Join us  

सतत भूक लागल्यानं वाढतं वजन, भूक नियंत्रित ठेवण्यासाठी रोजच्या आहारात हव्या 7 गोष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 7:26 PM

भूक नियंत्रित करणं म्हणजे कमी खाणं, न खाणं असं नव्हे. पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार घेऊन भूक नियंत्रित ठेवता येते.

ठळक मुद्देभूक-खाणं-भूक हे चक्र सतत सुरु राहिल्यानं त्याचा परिणाम वजनावर होतो. सतत भूक लागल्यानंतर खाल्ले जाणारे पदार्थ हे चटपटीत आणि फास्ट फूडमध्ये मोडणारे असल्यानं सतत भूक लागणं थांबत नाही आणि त्याचा परिणाम वजनावर होतो.

सतत भूक लागली की खाण्याचं प्रमाण वाढतं. खाल्ल्यानंतर भूक भागायला हवी, पण तसं होत नाही. पुन्हा काही वेळानं भूक लागते, की पुन्हा खाल्लं जातं. भूक-खाणं-भूक हे चक्र सतत सुरु राहिल्यानं त्याचा परिणाम वजनावर होतो. सतत भूक लागल्यानंतर खाल्ले जाणारे पदार्थ हे चटपटीत आणि फास्ट फूडमध्ये मोडणारे असल्यानं सतत भूक लागणं थांबत नाही आणि त्याचा परिणाम वजनावर होतो. यावर उपाय एकच तो म्हणजे भूक नियंत्रित करण्याचा. भूक नियंत्रित ( control hunger)  करणं म्हणजे कमी खाणं, न खाणं असं नव्हे. पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार  (food for control hunger) घेऊन भूक नियंत्रित ठेवता येते. आहार तज्ज्ञांच्या मते आहारात 7 गोष्टींचा (weight loss food) समावेश आवर्जून केल्यास भूक नियंत्रणात राहाते.

भूक नियंत्रित करण्यासाठी..

Image: Google

1. घेवडा

आहारात घेवड्याचा समावेश केल्यास भूक नियंत्रणात येते. कारण घेवड्यात अर्थात बीन्समध्ये प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. घेवड्याचं सेवन केल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. घेवड्याचं पचन होण्यास वेळ लागतो त्यामुळे जेवणात घेवडा असल्यास लवकर भूक लागत नाही. 

Image: Google

2. ओट्स

ओट्स, ओट्सचे पदार्थ सेवन केल्यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होत नाही. ओट्समध्ये गुंतागुंतीचे कर्बोदकं असतात. हे कर्बोदकं चांगले समजले जातात. त्यांचं पचन होण्यास वेळ लागतो आणि म्हणूनच ओट्स खाल्ल्याने भरपूर वेळासाठी भूक भागते. 

Image: Google

3.सुकामेवा

बदाम, अक्रोड, शेंगदाणे, मनुका, खजूर हा सुकामेवा खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. सुकामेव्यात प्रथिनं, फॅट्स, फायबर आणि खनिजांचं प्रमाण भरपूर असतं. सुकामेवा खाल्ल्यानं भूक नियंत्रणात राहाते. वजन आटोक्यात राहातं आणि शरीराचं पोषण होतं. 

Image: Google

4. धान्यं

आहारात केवळ गहू तांदूळ या दोन धान्यांसोबतच नागली, ज्वारी, बाजरी, मका या आख्या धान्यांचा समावेश हवा. या धान्यांमध्ये गुंतागुंतीच्या कर्बोदकांचा समावेश असतो. ही धान्यं पचण्यास वेळ लागतो त्यामुळे भूक नियंत्रणात राहाते.

Image: Google

5. हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या पोषणाच्या आणि वजन नियंत्रणाच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत.  हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या फळभाज्यांमध्ये जीवनसत्वं, फायबर, ॲण्टिऑक्सिडण्टस आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. या भाज्या आहारात असल्यास पोट भरलेलं राहातं. शरीरात चरबी जमा होत नाही. तसेच या भाज्यांमध्ये उष्मांकही कमी असतात. भूक नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणूनच या भाज्या खाण्यास महत्व आहे. 

Image: Google

6. डेअरी उत्पादनं

दूध, दही, पनीर, चीज यासारख्या दुधाच्या पदार्थांमुळे शरीरात फॅट सेल्स निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यानं पोट भरल्याचं समाधान लवकर मिळतं. 

7. लाह्या

ज्वारी, मका, साळी यांच्या लाह्या खाल्ल्यानं भूक नियंत्रणात राहाते. लाह्यांमध्ये फायबरचं आणि ओमेगा 3चं प्रमाण भरपूर असतं. शरीरास पोषक घटक मिळण्यास आणि भूक नियंत्रित ठेवण्यास लाह्या खाण्याला महत्व आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाअन्न