Join us  

अजिबात गोड नाही म्हणून तुम्ही विकत आणता असे ३ पदार्थ, सावधान त्यातच असते सर्वाधिक साखर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 9:42 AM

Food Items That Have More Sugar Not Good For Health : अनेकदा आपण पाकीटावर लिहीलेले घटक नीट वाचत नाही...

गोड खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून आपण आहारात गोड पदार्थ खाणं टाळतो. साखर खाल्ल्याने वजन वाढतं, डायबिटीसची समस्या वाढते याशिवाय इतरही अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून आहारात साखर आणि मीठ, जंक फूड या गोष्टी कमी प्रमाणात घ्यायला हव्यात असं तज्ज्ञ आपल्याला सांगतात. पण गोड नाही म्हणून आपण काही पदार्थ बाजारातून आणतो. मात्र त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर असते हे अनेकदा आपल्याला माहितही नसतं (Food Items That Have More Sugar Not Good For Health). 

आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर पॅकेट फूड, कॅन फूड खाऊ नये असे आपल्याला वारंवार सांगतात. ताजे अन्न केव्हाही आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. हेच पॅकेज फूड दिर्घकाळ टिकावे यासाठी त्यामध्ये साखर, मीठ, तेल आणि इतर प्रिझर्व्हेटीवजचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. पण आपण या पदार्थांमध्ये असलेले घटक नीट वाचत नाही आणि आवड किंवा चवीला चांगले लागते म्हणून हे पदार्थ खात राहतो. सात्विक मूव्हमेंट या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून आपण नियमित खात असलेल्या अशाच ३ पदार्थांविषयी सांगण्यात आले आहे. आता असे पदार्थ कोणते त्याविषयी...

१. चिप्स

अनेकदा आपल्याला काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट खायची इच्छा होते म्हणून आपण बाजारातून चिप्सचे पॅकेट आणतो. हे तेलकट आणि मीठयुक्त असल्याचे आपल्याला माहित असते. पण या चिप्समध्ये साखर असेल असं आपल्याला वाटतही नाही. मात्र याचे घटक पदार्थ वाचल्यावर वेगवेगळ्या नावाच्या घटकांनी यामध्ये साखर असल्याचे दिसते. डेक्सट्रोस, सुक्रोज, ग्लुकोज, माल्टोडेस्क्ट्रीन यांसारखी साखरेची वेगवेगळी नावे या यादीत असतात. या सगळ्या प्रकारची साखर पांढऱ्या साखरे इतकीच आरोग्यासाठी घातक असते. 

२. पॅकेज्ड ज्यूस

उन्हाळ्याच्या दिवसांत आणि एरवीही अनेकदा आपण पॅकेज्ड ज्यूस पितो. यावर १०० टक्के प्युअर, फ्रेश, नैसर्गिक असे लिहीलेले असते. मात्र प्रत्यक्षात हा ज्यूस टिकावा म्हणून यामध्ये भरपूर प्रिझर्व्हेटीव घातलेले असतात. त्यात साखरेचे प्रमाणही भरपूर असते. 

३. टोमॅटो केचअप

लहान मुले आणि अनेकदा मोठे लोकही मोठ्या प्रमाणात केचअप खातात. आंबट-गोड असल्याने अनेकांना केचअप खूप आवडते. असे लोक कोणत्याही पदार्थासोबत केचअप खातात. पण यामध्ये टोमॅटोचे प्रमाण फक्त २३ टक्के इतकेच असते. म्हणजे इतर घटक किती प्रमाणात असतात हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजेच यामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असल्याने केचअप जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना