निरोगी राहाण्यापेक्षाही सध्या वजन कमी करण्याला जास्त महत्त्व आलं आहे. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी हे खा, हे खाऊ नका अशा प्रकारच्या पोस्टस सतत समाज माध्यमांवर फिरत असतात. त्यातला सगळ्याच गोष्टी तज्ज्ञांनी सांगितलेल्या नसतात. काही ऐकीव-सांगीवही पोस्ट केलं जातं आणि वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम हा रस्ता चुकवून, शॉर्ट कट मारुन वजन कमी करु इच्छिणारे मग चुकीच्या सल्ल्यांच्या मागे जातात आणि स्वत:च्या आरोग्याचं नुकसान करुन घेतात.
Image: Google
नुकतीच समाज माध्यमवार वजन वाढलं म्हणून पोळी आणि भात एकाच वेळी खाऊ नये अशी एक पोस्ट वाचण्यास मिळाली. नंतर त्या पोस्टला दुजोरा देणारे लेखही प्रसारमाध्यमांमधे वाचण्यात आले. त्यात जेवताना पोळी आणि भात एकाच वेळी न खाता पोळी खात असाल तर भात खाणं टाळा आणि भात खात असाल तर पोळी खाणं टाळा असं म्हटलं होतं. त्याला कारण म्हणजे पोळी आणि भात एकाच वेळी खाल्ल्याने खाण्याचं प्रमाण जास्त होतं, शरीरात जास्त उष्मांक जातात, वजन वाढतं, पचन बिघडतं, पोळी आणि भात एकत्र खाल्ल्ल्यास हदयरोग आणि मधुमेहाचा धोका असतो अशी कारणं दिलेली होती.
हे वाचून प्रश्न पडला, की वरण-भात-भाजी-पोळी -चटणी-कोशिंबीर हा तर निरोगी अरोग्यासाठीचा चौरस आहार मानला जातो. विशेष काही सण समारंभ असेल तर ताटात गोडाचा पदार्थ, तळणीचे पदार्थ, मसालेदार भाजी हे असतं. आणि हे देखील आपण रोज खात नसल्यानं आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचं ठरत नाही. मग पोळी आणि भात एकाच वेळी खाल्ल्याने वजन कसं वाढेल?
Image: Google
यावर आयुर्वेद काय म्हणतं , यासाठी नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य रजनी गोखले यांच्याशी बोललं असतात्यांनी पोळी भात एकाच वेळी खाल्ल्यानं वजन वाढतं हा गैरसमज असल्याचं सांगितलं. हे चुकीचं असण्यामागचं कारण सांगताना त्यांनी निरोगी आरोग्य आणि संतुलित वजन यासाठी त्यांनी आहार कसा असावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शनही केलं.
एकसूरी नाही जेवणात संयोग हवा!
वैद्य रजनी गोखले म्हणतात, केवळ वजन हाच एक मुद्दा नसतो आहार ठरवताना चार पाच गोष्टींचा विचार करावा लागतो. वजन, वय, पचनशक्ती, कुठे राहातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हे पाहाता कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्रासदायक ठरतो. आहारात केवळ गव्हाची पोळी खात राहिलात तर ते चुकीचंच आहे. त्याचा पचनावर ताणच पडेल. दोन्ही वेळेसच्या जेवणात गहू आणि तांदूळ टाळून केवळ ज्वारीची भाकरी खाणं हे देखील चुकीचं आहे. आपल्या आहारात मिश्र धान्य असायला हवं. सकाळी गव्हाची पोळी असेल तर संध्याकाळी ज्वारी/बाजरी/नागलीची भाकरी खायला हवीत. दिवसभराच्या आहारात वेगवेगळी धान्यं असायला हवीत.पण चुकीच्या संकल्पनांना योग्य मानून कोणी आहारातून गहूच वजा करुन टाकतात आणि हलकी फुलकी म्हणून दोन्ही वेळेस ज्वारीची भाकरी खातात. पण याचा परिणाम म्हणजे नंतर सांधे दुखायला लागतात. कारण ज्वारी ही थंड गुणांची आहे. कोणी पोळी , भाकरी असं दोन्ही सोडून केवळ भाताचे प्रकार खात राहातात. तर काही दोन्ही तिन्ही वेळेस आहारात गव्हाचेच पदार्थ खातात. सकाळी पराठे, दुपारच्या जेवणात पोळ्या पुन्हा रात्रीच्या जेवणात पोळ्या खातात. हे सुध्दा चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टील प्रमाण आहे. त्यामुळे आहार एकसुरी नाही तर आहारात वैविध्य, संयोग आणि प्रमाणबध्दता हवी.
Image: Google
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून दिवसातून एकदाच गहू खावा. इतर वेळी वेगळी धान्यं खा. ज्वारी/बाजरी/नागली काहीही चालेल. एकाचाच अतिरेक मग ते गहू असो की ज्वारी ते आरोग्यासाठी वाईटच. आपल्या भारतीय आहारात स्वयंपाक हे शास्त्र आहे ती कला नाही. म्हणजेच आहारात विज्ञान आहे. स्वयंपाकाचं शास्त्र आहारात कॉम्बिनेशनला अर्थात संयोगाला महत्त्व देतं. म्हणूनच भाजी पोळी, वरण भात अशा जोड्या आहेत. आहारात सर्वसमावेशकता आणि व्यक्तिच्या प्रकृतीचा विचार महत्त्वाचा ठरतो.
Image: Google
जेवणात काय असावं?
1. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळच्या जेवणात पोळी असेल तर रात्रीच्या जेवणात भाकरी असावी.2. शक्यतो रात्रीचं जेवण हे वन डिश मिल असावं. ते चांगलं काम करतं.3. दुपारचं जेवण हे पूर्ण आहार असावा. भाजी पोळी, वरण भात, चटणी कोशिंबीर असा तर रात्रीचं जेवण हे हलकं असावं.4. रात्री आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे लवकर जेवायला हवं. उशिरा जेवलं तर पचन नीट होत नाही. मग शरीरात विषारी घटक साचत जातात. पचनाच्या विकृती निर्माण होतात. त्याचा परिणाम वजन वाढ आणि आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण होतात.
Image: Google
वन डिश मिल म्हणजे?
रात्रीच्या जेवणात वन डिश मिल म्हणून भाकरी आणि आमटी ( धान्य आणि डाळ) किंवा भाकरी आणि भाजी ( धान्य आणि भाज्या) , भात आणि आमटी (धान्य आणि डाळ) , खिचडी ( धान्य, डाळ आणि भाज्या) , भाज्या घालून केलेला दलिया ( धान्य आणि भाज्या) , भाज्या घालून केलेला पुलाव ( धान्य आणि भाज्या) हे वन डिश मिलमधे असावं. वन डिश मिल म्हणजे जेवणात एकाच प्रकारचं धान्य नव्हे , तर त्यातही कॉम्बिनेशन असावं. खिचडी, पुलाव, दलिया यात धान्य आणि भाज्यांसोबतच कांदा, लसूण, आलं, मिरची आणि इतर मसालेही असतात.त्यमुळे हे वन डिश मिल योग्य ठरतं, आरोग्यदायी, पचनास हलकं आणि वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतं.
( मुख्य मार्गदर्शन: वैद्य रजनी गोखले, प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ, नाशिक)
मुलाखत आणि लेखन: माधुरी पेठकर