अमूक गोष्ट करू नकाे वजन वाढेल, तमूक गोष्ट करू नको... वजन वाढेल.... पावभाजी, जिलेबी, केक बघून तोंडाला खूप पाणी सुटतंय... पण सध्या नको.. कारण वजन वाढेल.. असं म्हणत किती दिवस आणि कितीदा तुमच्या मनाला आणि जिभेला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न् करणार... प्रत्येक आवडत्या पदार्थात आणि त्या पदार्थाच्या प्रत्येक घासात वजनाचा (constant thinking about weight gain) काटा दिसत असेल तर कसं होणार आपलं...
वजन वाढू नये म्हणून काळजी घेणं, फिटनेससाठी रोज व्यायाम करणं आणि जे पदार्थ वजन वाढवण्यास मदत करतील, अशा पदार्थांपासून थोडं दूर असणं, हे सगळं काही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे नियम प्रत्येकाने जरूर पाळावेत. पण एखादा पदार्थ बघून जर तो पदार्थ चाखून पाहण्याची, त्याचा आस्वाद घेण्याची खूप जास्त इच्छा झाली तर मात्र केवळ वजनाच्या धास्तीने त्या पदार्थाकडे न बघणं आणि मनातल्या मनात जळफळत राहणंही अगदीच चुकीचं आहे.. इच्छा झाली ना तो पदार्थ खाण्याची, मग कशाला घाबरता खा की बिनधास्त... कशाला हवा आहे सारखा सारखा खाण्यातला गिल्ट.. असं सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर.
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट साेशल मिडियावर (social media) शेअर केली असून यामध्ये त्या खाण्याच्या गिल्टविषयीच बोलत आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी त्यात एक मस्तपैकी पावभाजीचा फोटो टाकला आहे. त्यावर बऱ्यापैकी बटरही घालण्यात आलं आहे. त्या म्हणतात की काही काळापुर्वी असं होतं की तुम्ही डाएटींगवर आहे म्हटलं की तुम्ही पावभाजी खा, पण त्यावर बटर घालू नका. आता असं म्हणतात की बटर टाका पण मग बटाट्याऐवजी त्यात कंद टाका. आता तुम्हीच बघा डाएटिंग आणि त्याच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. पण लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या या छोट्या छोट्या आनंदापासून दूर करायचं आणि गिल्ट ट्रॅपमध्ये अडकवायचं, हे मात्र आताही कायम आहे...
त्यामुळेच तर जर मनापासून एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली ना, तर खा, अगदी बिनधास्तपैकी खा. फक्त तो पदार्थ खाण्याची फ्रिक्वेन्सी मात्र वारंवार वाढवू नका. शिवाय तुम्हाला असं वाटलं की आता आपण हा पदार्थ खाल्ला मग आता आपलं वजन वाढणार.. तर मग दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्त व्यायाम करा.. असंच तर आपल्या बॉलीवूडच्या सेलिब्रिटीपण करत असतात. म्हणूनच तर शिल्पा शेट्टीचा मध्ये एकदा रबडी जिलेबी खाण्याचा, करिना कपूरचा पिझ्झा खाण्याचा आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा हिचा चक्क केक खाण्याचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता... म्हणूनच तर कोणत्याही गिल्ट ट्रॅपमध्ये न अडकता बिनधास्त खा...