Join us  

हिवाळ्यात खायलाच हवेत ३ पदार्थ...तज्ज्ञ सांगतात, थंडीत तंदुरुस्त राहायचं तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 12:17 PM

Food for Winter Diet Tips by Rujuta Divekar : थंडीत होणारी बद्धकोष्ठता, केसातील कोंडा, त्वचेचा कोरडेपणा यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी आहारात करा सोपे बदल

ठळक मुद्देबद्धकोष्ठतेसारख्या समस्येवरही सुंठीचा फायदा होतो. चहामध्ये किंवा हळदीच्या दुधात सुंठ घालून घेऊ शकतो. ज्या त्या ऋतूमध्ये ऋतुला साजेसा असाच आहार घ्यायला हवा

थंडीच्या दिवसांत शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. वातावरणात गारठा असल्याने शरीरही जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च करते. अशावेळी खर्च झालेली ऊर्जा भरुन काढायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. थंडीच्या दिवसांत साधारणपणे शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक अशा कोणत्या गोष्टी आवर्जून खायला हव्यात याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली असून कोणते ३ पदार्थ थंडीत खायला हवेत याविषयी त्यांनी सांगितले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या याबाबतची माहिती देतात. थंडीत होणारी बद्धकोष्ठता, केसातील कोंडा, त्वचेचा कोरडेपणा यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी हे पदार्थ खाणे फादेशीर ठरते (Food for Winter Diet Tips by Rujuta Divekar). 

(Image : Google)

१. बाजरी 

बाजरीला पर्ल मिलेट या नावानेही ओळखले जाते. बाजरीमध्ये लोह, अमिनो अॅसिड, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या काळात बाजरी खाणे फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर थंडीच्या दिवसांत कोरडेपणामुळे किंवा अन्य काही कारणांनी तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर बाजरी खाणे हा त्यावरील उत्तम उपाय आहे हे लक्षात घ्या. बाजरीची भाकरी, लाडू किंवा खिचडी असे पदार्थ करता येतात जे चवीलाही अतिशय चांगले लागतात. 

२. तीळ 

तीळ हे उष्ण असल्याने प्रामुख्याने फक्त थंडीच्याच काळात खाल्ले जातात. संक्रांतीला आपल्याकडे आवर्जून तिळाचा लाडू, वड्या, पोळी हे पदार्थ केले जातात. तीळामध्ये फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे तीळ त्वचेसाठी फायदेशीर असतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठीही तीळ खाण्याचा फायदा होतो. तिळाची चटणी, एखाद्या पदार्थावर तीळ भुरभुरणे असा तिळाचा वापर करता येतो.     

३. सुंठ 

सुंठ म्हणजेच वाळलेलं आलं. थंडीच्या दिवसांत विविध आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी आपण आल्याचा किंवा सुंठीचा वापर करतो. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी सुंठ अतिशय फायदेशीर असते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्येवरही सुंठीचा फायदा होतो. चहामध्ये किंवा हळदीच्या दुधात सुंठ घालून घेऊ शकतो. इतकेच नाही तर खिचडीवर फोडणी देतानाही त्यात सुंठ वापरता येतो.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाथंडीत त्वचेची काळजी