लिंबात असलेले क , ब६ जीवनसत्त्वं, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक, फ्लेवोनॉइडस, अॅण्टिऑक्सिडण्टस, फॉस्फरस या गुणांमूळे एक छोटासा लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. अनेकजण दिवसाची सुरुवात ही गरम पाणी आणि त्यात लिंबू यासह करतात आणि अनेकांचा दिवसाचा शेवट रात्रीच्या जेवणानंतर पाण्यात लिंबू पिळून ते सेवन करण्यानं होतो. आता कोरोना काळात तर लिंबाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
लिंबू हे बहुगुणकारी आहे हे मान्य. पण जे गुणकारी असतं ते नुकसानही करु शकतं. एखादी फायदेशीर गोष्ट तिच्या चुकीच्या आणि अति वापरामुळे आरोग्यास हानिकारक ठरते. तीच बाब लिंबाच्या वापराबाबतही होत आहे. कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी लिंबू आणि लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश असावा असं डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ सांगत आहेत. पण याचा चुकीचा अर्थ घेऊन अनेकजण अतिप्रमाणात लिंबाचं सेवन करत आहे. ही बाब डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लिंबाचा आहारात समावेश असावा पण तो मर्यादेबाहेर नसावा अशी सूचनाही दिली आहे.
लिंबाच्या अति सेवनाचे परिणाम
लिंबाच्या अति सेवनानं शरीराचं तंत्र बिघडू शकतं आणि समस्य्या सोडवण्यासाठी सेवन केला जाणारा लिंबू आरोग्यास हानिकारक ठरु शकतो.
- पचन सुधारण्यास लिंबू हे प्रभावी असतं हे सत्य आहे. पण लिंबू अधिक प्रमाणत सेवन केल्यास पचन तंत्र बिघडतंही. लिंबात अॅसिड तत्वं असतात. जास्त प्रमाणात लिंबू खाल्ल्यास शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तज्ज्ञ लिंबांच प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर अॅसिडिटी झाल्यावर लिंबू पाणी घेणं चुकीचं आहे असंही सांगतात. छातीत जळजळ होत असल्यास , अॅसिडीटी झाली असल्यास लिंबू सेवन केल्यास शरीरात अॅसिडचं प्रमाण अधिक होतं.
- दिवसातून अनेकदा लिंबू पाणी पिल्यानं डोकं दुखण्याची समस्या उद्बभवते. शिवाय मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो. लिंबात टायरामाइन नावाचा घटक असतो. जो डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे ज्यांना डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी लिंबू पाणी प्रमाणात घ्यायला हवं.
- लिंबात सायट्रिक अॅसिड असतं. ज्यामुळे लिंबाच्या अति सेवनानं हे सायट्रिक अॅसिड दातात इनॅमल या घटकावर आघात करतो. हे इनॅमल कमी होतं . त्याचा परिणाम म्हणजे दात खराब होतात.
- लिंबाच्या अॅसिडिक गुणधर्मामुळे लिंबाच्या अधिक सेवनाचे परिणाम हे तोंडाच्या आरोग्यावरही होतो. लिंबू अधिक प्रमाणात खाल्ल्यास तोंडात छाले पडतात. किंवा तोंडात छाले असताना लिंबू अधिक प्रमाणात खाल्ल्यास हे छाले मोठे होतात, दुखतात आणि आग करतात.