एरवी कधीही भजी किंवा पकोडे खाण्याचा एवढा आनंद मिळत नाही, जेवढा पावसाळ्यात मिळतो. पावसाळ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली की हमखास गरमागरम खमंग भजी, पकोडे खावेसे वाटतात. ते मनसोक्तपणे खाऊन झाले की मग त्यावर गरमागरम चहा प्यावा वाटतो.. पण असे अनेक जण आहेत की ते केवळ वजन वाढण्याच्या भीतीने त्यांच्या मनातल्या या इच्छा मारून टाकतात. चुकून कधीतरी भजी खाल्लीच तर त्यांना खूप गिल्टी वाटते (eating pakoda or bhaji in monsoon is really good for health? ). असं काही तुमच्या बाबतीत होत असेल आणि भर पावसाळ्यात तुम्ही केवळ वजनाच्या भीतीने भजी, पकोडे खाण्यास नकार देत असाल तर एकदा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिलेला हा सल्ला वाचाच...
ऋजुता दिवेकर या अशा आहारतज्ज्ञ आहेत ज्या नेहमीच लोकल आणि सिझनल फूड खाण्यास प्राधान्य देणाऱ्या आहेत. आपल्या प्रांतात तयार झालेल्या पदार्थांपासून घरी तयार केलेलं साधं सात्विक अन्न खाऊन वजन कसं कमी करता येतं, याविषयी त्या नेहमीच सांगत असतात.
तसंच खाद्यसंस्कृतीतली विविधता आणि त्यातून शरीराला होणारे फायदे यावरही त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच प्रत्येक ऋतूनुसार तसेच सणावारानुसार आपण जे पारंपरिक पदार्थ करतो, ते आपल्या तब्येतीसाठी कसे पोषक ठरतात, याविषयी त्या नेहमीच सांगत असतात. आता असंच त्यांनी पावसाळ्यात बिंधास्त भजी खा. ते खाताना वजन वाढीचा कोणताही गिल्ट मनात ठेवू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
याविषयी ऋजुता सांगतात की या दिवसांत डिप फ्राय केलेली भजी खाल्ल्यास हरकत नाही. एअर फ्राय वगैरे अशा भानगडीत न पडता आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेली भजी खा.
पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर पाहा असरदार इलाज, २ खास रेसिपी-प्रत्येक घरासाठी हमखास उपयाेगी
तसेच तुमच्या प्रांतात ज्या तेलबिया उगवतात किंवा जे तेल तुमच्या भागात वर्षांनुवर्षांपासून खाल्लं जातं, ते तेल भजी तळण्यासाठी वापरा. उत्तम आरोग्यासाठी ऋतूनुसार खाद्यपदार्थांमध्ये विविधता आणणं गरजेचं आहे, असं त्यांनी सुचवलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात भजी खावी की नाही याबाबत मनात शंका असेल तर ऋजुता यांचा व्हिडिओ अवश्य बघा.