उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढतोच आहे. सगळीकडेच जणू उष्णतेची लाट आली आहे. अशा उन्हात ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं, त्या लोकांना तर उष्णतेचा त्रास होतोच, पण घरात असणाऱ्यांनाही थोड्या फार फरकाने सारखाच त्रास सहन करावा लागतो आहे. खूप ॲसिडिटी (acidity) होणं, भूक न लागणं, थकवा, अशक्तपणा (weakness), रात्री व्यवस्थित झोप न लागणं, अशा अनेक प्रकारचा त्रास सध्या अनेकांना जाणवतो. हे सगळं काही शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होत आहे. म्हणूनच उष्णतेचा त्रास कसा कमी करायचा याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ३ उपाय
१. स्थानिक फळं (local fruit)
याविषयी सांगताना ऋजुता दिवेकर म्हणाल्या की या दिवसांत तुमच्या प्रांतात अगदी सहज मिळणारे कोणतेही स्थानिक रसाळ फळ खाल्लेच पाहिजे. कारण अशा फळांमध्ये उष्णता कमी करणारे गुणधर्म असतात. जी फळे चावल्याबरोबर लगेच ज्यूस येतो, अशी रसाळ स्थानिक फळे खाण्यास प्राधान्य द्या.
२. दही भात (curd rice)
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात दही भात खायलाच पाहिजे. यासाठी सकाळीच भात लावून ठेवा. दुपारपर्यंत तो थंड होतो. मग असा थंड भात, दही आणि थोडंसं मीठ ताटात वाढून घ्या. व्यवस्थित कालवा आणि खा. दह्यामुळे पोट आणि डोकं दोन्हीही शांत राहण्यास मदत होते. दहीभात खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे ज्यांना उन्हाळ्यात काही खाण्याची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, त्यांच्यासाठीही हा उपाय उत्तम आहे.
३. गुलकंद पाणी (gulkand water)
रात्री झोपताना एक टेबलस्पून गुलकंद आणि १ ग्लास पाणी हे मिश्रण एकत्र करून प्या. हा उपाय केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.. दिवसभराचा थकवा कमी होतो. रात्री गरमी किंवा उष्णतेमुळे ज्यांना झोप येत नाही, त्यांच्यासाठीही हा उपाय उपयुक्त आहे. रात्री ज्यांना पायांत गोळे येण्याचा त्रास होतो, सकाळी उठल्यावर ज्यांना खूप ॲसिडीटी होते किंवा खूप जास्त स्क्रिन पाहिल्याने डोळे थकल्यासारखे होतात, अशा प्रत्येकासाठीच हा उपाय गुणकारी ठरतो. शिवाय गुलकंदातील गुलाब पाकळ्या त्वचेसाठीही पोषक ठरतात.