अर्चना रायरीकर
एक ताई काल क्लिनिकल आल्या होत्या. दहा किलो कमी झाले परंतु त्यांना इतर आरोग्याच्या तक्रारी खूप आहेत मुख्य म्हणजे त्यांचं अंग सतत खूप दुखत असते, डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू आहे, हळूहळू प्रगती देखील होत आहे . त्यांनी बऱ्यापैकी चिकाटी ठेवलेली आहे.पण त्यांचा एक प्रश्न होता, श्रावणातले शुक्रवार, गौरी-गणपती, पुढे पक्षश्राध्द, नवरात्र, दिवाळी या सणवाराला कधीकाही वेगळं खायचंच नाही का? सतत हे डायट करत राहायचं का?हे आणि असे प्रश्न अनेक जण विचारत असतात. सणावाराला कुणाकडे गेलो आणि मी डाएट करतोय असं सांगायला लोकांना का कुणास ठाऊक पण खूप कमीपणा वाटतो आणि लोक आपल्याला हसतील का, चिडवतील का अशी खूप भीती वाटते.त्या मुळे बरेच जण ही गोष्ट सर्वांना प्रश्न लपवून ठेवतात. आपण एवढी मेहनत करतो, एक एक किलो वजन कमी करायला मेहनत करावी लागते. पण मग त्यात काही खंड आला की त्यामुळे खूप वाईट वाटते आणि सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडल्यासारखे होते. शिवाय शुगर वाढली की परत जीव कासावीस होतो.अशा वेळेस काय करायचं?इथे एक मुद्दा लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये ज्या चरबीच्या पेशी असतात त्यांची संख्या कधीच कमी होत नाही त्यातील फॅटचे प्रमाण कमी होतं चरबीच्या पेशींची संख्या तीच राहते त्यामुळे आपण डाएट केलं की त्या आकुंचन पावतात आणि आपण जेव्हा तेलकट वा गोड खातो तेव्हा त्या पेशींमध्ये फॅट्स वाटतात त्यामुळे हे लक्षात घ्या की आपल्या शरीरातील फॅट्स कुठेही हवेत उडून जात नाही ते तसेच असतात.
(छायाचित्र : गुगल)
पण मग करायचं काय? उपाय काय यावर?
१.पहिली गोष्ट म्हणजे सणासुदीला किंवा कुठे आपल्याला बाहेर खायची वेळ आली तर जो काही मूळ डाएट डायटिशियनने लिहून दिलेला आहे तो अजिबात मोडू नका. सकाळी आवळा पावडर किंवा ग्रीन टी स्मूदी, फळ खाणे योग्य नाश्ता हे तसंच चालू ठेवा.२. ज्या दिवशी बाहेर खायचे त्या दिवशी भरपूर पाणी प्या, थोडासा जास्तच प्या. आणि जिथे जेवायला जाणार आहोत तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा थोडेसे जास्त पाणी जेवायच्या आधी घ्या. त्यामुळे पोट भरल्यासारखं होईल आणि दोन घास कमीच खाल्ली जातील.जेवणाच्या आधी एक-दोन चमचे इसबगोल किंवा कुठलाही फायबर सप्लीमेंट आपण जर पाण्यातुन घेतलं तर ते पोटात बसल्यासारखं होतं. जेवण आपोआप थोडं कमी होतं.३.आपण जेवायला बसलो आहे आणि लोक आपल्याला खूप आग्रह करत आहेत त्यावेळेस थोड सावकाश खा म्हणजे दोन गोष्टी साध्य होतील एक म्हणजे हळू सावकाश चावून खाणे होईल त्यामुळे पचन चांगले राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताटामध्ये पदार्थ दिसत असल्यामुळे लोक जास्तीचे देखील वाढणार नाही.
(छायाचित्र : गुगल)
४.जर तुमच्या फारच जवळच्या व्यक्ती असतील म्हणजे असे की खास मैत्रीण, बहिण ,आई त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काय काय खाऊ शकाल हे नक्की सांगा. त्यांनाही त्या पद्धतीने पदार्थ बनवता येतील जसं की कोशिंबीर ,भाजी चे प्रमाण जास्त करता येईल.५.नैसर्गिक फॅट बर्नर पावडर देखील या काळामध्ये घेता येईल. याचा अनुभव लॉक डाऊन मध्ये चांगलाच आला. त्यावेळेस लोकांना बऱ्याच गोष्टी उपलब्ध होत नव्हत्या आणि व्यायाम करणे शक्य नव्हते परंतु त्यांनी ही पावडर चालू ठेवली आणि त्यामुळे त्यांचे वजन कमी तरी झाले किंवा मेंटेन तरी व्हायला त्यांना मदत झाली. त्यामुळे या काळामध्ये ही पावडर मात्र नक्की चालू ठेवा.६.एखादी मस्त तूप लावुन पुरण पोळी खाल्ली तर खाताना किंवा खाल्ल्यावर आता माझं वजन वाढणार असा सतत जप करू नका नाहीतर नक्कीच ते वाढेल.
(छायाचित्र : गुगल)
७.कुठलाही प्रोग्रामला फोकस असतो तो फक्त खाण्यावर असू शकतो तो तसा न ठेवता गप्पा, फोटो काढणं, एन्जॉय करणे ह्या गोष्टींवर भर असू द्या. लग्नकार्य, सणासुदीला जाणे बाहेर जाणे या सगळ्या गोष्टी होणार कारण की सोशलायझेशन करणं हा मनुष्याचा आवडता असा धर्मच आहे त्यामुळे तो आपण नक्कीच एन्जॉय करायला हवा.८. डाएटमधून कधी ब्रेक घ्या. एक ते दोन किलो वाढलंच वजन तर एकदा आपले रुटीन लागले की वेळ न घालवता लगेच डाएट व्यायाम सुरू करा म्हणजे वाढलेलं वजन लगेच कमी होईल, त्याला सेट होण्यासाठी जास्त वेळ देऊ नका. निःशंक पणे आपल्या प्रिय सणांचं स्वागत करु. हे सूंदर दिवस आनंदाने जगू !
(लेखिका डायटिशियन आहेत.)