Join us  

गांधीजींचे आहार नियम आजही डाएट वेटलॉससाठी उपयुक्त; जीवनशैलीला शिस्त लावणारे 7 नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 2:40 PM

सत्य, अहिंसा या प्रयोगांसोबतच गांधीजींनी अन्नावर देखील खूप प्रयोग केले. या प्रयोगांकडे पाहिलं असता विविध क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात की, त्या अर्थानं गांधीजींना भारतातील पहिले ‘पोषण तज्ज्ञ’ अथवा ‘डाएट गुरु’’ म्हणायला हवं. हे वाचून गांधीजींचा आणि डाएटचा काय संबंध? असा प्रश्न पडल्यावाचून राहाणार नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गांधीजींनी जगताना पाळलेले आहारविषयक नियमात आहे.काय सांगतात हे नियम?

ठळक मुद्देगांधीजींचा अन्नाविषयक पहिला नियम म्हणजे खूप खाणं, दिवसातून अनेकवेळा खाणं टाळावं.गांधीजी प्रक्रियायुक्त साखर आणि त्या साखरेचे पदार्थ खाण्यास नकार द्यायचे. फळातून मिळणार्‍या नैसर्गिक साखरेला गांधीजी महत्त्व द्यायचे.अन्नावर खूप प्रक्रिया करुन खाणं गांधीजींना मान्य नव्हतं.म्हणूनच गांधीजी भाज्या प्रामुख्याने कच्च्या खायचे.

 खाण्यातून काय मिळतं? या प्रश्नाचं आपण उत्तर देणार आनंद. सुख, समाधान. पण अन्न एवढ्यासाठीच खायचं असतं का? जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्न खाल्लं गेलं तर त्यातून आनंद हा तात्पुरता मिळतो पण सोबत वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या आणि स्थूलता यासारखे प्रश्न निर्माण होतात. आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मग डॉक्टर, आहार तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा लागतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत औषधं आजार बरे करण्यास फायदेशीर ठरतात असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी जीवनशैली सुधारणं हाच पर्याय महत्त्वाचा ठरतो. जीवनशैलीत आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. या दोन गोष्टींची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून गांधींजींच्या दृष्टिकोनातून होत आहे.

नुकतीच गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गांधीजींचे विचार, तत्त्वं, मूल्यं या गोष्टींवर देशभरात चिंतन मनन होवून त्यांना आदरांजली वाहाण्यात आली. गांधीजींनी आपल्या जीवनात अनेक प्रयोग केले. त्या सर्वांवर स्वतंत्रपणे पुस्तकं निघाली. सत्य, अहिंसा या प्रयोगांसोबतच गांधीजींनी अन्नावर देखील खूप प्रयोग केले. या प्रयोगांकडे पाहिलं असता विविध क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात की, त्या अर्थानं गांधीजींना भारतातील पहिले ‘पोषण तज्ज्ञ’ अथवा ‘डाएट गुरु’’ म्हणायला हवं. हे वाचून गांधीजींचा आणि डाएटचा काय संबंध? असा प्रश्न पडल्यावाचून राहाणार नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गांधीजींनी जगताना पाळलेले आहारविषयक नियमात आहे. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाळलेले आहारविषयक नियम आज इतक्या वर्षानंतरही कालसुंसगत असून विविध आजारांवरचे उपाय त्यातून मिळतात. निरोगी आरोग्याचं रहस्य गांधीजींनी स्वत: आहाराचे नियम पाळून केव्हाच सांगून ठेवलं आहे.वजन कमी करण्यासाठी हे नाहीतर ते , ते नाहीतर आणखी दुसरं कुठलं तरी अशा डाएटच्या मागे धावणार्‍यांनी गांधीजींच्या आहाराचे नियम समजून ते स्वत:ही पाळायला सुरुवात केली तर वजन कमी होईलच शिवाय शरीर सुदृढ आणि निरोगी आरोग्य कमावण्यासाठीही ते महत्त्वाचं ठरेल.

Image: Google

गांधीजींचे आहार नियम

गांधीजींचा अन्नाबाबतचा मुख्य विचार होता की अन्न हे फक्त भूक भागवण्यासाठी नसतं तर माणसाच्या सदसदविवेकबुध्दीला आकार देण्याचं काम अन्न करतं. स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य अन्न शिकवतं. गांधीजी म्हणतात की, हे खरं आहे की, माणूस हवा पाण्याशिवाय राहू शकत नाही. पण माणसाला सजगता आणि ऊर्जा ही फक्त अन्नातूनच मिळते.

1. गांधीजींचा अन्नाविषयक पहिला नियम म्हणजे खूप खाणं, दिवसातून अनेकवेळा खाणं टाळावं. दिवसभरात मधेमधे अनेकवेळा खाल्ल्याने शरीरात स्टार्च आणि साखर जास्त जाते , त्याचा परिणाम म्हणून ते विविध आजारांना आणि वजन वाढण्याला कारणीभूत ठरतं.

2. साखर अर्थात रिफाइंड शुगर हा आपल्या आहाराचा मुख्य भाग झाला आहे. पण गांधीजी प्रक्रियायुक्त साखर आणि त्या साखरेचे पदार्थ खाण्यास नकार द्यायचे. फळातून मिळणार्‍या नैसर्गिक साखरेला गांधीजी महत्त्व द्यायचे. म्हणूनच गांधीजीच्या रोजच्या आहारात ताजी, मोसमी फळं असायचीच.

3. साखरेसोबतच मीठाच्या सेवनासंबंधीही गांधीजींचे नियम होते. आहारातून मीठ वजा करुन चालणार नाही हे गांधीजींना माहित होतं. पण अती प्रमाणात मीठ खाल्ल्याने होणारे दुष्परिणामही त्यांना माहीत होते. म्हणूनच गांधीजी स्वत:चं जेवण तयार करताना त्यात जुजबी मीठ घालायचे. वरुन मीठ घेऊन खाणं हे गांधीजींच्या मते धोकादायक होतं.

4. गांधींजीचा प्रयोगांवर विश्वास होता. जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रयोग केले. अन्नाच्या बाबतीतही ते प्रयोग करत होते. काय खाणं चांगलं आणि काय वाईट, वाईटाला चांगला पर्याय कोणता हे देखील गांधीजींना त्यांनी केलेल्या प्रयोगातूनच उमगलं. गांधीजींचा शाकाहारावरच विश्वास होता. गांधीजींनी सहा वर्ष आपल्या आहारातून दूध पूर्णपणे वर्ज्य केलं होतं. पण गांधीजींना या प्रयोगातली चूकही उमगली. त्यांना आहारात दूध नसल्याचे दुष्परिणाम अनुभवास यायला लागले. त्यांचं वजन कमी झालं. पुढे त्यांनी ही चूक सुधारुन चांगल्या आरोग्यासाठी दूध आणि दुधाच्या पदार्थांचा काही अंशी सेवन करण्यास सुरुवात केली. गांधीजी बकरीच्या दुधाला पोषक मानायचे. बकरीचं दूध आणि दही गांधीजी कुठेही जावोत त्यांच्या आहारात असायचंच.

Image: Google

5. अन्नावर खूप प्रक्रिया करुन खाणं गांधीजींना मान्य नव्हतं.म्हणूनच गांधीजी भाज्या प्रामुख्याने कच्च्या खायचे. कारण कच्च्या भाज्या म्हणजे अन्नाचं शुध्द स्वरुप. ते शिजवून खाताना त्यातील सर्व पोषकमूल्यं निघून जातात. त्यामुळे कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्यं, हंगामी फळं हे गांधीजींच्या आहारातले मुख्य घटक होते. गांधीजी म्हणायचे की, सतत कच्च्या भाज्या खाल्ल्याने शरीराला अशक्तपणा येतो. पण रोज थोडं दूध आणि थोड्या प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीर शुध्द होतं आणि शरीराचं योग्य पोषण होतं. निरोगी, दीर्घायुषी होण्यासाठी कच्च्या भाज्या, कमी प्रक्रिया केलेलं अन्न याला पर्याय नाही असं गांधीजी म्हणायचे.

6. गांधीजी साखरेऐवजी गूळ वापरायचे. पॉलिश तांदुळाऐवजी हातसडीच्या तांदुळाचा भात खायचे. गव्हाच्या पिठातला कोंडा, पोषक तत्त्वं निघून तयार होणार्‍या मैद्याला गांधीजी आपल्या आहारात स्थान देत नसत.

7. गांधीजी दिवसातून केवळ दोन वेळेस जेवायचे. सकाळी अकरा वाजत आणि सायंकाळी सव्वा सहा वाजता. सूर्यास्त झाल्यानंतर गांधीजी अन्न सेवन करायचे नाही. दोन जेवणाच्या मधे ते केवळ पाणी प्यायचे. या आहार नियमांसोबतच गांधीजी रोज किमान 4 ते 10 कि.मी पायी चालायचे. यामुळेच आपला रक्तदाब , ताण हा नियंत्रणात राहिला असं गांधीजी म्हणतात.

गांधीजींचे नियम त्यांच्या स्वत:साठीचे होते. हे नियम तुम्ही पाळायलाच हवेत असा आग्रह त्यांनी कधीच धरला नाही. पण गांधीजींचे निरोगी आरोग्यासाठीचे हे 7 आहार नियम वाचून आपल्यालाही आहार नियम पाळण्याची प्रेरणा नक्कीच मिळते.