फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषणमुल्ये असतात. त्यामुळे दररोज एक तरी फळ खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार काही जण नियमित फळं खातातही. पण त्याचा पुरेसा लाभ शरीराला मिळत नाहीये असं काही जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदातही असं सांगितलेलं आहे की आपण जे काही खातो, ते आपल्या अंगी तेव्हाच लागतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे काही नियम पाळतो (Food items that should be eaten together). कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं, याचेही काही नियम आहेत. असेच काही नियम फळांच्या बाबतीतही आहेत.(Best food combinations for health)
म्हणूनच या लेखामध्ये आपण कोणते फळ किंवा भाजी कशासोबत खावी, जेणेकरून त्या पदार्थाचे पुरेपूर लाभ आपल्या शरीराला मिळतील, याविषयी जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती इन्स्टाग्रामच्या healthylyfff या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात सांगितलेल्या खाद्यपदार्थांच्या जोड्या एकमेकांसाठी पुरक असून त्यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी अतिशय पोषक असतं, असं यात सांगण्यात आलं आहे.
कोणत्या फळासोबत काय खावं...
१. सफरचंद आणि डार्क चॉकलेट
सफरचंद आणि डार्क चॉकलेट एकानंतर एक लगेचच खाणं आरोग्यासाठी चांगलं मानण्यात आलं आहे. सफरचंदामध्ये ॲण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. तसेच डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. या दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास रक्ताच्या गाठी होण्याची समस्या कमी होते, तसेच रक्ताभिसरण अधिक चांगल्याप्रकारे होते.
२. सफरचंद आणि पीनट बटर
डार्क चॉकलेटप्रमाणेच पीनट बटरसोबत सफरचंद खाणं चांगलं मानलं जातं. सफरचंदामध्ये सिंपल कार्ब्स आणि फायबर यांचं प्रमाण चांगलं असतं. तसेच पीनट बटरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रोटीन्स मिळतात.
३. बीट आणि हरबरे
बीटमधून शरीराला भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम मिळतं. हे मॅग्नेशियम शरीरात शोषून घेण्यासाठी हरबऱ्यांमध्ये असणारे व्हिटॅमिन बी ६ उपयुक्त ठरते.
४. टोमॅटो आणि ॲव्हाकॅडो
टोमॅटोमध्ये लायकोपीन असते. जे कॅन्सरविरुद्ध लढण्यास मदत करते. ॲव्हाकॅडोमध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स लायकोपीनची ताकद आणखी वाढविण्यास मदत करतात.