राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
वजनावर नियंत्रण मिळवणं हा फार पूर्वीपासून माणसाला असणारा जणू ध्यास आहे आणि असं असलं तरी स्थूलतेचं जगभर वाढणारं प्रमाण ही देखील सत्य परिस्थिती आहे. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये वजन,स्थूलता, व्यायाम यांचं प्रस्थ खूपच वाढलं आणि मग देश विदेशात डाएटची असंख्य फॅड जन्माला आलीत आणि गेलीत! एक एक डाएट चर्चेत आलं की त्याची जणू जगभर लाट येते ! मग तेच डाएट कसं उत्तम आहे याचे दाखले- पुरावे दिले जातात. मग काही महिन्यांनी दुसरं काहीतरी येतं आणि पहिलं मागे पडतं असं वर्षानुर्वष घडत आलं आहे. मग त्यातूनच कार्बोहायड्रेट , प्रोटिन्स,फॅट्स असे शब्द वारंवार कानावर येऊ लागले. जिममध्ये जायचं, भरपूर व्यायाम करायचा, घाम गाळायचा आणि मग स्नायूंची ताकद आणि त्याचप्रमाणे आकार वाढलेला दिसावा म्हणून काहीतरी प्रोटीन पावडर किंवा इतर काही सप्लिमेण्ट यांचा आहारात समावेश करायचा असा एक ट्रेण्ड सुरु झाला.
(Image : Google)
‘काही आहारतज्ज्ञांचा या ट्रेण्डला विरोध आहे. त्यांच्यमते, कशाला हव्यात या महागड्या प्रोटीन पावडरी आणि सप्लिमेण्टस. आपली कडधान्यं काय कमी गुणकारी आहेत का !’ मग भरपूर प्रमाणात भिजवलेली कच्ची अथवा उकडलेली कडधान्यं खाल्ली जाऊ लागली! यात मग अगदी हिरव्या मुगापासून तर छोले, हरभरे, राजमा, वाटाणो या सगळ्यांचा समावेश झाला. पनीर, सोया मिल्क, सोया चंक्स हेही त्यातून सुटले नाहीत. गहू दळून आणताना त्यात सोयाबीन दळले जाऊ लागले. हे लोण इतकं वाढलं की लहान मुलांना देखील उत्तम वाढीसाठी प्रथिनं खूप गरजेची आहेत आणि ती भरपूर मात्रेत दिली गेली पाहिजेत हे आयांच्या मनावर अगदी परिणामकारकपणो बिंबवलं गेलं आणि मुलांना भरपूर उसळी खाऊ घातल्या पाहिजेत या भावनेनं अनेक आया रोज रात्री कडधान्यं आठवणीनं भिजवू लागल्या!
मात्र सर्रास प्रथिनंयुक्त आहार भरपूर प्रमाणात घेणं हे आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण करू शकतं हे हळूहळू समोर येत आहे. त्यामुळे प्रथिनांचा आहारात समावेश करताना काही नियम पाळण्याची गरजही वाटू लागली आहे.
आहारात प्रोटीनचंच प्रमाण जास्त असल्यास..?
१. प्रमाणापेक्षा जास्त प्रथिनं खाल्ल्यामुळे काय इतर परिणाम दिसू शकतात ते हळूहळू समोर येऊ लागलं. अधिक प्रमाणात प्रथिनं मिळावेत म्हणून जास्त चीज,पनीर किंवा मांसाहार केल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढून रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता बळावते.
२. पिष्टमय पदार्थांपेक्षा प्रथिनं ही पचायला जड असल्यामुळे शरीरातील सर्व प्रकारच्या स्थूल,सूक्ष्म पचनावर ताण येतो आणि मूत्रपिंड आणि त्यांचे कार्य यांच्यावर कारण नसताना ताण पडतो.
३.मूत्राद्वारे अधिक प्रमाणात क्षार शरीरातून बाहेर पडत असल्यानं मुतखडा होण्याची शक्यता असते तसेच हाडे ठिसूळ होण्याचीही शक्यता असते.
४. प्रथिनं पचायला जड असतात आणि जास्त वेळ घेतात त्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते.
५. याच कारणानं मलावष्टंभ होतो, कठीण मलप्रवृत्ती होते. ज्या व्यक्ती अशी अतिरेकी प्रमाणात रोज हरभरे, वाटाणे ही कडधान्यं काही दिवस खात राहतात त्यांना कालांतरानं मलावष्टंभ झाल्याची असंख्य उदाहरणं आसपास बघायला मिळतात. ही कडधान्यं स्वत: गुणानं कोरडी,रूक्ष असल्यानं आतड्यांमधील द्रवांश शोषून घेतात आणि मलप्रवृत्ती आणि शरीरदेखील कोरडं होतं.
(Image : Google)
मग प्रोटीन खायचं तर किती खायचं?
१, प्रथिनं घेताना ठराविक प्रमाणात घ्यायला हवीत आणि खाताना काही नियम पाळायला हवेत. सर्वसाधारणपणे रोजच्या आहारात स्त्रियांना ४६ ग्रॅम आणि पुरूषांना ५६ ग्रॅम म्हणजे प्रत्येक व्यक्तीला साधारण ५० ग्रॅम प्रथिनं आहारात असण्याची गरज असते.
योग्य प्रमाणात प्रथिनं घेतल्यानं वजन कमी होतं. कमी केलेलं वजन नियंत्रित राखण्यासही मदत होते. शरीरातील चरबीचं अर्थात फॅट्सचं प्रमाण कमी होऊन मांस पेशी वाढतात आणि स्नायू बळकट होतात.
२. प्रथिनं जेव्हा आहारात असतील तेव्हा त्यासोबत भरपूर कच्चा भाजीपाला ( सॅलेड) फळं खाणं गरजेचं आहे.
३. जेवताना सुरूवातीला प्रथिनं खावीत मग इतर आहार (भाजीपोळी ,वरण भात वगैरे) घ्यावा. यामुळे दोन फायदे होतात, एक तर त्यांचं पचन चांगलं होण्यास मदत होते. याशिवाय भुकेची तीव्र संवेदना कमी होते आणि त्या सपाट्यात इतर आहार जास्त प्रमाणात घेण्यास आळा बसतो.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)