Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सकस खाणं महागच, हे डोक्यातून काढा! कोरोनाकाळात पैसे वाचवा, पौष्टिक खा, ते ही घरच्याघरी!

सकस खाणं महागच, हे डोक्यातून काढा! कोरोनाकाळात पैसे वाचवा, पौष्टिक खा, ते ही घरच्याघरी!

बाजारातील महाग शक्तिवर्धक पावडरी आणून दुधात घालून त्या देण्याऐवजी नाचणीची गूळ घातलेली खीर खा.घावन, धिरडी, उसळी करा, ते स्वस्तही आणि सकसही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:53 PM2021-04-28T16:53:25+5:302021-04-28T16:58:22+5:30

बाजारातील महाग शक्तिवर्धक पावडरी आणून दुधात घालून त्या देण्याऐवजी नाचणीची गूळ घातलेली खीर खा.घावन, धिरडी, उसळी करा, ते स्वस्तही आणि सकसही!

Eating healthy is expensive? not at all Save money, eat nutritious, healthy, traditional food , eat local | सकस खाणं महागच, हे डोक्यातून काढा! कोरोनाकाळात पैसे वाचवा, पौष्टिक खा, ते ही घरच्याघरी!

सकस खाणं महागच, हे डोक्यातून काढा! कोरोनाकाळात पैसे वाचवा, पौष्टिक खा, ते ही घरच्याघरी!

Highlightsजेवणात नावीन्य हवे हे पूर्ण मान्य, तथापि त्याकरता पोषण आणि पैसे या दोन्ही गोष्टीचे भान राखता आले पाहिजे.

शुभा प्रभू साटम

कोरोनाकाळात जेवताखाताना लोक दोन गोष्टींची चर्चा करतात. पोषक आहार आणि इम्युनिटी. 
पण पोषक आहार म्हटलं की प्रथम मनात काय येतं? पौष्टिक म्हणजे महाग. सुका मेवा,दूध किंवा महाग फळं हेच डोळ्यासमोर येतं. आणि मग मनात येतं, की हे सारं फार महाग आहे आपल्याला परवडणार नाही. मात्र तसं नाही, अगदी पौष्टिक पण सकस, स्वस्त पण सकस हे सूत्र नक्की जमू शकतं.
मी काही वर्षे श्रमिक वर्गातील स्त्रियांसाठी अभ्यासवर्ग घेत होते, हातावर पोट असणाऱ्या त्या गरीब बायकांना तुम्ही फळं खा हे सांगणं म्हणजे क्रूर चेष्टा ठरली असती. गंमत म्हणजे त्यांच्याही डोक्यात हाच विचार होता की ते भारीतलं खाणं आपल्याला कसं परवडणार? 
पण पौष्टिक म्हणजे महाग हा विचार किंवा सांगड चूक आहे.
थोडा विचार केला तर आपल्याला दिसते की आपले पारंपरिक पदार्थ किंवा आहार आहे तो हवामान,ऋतु,आणि नैसर्गिक परिस्थिती यांना अनुसरून असतो,कोकणात नारळ भरपूर आणि देशावर शेंगदाणे,तीळ..हे अगदी साधं उदाहरण. जागतिकीकरण झाले,जग झपाट्याने जवळ आले,माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रगती झाली.आणि याच टप्प्यावर कुठेतरी आपल्या आहारविषयक सवयी बदलत चालल्या.
इथे प्रगतीला नावे ठेवायची नाहीत की आपल्या भूतकाळाचे गोडवे गायचे नाहीत. 
एक उदाहरण देते. इटली,ग्रीस,अश्या देशात ऑलिव्ह चे मुबलक उत्पादन होते. साहजिक तिथं ऑलिव्ह तेल वापरतात. पण भारतात ते सरास वापरणे किती सयुक्तिक ठरेल? किंमत हा मुद्दा आहेच पण त्याव्यतिरिक्त सुध्दा ते वापरावं का सर्रास?
जे जिथं पिकते ते खायचे. इट लोकल अशी एक मोहीम असते. स्थानिक अन्न महत्वाचे.आपले पारंपरिक इडली,पोहे, आंबोळी,थालीपीठ,धपाटे असले पदार्थ सोडून मैद्याचा पाव आणि साखर असलेला जाम खातात. सकस असा हातसडीचा तांदूळ न वापरता पॉलिश तांदूळ घेतात. हे अगदी ढोबळ उदाहरण पण त्यामुळे आपले पौष्टिक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ आपण विसरत चाललोय. 
आणि इथच पौष्टिक म्हणून मग सुका मेवा बिवा खाल्ला जातो.खिशाला डबल फटका.


बाजारातील महाग शक्तिवर्धक पावडरी आणून दुधात घालून त्या देण्याऐवजी नाचणीची गूळ घातलेली खीर खा. मुलांना किंवा आपल्यालाही आवडावी म्हणून त्यात दूध मसाला/चॉकलेट किस/कोको पावडर घालू शकता की झाले, नाचणी एनर्जी ड्रिंक..
महाग सफरचंद आणि काजू बदाम खायला हवे असे नाही.तर खजूर,पपई,टरबूज, केळी, पेरू,चिकू अशी फळे साधारणपणे बारमाही उपलब्ध असतात,ती खाता येतात. उगा डिसेंबरमध्ये आंबा खाण्यात मजा नाही आणि त्याचा फायदाही नाही. पारंपरिक आहार पद्धती ही मोसम,आणि भौगोलिक परिस्थिती याला अनुकूल होती आणि आता त्याचे कडबोळे झालेय.
फक्त महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या कोणत्याही राज्यामधील पारंपरिक जेवण हे पौष्टिक आणि स्थानिक पर्यावरण अनुकूल असलेलं दिसेल. ज्याची घडी हलली पूर्ण विस्कटून गेलीय.
इथ मान्य करू की तेच तेच खावून कंटाळा येतो..रुची पालट हवा असतो.
त्याकरता अनेक मार्ग असतात.थोडी कल्पना शक्ती वापरायची की होते.वर नाचणी खिरीचे उदाहरण दिले ते तेच. पोळी भाजी नको वाटते,ठीक..भरपूर भाज्या घालून छान रोल करा. वरण भात नको थोडे काजू,पनीर, मोडाची कडधान्ये घालून शाही खिचडी द्या. इडली नको! त्यात पिझ्झा/पाव भाजी मसाला घालून तिला चटकदार करा. मिसळ हवी, मिश्र कडधान्याची करा. 


उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स ऐवजी पन्हे,कलिंगड सरबत,ज्वारी आंबील,सत्तू द्या.
आता यातील कोणते पदार्थ महाग आहेत? सगळे आपले अस्सल भारतीय,पारंपरिक आणि स्वस्त पदार्थ वेगळ्या रूपात आलेत. दृष्टी बदलली की दृष्टिकोन आपोआप वेगळा होतो.
जेवणात नावीन्य हवे हे पूर्ण मान्य, तथापि त्याकरता पोषण आणि पैसे या दोन्ही गोष्टीचे भान राखता आले पाहिजे. नाहीतर तेलात वाचवले आणि तुपात घालवले असे होईल. जे आपल्या अस्सल मध्यमवर्गीय भारतीय मानसिकतेला पटणारे नाही. आणि आजच्या अश्या कठीण काळात तर बिलकुल नाही..बरोबर..?

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Eating healthy is expensive? not at all Save money, eat nutritious, healthy, traditional food , eat local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.