Join us  

वर्क फ्रॉम होम करताना दणकून वाढतंय वजन? जाड झालात? - बारीक होण्यासाठी या टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 1:50 PM

कोरोना कृपेमुळे मागील दीड वर्षांपासून अनेकजणी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे जाडी वाढत चालली आहे, पचनाला प्रॉब्लेम येतोय, भुकच लागत नाहीये, अशा अनेक तक्रारी वाढत चालल्या आहेत. या सगळ्या समस्या कमी करायच्या असतील तर फक्त ३ पदार्थ खा, असे सांगत आहेत प्रसिद्ध आहार तज्ज्ञ ऋजूता दिवेकर.

ठळक मुद्देवर्क फ्रॉम होम करताना खूप वेळ एकाच जागी बसावे लागत असल्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. यामुळे भुकेची जाणीव होत नाही, असे काही महिलांनी सांगितले.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणं सध्या अनेक जणींसाठी गरजेचं झालं आहे. वर्क फ्रॉम होम करण्याचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच त्याचे नुकसानही आहे. वर्क फ्रॉम होममुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत, असे बहुसंख्य महिलांचे मत आहे. मागील दिड वर्षात तर वर्क फ्राॅम होम करणाऱ्या ९० टक्के महिलांचे वजन वाढले आहे. अनेकींना पचनाच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तर काही जणींचे असे मत आहे की, आजकाल आम्हाला भुकेची जाणीव होतच नाही. आरोग्याच्या या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील, तर आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी सांगितलेले हे ३ पदार्थ फक्त आहारात घ्या. पचनाच्या समस्या तर दूर होतीलच पण शरीरावर साचणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास सुरुवात होईल .

 

फक्त हे तीन उपाय करा१. दररोज ताजी फळे खापचन संस्थेचे कार्य सुधारायचे असेल, तर सगळ्यात आधी आहारात ताजी फळे घ्यायला सुरुवात करा. नियमितपणे ताजी फळं खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र फळांची निवड काळजीपुर्वक करा. आजकाल विदेशी फळे खाण्याचे खूपच फॅड आहे. त्यामुळे ऋजूता दिवेकर यांनी कोणती फळे खावीत, याविषयी विशेष माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, तुमच्या घराच्या जवळच्या बाजारात जी फळे अगदी सहजपणे उपलब्ध होतात, ती फळे खा.

 

ज्या फळांचे नाव आपल्या घराजवळच्या प्रत्येकाला माहिती आहे, जी फळे हंगामी आहेत, अशीच ताजी फळे खावीत. पचन संस्थेच्या तक्रारी कमी करण्यासाठी चिकू खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. दररोज ताजी फळे खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतात. फायबर खाल्ल्यामुळे पचनकार्य सुधारते. तसेच फळांमधून ॲण्टी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात मिळतात. फ्री रॅडिकल्सला नष्ट करण्यासाठी शरीराला ॲण्टी ऑक्सिडंट्स मिळणे गरजेचे असते. याशिवाय ताजी फळे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. 

 

२. फुटाणे आणि गुळ आवश्यक वर्क फ्रॉम होम करताना खूप वेळ एकाच जागी बसून रहावे लागते आहे. त्यामुळे कंबरेखालचा भाग, मांड्या यांची जाडी वाढल्याची तक्रार अनेकजणी करत आहेत. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणून जास्त वेळ बसून राहिल्यामुळे कंबरेखालची बॉडी लूज होत नाही. याशिवाय जास्त वेळ बसून राहिल्याने कंबरेखालच्या भागातील बोन मिनरल डेन्सिटी देखील कमी होत जाते.

 

बाेन मिनरल डेन्सिटी कमी झाल्यामुळे महिलांचे मासिक पाळीचे चक्र बिघडते. काही महिलांना पिरेड्समध्ये खूपच ब्लिडिंगचा त्रास होतो तर काही महिलांचे खूपच डोके दूखते. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी फुटाणे खाण्याचा सल्ला ऋजूता दिवेकर यांनी दिला आहे. फुटाण्यांमध्ये अमिनो ॲसिड, खनिजे आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे काम करताना बिस्किटे, कुकीज, कपकेक असे काही खाण्याऐवजी फुटाणे खावेत.

जेव्हापासून वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे, तेव्हापासून गोड पदार्थ देखील खूपच खावेसे वाटतात, असे काही महिला सांगतात. तुम्हालाही जर गोड खाण्याची तिव्र इच्छा झाली तर फुटाण्यांमध्ये गुळ टाका आणि हे मिश्रण बारीक चावून चावून खा. असे खाल्ल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन बी देखील योग्य प्रमाणात मिळेल. शरीराला व्हिटॅमिन बी चा योग्य पुरवठा झाल्यास मनावरचा ताण कमी होतो आणि रिलॅक्स वाटते. 

 

३. साजूक तूप खा.वर्क फ्रॉम होम करताना खूप वेळ एकाच जागी बसावे लागत असल्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. यामुळे भुकेची जाणीव होत नाही, असे काही महिलांनी सांगितले. पोट कधी भरलंय, कधी रिकामं आहे, हेच समजत नाही. यामुळे कुठे थांबावं आणि किती खावं, हेच समजत नाही. तुम्हालाही असे होत असेल, तर साजूक तूप खा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अशा सगळ्यांमध्ये एकेक टी स्पून साजूक तूप घ्या. यामुळे पचनाच्या समस्या दूर होतील आणि भुकेची योग्य जाणीव होईल, असेही ऋजूता यांनी सांगितले. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स