Join us  

कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 1:18 PM

आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस म्हणजे आषाढ महिन्यातल्या नवमीला कांदे नवमी साजरी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. ही काही नुसतीच परंपरा नाही बरं का... याच्या मागे मोठे शास्त्र दडले आहे...

ठळक मुद्देकच्चा कांदा खाण्याचा मोह पावासाळ्यात टाळायलाच हवा..ज्यांना त्वचाविकार आहे तसेच ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, अशा लोकांनी पावसाळ्यात वांगी खाणे पुर्णपणे टाळावे. 

पावसाळा आणि कांदा भाजी हे एक अतिशय चविष्ट समीकरण आहे. याशिवाय मस्त मऊसुत भाकरी, ठेचा, चमचमीत लाेणचं आणि तोंडी लावायला कच्चा कांदा...असा जेवणाचा थाटही अनेकांना प्रिय असतो. कुणाला कोशिंबीरीतून कच्चा कांदा हवाच असतो तर कुणाला कांद्याशिवाय भाजी ही कल्पनाच करवत नाही. असे तुमच्या जीभेचे अगणित चोचले आता मात्र आवरते घ्या.  कारण कांदा नवमी झाल्यानंतर  महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये  कांदे- वांगे आणि लसूण खाणे बंद केले जाते. पावसाळ्यात नेमकी या तीन पदार्थांच्या सेवनावरच गदा का येत असावी बरं...?

 

बहुगुणी कांदा...वेगवेगळ्या आजारांसाठी कांदा हा अतिशय गुणकारी ठरतो. याशिवाय जेवणाची चव वाढविणारा मुख्य घटक म्हणूनही कांद्याकडे पाहिले जाते. कांद्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, गंधक, जीवनसत्व अ, ब आणि क, फायबर मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात. पण असे असेल तरीही कच्चा कांदा खाण्याचा मोह पावासाळ्यात टाळायलाच हवा..

 

का खाऊ नये पावसाळ्यात कांदा ?कांदा हा वातूळ पदार्थ आहे. पावसाळ्यात अनेकांच्या शरीरातील वातप्रकृती वाढलेली असते. वातप्रकृती वाढलेली असताना कांदा खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. कारण पावसाळ्यात आपला जठराग्नी मंदावलेला असतो. त्यामुळे वातूळ आणि पचायला जड असणारे पदार्थ खाणे पावसाळ्यात टाळावे. याशिवाय कांद्यासारखा वातूळ पदार्थ पावसाळ्यात कच्चा खाल्ल्यास पायात, पोटात गोळे येणे, पोट दुखणे, पचन संस्थेचे कार्य सुरळीत न होणे, चयापचय क्रियेत अडथळे होणे, असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या चार दिवसांमध्ये कच्चा कांदा खाणे शक्यतो टाळावे. कांदा परतून किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये टाकून शिजवून खाल्ल्यास आरोग्याला अपाय होत नाही.

 

पावसाळ्यात वांगे का नको ?वांगी ही अशी एक फळभाजी आहे जी पटकन खराब होते. वांगे जास्त काळ राहिले तरी त्यात अळ्या होतात. पावसाळ्यात हवामान दमट असते. पुर्वीच्या काळी तर पावसाळ्यात अनेक दिवस सुर्य दर्शनही व्हायचे नाही. त्यामुळे वांगी खराब होऊन त्यात अळ्या पडण्याची शक्यता खूप जास्त असते. असे वांगे खाणे आरोग्यासाठी घातकच. ज्यांना त्वचाविकार आहे तसेच ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, अशा लोकांनी पावसाळ्यात वांगी खाणे पुर्णपणे टाळावे. 

 

टॅग्स :अन्नकांदामानसून स्पेशल