चहासोबत हमखास काही जणांना बिस्किटं खायला आवडतं. कुणाला चहासोबत ब्रेड आणि बटर खायला आवडतं. तर कुणाला चहासोबत खारी- टोस्ट असे पदार्थ असले की मजा येते. पावसाळी वातावरणात जर संध्याकाळचा चहा घेत असाल तर मग त्यासोबत भजी, सॅण्डविज, मॅगी किंवा असेच काहीसे चटकमटक पदार्थ हमखास संपवले जातात. चहासोबत अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद निश्चितच वेगळा आहे. पण चहासोबत किंवा चहा घेतल्यानंतर आपण लगेचच काय खाऊ नये (food that should not eat with tea), हे जाणून घेणंही गरजेचं आहे. कारण यामुळे विरुद्ध अन्न एकत्र येऊन त्यांची आपापसात रिॲक्शन होते आणि त्याचा तब्येतीवर वेगळाच परिणाम होतो. त्यामुळे चहासोबत काय खाऊ नये, हे पण एकदा नक्की वाचा. (Eating these food items with tea is harmful for health)
चहासोबत खाऊ नयेत असे पदार्थ
१. लोह भरपूर असणारे पदार्थ
चहासोबत किंवा चहा घेतल्यानंतर लगेचच सुकामेवा किंवा सुकामेव्याचा भरपूर वापर असणारे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या असणारे पदार्थ किंवा लोह भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ खाऊ नयेत, असे हॉर्वर्ड विद्यापीठातील न्युट्रीशन विभागातर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात सांगितले आहे. चहा घेतला की आपल्या शरीरात त्यामध्ये असणारे टॅनिन आणि ऑक्झालेट जाते. या दोन्ही घटक विविध पदार्थांच्या माध्यमातून शरीरामध्ये येणाऱ्या लोहाला रक्तात मिसळण्यापासून थांबवते. याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.
२. थंड पदार्थ
गरम चहा प्यायल्यानंतर लगेचच कोणताही थंड पदार्थ खाणे, थंड पदार्थ खाल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर गरमागरम चहा पिणे, या दोन्ही गोष्टी टाळायला पाहिजेत. कारण हे दोन विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकानंतर एक घेतले तर त्याचा पचनावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ॲसिडीटी, गॅसेस असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चहानंतर थंड पदार्थ खायचा असल्यास किंवा थंड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा घ्यायचा असल्यास मध्ये अर्धा ते पाऊण तासाचा वेळ जाऊ द्यावा.
३. लिंबू
दूध घातलेला चहा आणि त्यानंतर किंवा त्यासोबतच लिंबू असणारा एखादा खाणे टाळा. चहामध्ये असणारे घटक आणि लिंबामधलं सायट्रिक ॲसिड यांची एकमेकांशी रिॲक्शन होऊन त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही जणं लेमन टी, ग्रीन टी घेणे पसंत करतात. पण आहारतज्ज्ञांच्या मते ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी लिंबू असलेला ग्रीन टी, लेमन टी घेणे टाळावे. अशा पद्धतीचा चहा सकाळी रिकाम्यापोटी घेत असाल तर एकदा आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
४. बेसनाचे पदार्थ
पावसाळ्यात तर चहा आणि भजी हे एक जबरदस्त हिट कॉम्बिनेशन मानलं जातं. पण चहासोबत किंवा चहानंतर लगेचच बेसन असणारे पदार्थ खाल्ले तर चहातील टॅनिनमुळे शरीरातील पोषक घटक रक्तात मिसळण्यास अडथळा येतो. त्यामुळे चहा- भजी हे कॉम्बिनेशनही आहारतज्ज्ञांच्या दृष्टीकोनातून फारसे योग्य नाहीच.