा वेग कमी करतात. त्यामुळे रक्तातील वाढलेल्या साखरेचा स्तर कमी होतो. कणसात उष्मांक कमी आणि फायबर घटक जास्त असल्यानं वजन कमी करण्यासाठी मक्याचं कणीस खाणं महत्त्वाचं मानलं जातं.
5. मक्याला आर्यन अर्थात लोहाचं पॉवरहाऊस म्हटलं जातं. ज्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीन कमी असतं त्यांच्यासाठी मक्याचं कणीस म्हणजे औषध आहे. नियमित मक्याचं कणीस खाल्ल्यानं अँनेमिया आजार बरा होतो.
6. मका खाल्ल्यानं मज्जातंतूचं काम व्यवस्थित चालतं. मक्यात असलेल्या अमीनो अँसिडमुळे मेंदू शांत होतो. स्मरणशक्ती वाढते. मका हा तणाव कमी करुन अनिद्रेची समस्याही कमी करतो. झोप चांगली लागते. मका खाल्ल्यानं मूड प्रसन्न होतो.
7. मक्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसतं. त्यामुळेच मक्याच्या पिठाचे पदार्थ हदयासंबंधित आजार असलेल्यांसाठी फायदेशीर असतात. मक्यात फायबर आणि बी 3 जीवनसत्त्व असल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. मका खाल्ल्याने रक्त वाहिन्यांमधे चरबी साठत नाही. शिवाय हदयाचे स्नायू व्यवस्थित काम करतात. हदयाचं आरोग्य जपण्यासाठी मक्याचं कणीस खायला हवं असा सल्ला डॉक्टरही देतात.
छायाचित्र- गुगल
8. पोटाचे विकार असलेल्यांनी मका खाणं चांगलं मानलं जातं. मक्यात असलेल्या फायबरमुळे आतड्यांचं कार्य सुधारतं. ज्या पदार्थात फायबर हा घटक चांगला असतो ते पदार्थ पोटासाठी उत्तम मानले जातात. म्हणून मका खाण्याला महत्त्व आहे. मका खाल्यानं पचनाचे विकार दूर होतात शिवाय चयापचय क्रिया सुधारते.
9. मका केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य जपण्यासाठीही फायदेशीर असतो. मक्याचे दाणे हे फेनोलिक अँसिड आणि फ्लेवोनोइडपासून तयार झालेले असतात. हे दोन्ही अँण्टिऑक्सिडण्टस त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे निर्माण होणार्या समस्यांपासून संरक्षण करतात. त्वचे खाली नवीन पेशी निर्माण करण्याचं काम मक्यातील घटकांमुळे होतं. याचा फायदा चेहेर्यावर दिसतो. यामुळे चेहेर्यावर सुरकुत्या पडत नाही. मका खाल्ल्यानं कोलॅजनची निर्मिती होते यामुळे त्वचा मऊ मुलायम राहाते.